एक क्षण................!

नएक क्षण............... आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला स्वतःविषयी  विचार करायला वेळ नाही तर आपण रोज जे असंख्य क्षण जगतो त्याविषयी काय बोलायचे..?

पण नियती.... नियती अस होऊन देत नाही, ज्या मजेत आपण जीवन जगत असतो तिथे कुठेतरी ति अगदी दबक्या पावलांनी येते आणि जाणीव करून देते... की तू जे आयुष्य जगतो आहेस ते किती क्षणभंगुर  आहे ते.

मी सुधा जीवनात फार बिनधास्त होते, अगदी काही प्रमाणात येवढी की जीवनातले एकमेव सत्य "मृत्यू", यालासुद्धा अगदी सहज घेत होते. असे म्हणतात की ज्याने हे सत्य जवळून पाहिले त्याची जीवनाची व्याख्याच बदलते. असच काही माझ्या बाबतीत झालं.

मी राहणार पुणेकर. बी. ई. चे  दिवस पंख लावून उडून गेले आणि मला वेध लागले नोकरीचे. एका छान कंपनीत नोकरीसुद्धा मिळाली, मग काय म्हणता........! छान प्रोफेशनल जीवन सुरू झालं.

कंपनी तशी लांब होती. मी राहत होते पिंपरी ला आणि कंपनी सिंहगड रोडवर. मग काय रोजची कसरत सुरू झाली पी. एम. टी. जींदाबाद. रोज स्वारगेट पर्यंत एक बस आणि दुसरी स्वारगेट ते सिंहगड रोड वर जाणारी. पण नवीन नोकरी आणि उत्साह पण फार होता. रोजच अगदी रूटीन सुरू झालं आणि तो दिवस आला..........!!

त्या दिवशी नेहमीच्या बसला जरा जास्तच गर्दी होती. कशीबशी मनपा बस मिळाली आणि त्या बसने शिवाजीनगरला उतरले. तिथून स्वारगेट ला जाणारी बस पकडली. नेहमीप्रमाणे स्वारगेटचा बसस्टॉप आल्यावर उतरले. थोडीशी पुढे गेले असेल तोच मला काही कळण्याच्या आत मी जोरात रोडवर पडले होते. डोके जमिनीवर जोरात आपटले होते. त्यावेळेस साऱ्या संवेदना जश्या गोठून गेल्या होत्या. येवढंच कळत होत की आपण उठायला पाहिजे, पण काहीही केल्या माझे हात- पाय  हलत नव्हते. कुणीतरी माझे पाय जोरात ओढले आणि...................?

सुमारे १५ - २० मिनिटांनी मला थोडीशी जाग आली आणि माझ्या मनात पहिला विचार आला " Accident ". हो.... आणि तसेच झाले होते, ज्या बस मधून मी उतरले होते त्याच बसच्या चालकाचा बसवरील ताबा थोडासा सुटल्यामुळे बसच्या कोपराचा मला धक्का लागला होता आणि एका क्षणात मी बसच्या खाली गेले होते. पाहणाऱ्यांनी सांगितलं की प्रथम मी बसच्या पुढच्या चाकाखाली आले होते, पण त्या धक्क्याने मी गोल फिरत असल्यामुळे दोन्ही चाकांच्या मधून निघून नंतर पाठीमागच्या चाकाखाली आले होते. नशीब चांगले होते म्हणून मी पाठीमागच्या चाकाखाली येण्याच्या आधीच त्या बस चालकाने अगदी करकचून ब्रेक लावले होते.

माझ्या भोवती खूप गर्दी जमली होती. कुणी मला  पाणी पाजत होते तर कुणी चहा. एवढं होऊन देखील मला कुठेही रक्त येईल एवढं लागलं नव्हत. सगळे लोक बोलत होते "मुलीच नशीब चांगलं म्हणून वाचली, नाहीतर आज जन्माची अधू तरी झाली असती नाहीतर जीवनाशी असणारी  नाळ तरी तुटली असती". डोके जोरात आपटले  गेल्यामुळे माझ्या सगळ्या जाणीवा जाग्या झाल्या नव्हत्या अजून. पण जेवढं समजत होत ते कळून अंगावर शहारा आला होता. काळ आला होता पण वेळ आली नव्हती.

माझे डोके जाम सुजले होते. पण मी त्या बस चालकाला लोकांचा मार बसेल त्यामुळे हसण्याचा कठीण प्रयत्न करत होते. असे दाखवत होते की मी ठीक आहे. त्या बसचे चालक आणि वाहक चांगले होते. त्यांनी मला परत माझ्या पिंपरी च्या बस मध्ये बसून दिले आणि मी घरी परत आले.

मी घरी परत येतानाचा माझा अनुभव म्हणजे परत एक लेख होईल. पण ते महत्त्वाचे नाही. महत्त्वाचे  आहे ते तो " एक क्षण ". जो माझे जीवन बदलून  टाकणारा ठरला. मृत्यू ची जाणीव एवढी भयानक असते हे पहिल्यांदा समजत होते.

मी नेहमी म्हणायचे की हे लोक जे Accident होऊन पडतात ते पटकन उठत का नाही. आपला जीव का वाचवत नाही, पण दिसतं तसं नसत. त्या क्षणी आपल्याला कळत असून देखील आपण काहीही करू शकत नाही.

अजुनसुद्धा मी जेव्हा गाडी चालवते तेव्हा खूप हळू चालवते कारण असच जर माझ्यामुळे दुसऱ्याच्या बाबतीत झालं तर......? हा विचार मी नेहमी करते. आज जे लोक फार जोरात गाडी चालवतात किंवा जीवनाला फार सहज घेतात ते हे विसरतात असा क्षण त्यांच्या सुद्धा जीवनात येऊ शकतो  आणि मला जसं जीवनदान मिळालं तसं ते त्यांना मिळेलच अस नाही.

त्यादिवसापासून मी रोज रात्री आपण दिवसभरांत काय काय केलं याचा आढावा घेते आणि येणाऱ्या नव्या दिवसासाठी साठी सज्ज होते. आता मी कीतीही बिझी असले तरीही रोज जगत असणाऱ्या असंख्य क्षणांचा विचार करण्यास विसरत नाही. फार समाधान मिळतं यात.

तुम्ही पण हे करून पाहा.........!!