(पूर्वसूत्र : इथल्या यंदाच्या दिवाळी अंकात प्रकाशित झालेलं मुक्तक 'पूर्वार्ध'.)
....आत्ता कुठे सुरु झाला होता,
त्यांच्यातल्या नात्याचा प्रवास, उत्तरार्धाकडे!
------------------------------
कंबर कसून ते नातं आता कामाला लागलं,
कधी हादरलेल्या त्याला
किंवा भेदरलेल्या तिला
दोघांना चुचकारत -प्रसंगी फटकारत,
खाचखळगे,नागमोडी वळणं धीरानं पार करत
दोन्ही चाकांना मार्गावर ठेवत...
पण लवकरच पुन्हा एकदा दोघांना भासू लागलं, की
स्वेच्छेने कडेवर घेतलेलं
ते नातं होतं मानेवरचं असह्य जोखड!
फारकतीच्या सुरांना बरकत येऊ लागली..
आणि खांद्यावरचं जू उतरवून
स्वतंत्र वाटा शोधण्यासाठी
सुरु झाल्या त्यांच्या सशस्त्र वाटाघाटी !
हतबल त्राग्यातून,दोषारोपांच्या फैरींतून
अटळ आत्ममंथन होऊ लागलं, तेव्हा सामोरं आलं
कल्पिताहून अद्भुत एक उघड गुपित-
दोघांतलं नातं असं काही वेगळं नसतंच,
असतो केवळ प्रत्येकाचा दोन रुपांतला एकत्र प्रवास, आत्मशोधाचा !
आपल्या भविष्याआड येऊ पहाणार्या नात्याला
दूर सारुन त्यांनी पाहिलं,तर दूरवर काहीच दिसेना..
आत्मबोधाच्या क्षणी कलह कसा संपला, आणि ते नातं
त्यांच्यात कधी विरघळून गेलं, त्यांना कळलंही नाही...
...
आपलं इथलं काम संपवून नातं निघालं,
पुन्हा एका नवीन प्रवासाला-
-------------------------------
...सार्या नजरा चुकवत
त्या दोघांची पहिली डोळाभेट झाली तेव्हा....