कविता कुणावरही करावी...
प्रेमामध्ये सर्वस्व अर्पिलेल्या 'तिच्या'वर करावी,
प्रेमभंगानंतर आठवणींमध्ये झुरणाऱ्या 'त्याच्या’वर करावी,
मातृत्त्वाच्या चिरंतन महिम्यावर करावी,
दातृत्त्वाच्या असीम उदात्ततेवर करावी,
कवीच्या हळुवार संवेदनशीलतेवर करावी,
कलाकराच्या जन्मजात सृजनशीलतेवर करावी,
कविता कुणावरही करावी.....
निर्झराच्या खळाळत्या पाण्यावर करावी,
ऊन पावसाच्या सप्तरंगी खेळावर करावी,
चंद्राच्या शुभ्र शीतलतेवर करावी,
निसर्गातल्या हिरवाईच्या प्रसन्नतेवर करावी,
निष्पाप लीलांत रमलेल्या बाळावर करावी,
जीवन मरणाच्या चाकावर फिरणाऱ्या काळावर करावी,
कविता कुणावरही करावी.....
माणसाला माणूस ठेवणाऱ्या माणुसकीवर करावी,
सर्वसाक्षी सर्वव्यापी जगनियंत्यावर करावी,
कविता कुणावरही करावी.....!!