माझा अनुभव

माझ्या जीवनातील एक अनुभव लिहिण्याचा प्रयत्न करतो आहे. चु. भु. दे. घे.
हा प्रसंग म्हणजे माझ्या अनेक नसत्या उचापतींपैकी एक आहे.

मे महिन्याचे दिवस होते. बारावीची परीक्षा नुकतीच संपली होती. दिवसभर नुसते उंडराणे, कैऱ्या, चिंचा धोंडे मारून पाडून खाणे आणि गावभर गजाली करत हिंडणे याशिवाय दुसरा उद्योग नव्हता. अशातच एक दिवस बातमी समजली की आमच्या गावाजवळच्या जंगलात एक वाघ आला आहे.
माझा भाऊ (अभिनव) सुद्धा तेव्हा आमच्याकडे आला होता. मला ही बातमी समजल्यावर मी अभिनवला म्हटले की आपण वाघ बघायला रात्री जाऊया.....
पण यात एक मोठा "पण" होता. मे महिन्याची सुट्टी असल्यामुळे माझे काका, आत्या, आते-मामे भावंडे अशी भरपूर मंडली आली होती. त्यामुळे या सर्वांचा डोळा चुकवून जाणे हे थोडे कठीणच होते...
म्हणून मग आम्ही एक योजना आखली (शेजरच्यांच्या बागेत बसून त्यांच्याच बागेतल्या चोरलेल्या कैऱ्या खात खात.. ).
त्यानुसार प्रथम आम्ही रात्री फार गरम होते या सबबीखाली बाहेर अंगणात झोपायला सुरुवात केली. एक चांगला टॉर्च घरातून लंपास करून सुरक्षित जागी, चटकन मिळेल असा दडवून ठेवला. दोन चांगल्या वेताच्या काठ्यासुद्धा अंगणातील फुलझाडांच्या मागे दडवून ठेवल्या. अशा रितीने पूर्वतयारी झाली..
दोन - तीन दिवस बाहेर झोपायचे नाटक झाल्यावर.. (नाटकच ते.. डास फोडून काढायाचे... मग दिवसा झोपेची उरलेली थकबाकी गोळा करायाचो.. ).. एके दिवशी आम्ही ठरवले की आज रात्री जायचे..
त्या दिवशी (म्हणजे रात्री) जरा लवकरच जेवून सुमारे साडेनऊ वाजता आम्ही आमच्या पथाऱ्या पसरल्या.. आणि 'प्रथम ग्रासे मक्षिका पातः' या उक्ती प्रमाणे माझे काका त्या दिवशी आमच्या बरोबर बाहेर झोपायला आले... आता आली का पंचाईत!!!.. पण तरीसुद्धा आम्ही आमचा निश्चय कायम ठेवला...
सुमारे अकरा वाजता आम्ही उठलो. सगळीकडे शांतता होती. सर्वजण झोपले होते. काकांचा संथ लयीत भैरव चालू होता. आम्ही गपचूप उठलो. टॉर्च उशाशी होताच तो उचलला आणि फुलझाडांच्या मागे दडवलेल्या काठ्या उचलल्या. तेव्हढ्यात कशी कोण जाणे, पण माझ्या हातातली काठी अंगणातल्या फरशीवर पडली आणि मोठा आवाज झाला.
काकांचा भैरव थांबला आणि अर्धवट झोपेत ते ओरडले, "कोण रे? ". मी हळूच ओरडलो. "मियॉवं.. मियॉवं.. ". अभिनव अनावधानने पटकन म्हणाला, "मी ते.. मांजर". माझ्या पोटत एकदम गोळा आला, आता काका उठणार, मग आमचे काही खरे नाही. पण काका अर्धवट झोपेत असल्याने ते एकदम करवादले, "हड.. हड... काय कटकट आहे. झोपू सुद्धा देत नाही.. हाकव त्याला ".. असे म्हणून पुन्हा झोपी गेले. पाच मिनिटांनी त्यांचा पुन्हा संथ लयीत भैरव सुरू झाल्यावर आम्ही निघालो....
आमच्या गावापासून जवळच एक छोटासा डोंगर आहे आणि पलीकडे सर्व जंगल आहे.. त्या रात्री लख्ख चांदणे नव्हते, पण पायवाट दिसेल एव्हढा प्रकाश होता.
आम्ही जंगलाच्या हद्दीजवळ आलो तेव्हा बारा वाजत आले होते. जंगलात एक छोटासा पाणवठा आहे. पाणवठा कसला डबकेच आहे. तिथे वाघ रात्री पाणी प्यायला येतो असे आम्हाला कळले होते. आम्ही त्याच दिशेने निघालो होतो. आजूबाजूला किर्र जंगल.. मधून जाणारी छोटीशी पायवाट. चालताना आजूबाजूला काहीतरी खसफसल्याचे.. कोणीतरी सरसरत गेल्याचे आवज येत होते. भीती तर इतकी वाटत होती की एकाने जरी कोणी परत जाऊया असे म्हटले असते तरी आम्ही धूम ठोकली असती.
आम्ही पाणवठ्या जवळ आलो. आमच्या पावलांचा आवाज होणार नाही याची काळजी घेत होतो. पाणवठ्यावर कोणीतरी पाणी पीत होते, पण आमची जराशी चाहूल लागताच ते पळले. बहुधा कोल्हा असावा..
