जसे एकटे बेट...!

..........................................
जसे एकटे बेट...!
..........................................

कुणाच्याच विश्वात नाही कसा मी?
जसे एकटे बेट; आहे तसा मी!

सभोवार हे कोऱडे ठाक पाणी...!
कसे थांबले याच, एका ठिकाणी...?
मुकी गाज गाते सुनी, स्तब्ध गाणी...
भरावा कशाने रिकामा पसा मी?

जिवाचे कुठे सोबती सर्व गेले...?
कुण्या वादळाने असे हाल केले...?
स्वतःपासुनीही मला दूर नेले...!
तिऱ्हाईत झालो मलाही जसा मी!

किती उंच मी हात दोन्ही उभारू....?
कुणीही दिसेना, कशी हाक मारू...?
मला सोडवाया कुणाला पुकारू...?
किती एकटा एकटा हा असा मी!

- प्रदीप कुलकर्णी

..........................................
रचनाकाल ः १० नोव्हेंबर २००८
..........................................