एका बऱ्याश्या झाडाजवळ(ज्याच्यावर चटकन चढता येईल अशा) आम्ही टॉर्च बंद करून बसलो. आजूबाजूला सर्वत्र शांतता होती. बारीकसारीक खसफसल्याचे आवाजसुद्धा त्या शांततेत खूप मोठे वाटत होते. असं वाटत होतं की सगळं जंगल आपल्या अंगावर येत आहे. मंद वाऱ्याने हलणाऱ्या झाडांच्या सावल्या चित्रविचित्र आकर धारण करीत होत्या.
सारखे असे वाटत होते की कोणीतरी आपल्यावर नजर ठेऊन आहे... इकडून कोणीतरी बघते आहे.. नाही पलीकडून... डोळ्यांच्या कोपऱ्यात कसलीतरी हालचाल जाणवते आहे... कोण असेल तिकडे???
एव्हाना चंद्र चांगला वर आला होता. त्यामुळे बऱ्यापैकी प्रकाश पसरला होता. अशा विचित्र अवस्थेत सुमारे तासभर गेला. वाघ लांबच राहिला पण साधा ससा सुद्धा फिरकला नाही.. मला वाटले की आमचा कोणीतरी पोपट केला..
मी अभिनवला म्हणालो की आपण आता परत जाऊया.. तो माझ्या या वाक्याची वाटच बघत होता. आम्ही झाडाखालून उठलो आणि परत जायला पाऊल उचलणार..
तेव्हढ्यात...............
कुठेतरी जोरात झुडपे खसफसल्याचा आवाज झाला. कोणीतरी जोरात धावत येत आहे असे जाणवले.. आणि निमिषार्धात एक काळ्या रंगाचे मोठे धूड पाणवठ्यावर येऊन धाडदिशी आदळले. दुसऱ्याच क्षणी त्याने पलीकडच्या झुडपात उडी मारली आणि ते दिसेनासे झाले (ते बहुधा रानडुक्कर असावे असा माझा अंदाज होता तो नंतर खरा ठरला). माझी छाती तर बुलेटच्या इंजिनासारखी धडधडत होती. पाय लटालटा कापत होते.
आणि या धक्क्यातून सावरण्याच्या आतच पुन्हा जोराचा आवाज झाला आणि प्रत्यक्ष वाघोबाच तिथे अवतीर्ण झाले...
वाघोबांना बहुतेक फारशी घाई नसावी.. कारण त्याने आजुबाजुला चाहूल घेतली व मनसोक्त पाणी प्यायला सुरुवात केली... आम्ही मंत्रमुग्ध झाल्यासरखे त्याच्याकडे बघत होतो.
तो पिवळाधमक रंगाचा पट्टेरी वाघ होता एव्हढेच माझ्या लक्षात आहे.. त्याची बाकी मापं काढण्याच्या मनःस्थितीत मी नव्हतो. वाघाच्या आणि आमच्या मध्ये सुमारे २५-३० फुटांचेच अंतर होते बहुतेक (ही मापे अर्थातच घरी आल्यानंतर काढलेली).
मनसोक्त पाणी पिऊन झाल्यावर स्वारीने छानपैकी हातपाय ताणून आळसं दिला आणि इकडेतिकडे बघताबघता त्याची आमच्यावर नजर गेली आणि तो गुरगुरला. आम्ही त्याच्या बरोबर समोर तसेच भानरहित अवस्थेत उभे. त्याची गुरगुर ऐकल्यावर आम्ही भानवर आलो आणि निमिषार्धात सर्व परिस्थितीचे आकलन झाले आणि माझ्या काळजाचे पाणीपाणी झाले. काय करवे ते सुचेना. घशाला कोरड पडली. पाय लटालटा कापू लागले. प्रसंग मोठा बाका होता. असेच ४-५ सेकंद गेले....
पण वाघोबांना आमच्यात काही स्वारस्य नसावे. त्याने पुन्हा पाण्याल तोंड लावले. तेव्हढ्यात पुन्हा कसलातरी आवाज आला. वाघाने कान टवकारले आणि एक मोठी झेप घेऊन तो आम्ही आलो त्याच वाटेन निघून गेला....
भानवर यायला तब्बल पाच मिनिटे लागली.. मघापेक्षा आता परिस्थिती बिकट होती.. आम्हाला ज्या पायवाटेवरून परत जायचे होते त्याच वाटेवरून तो वाघ गेला होता..
आता काय करावे???
पण आमच्यासमोर घरी जाण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. कारण आमच्या या उपद्व्यापाची जर घरी बोंब झाली असती तर त्यापुढच्या ओढवणाऱ्य प्रसंगापुढे हा प्रसंग म्हणजे काहीच नव्हे. त्यामुळे आम्ही सगळा धीर एकवटून, हातातल्या काठ्या अशा तलवारीसारख्या धरून आम्ही निघालो...
पायवटेवरून दबकत, दबकत, जीव मुठीत धरून आम्ही कसेबसे जंगलाच्या बाहेर आलो..
एकदाचे रस्त्यावर आलो आणि हुश्शऽऽऽऽऽऽ म्हणून श्वास सोडला. रस्त्यावरून आम्ही जी धूम ठोकली ते घर जवळ येईपर्यंत थांबलो नाही. घरी पोचलो तेव्हा सुमारे ३ वाजले होते..
घामची नुसती आंघोळ झाली होती. घरी पोचल्यावर काठ्या पुन्हा दडवून ठेवल्या.. आणि डोक्यावरून चादर घेऊन झोपी गेलो.
अशा प्रकारे सुमारे ३ तास चाललेल्या रोमहर्षक नाट्याचा शेवट झाला....