मराठी अभ्यास केंद्राचे आवाहन
मराठी अभ्यास केंद्र हे मराठी भाषा, समाज आणि संस्कृतीसाठी विधायक काम करणाऱ्या कृतिशील कार्यकर्त्यांचे व्यासपीठ आहे. मराठी ही महाराष्ट्रीची राजभाषा व लोकभाषा आहे. ती व्यवहारभाषा व ज्ञानभाषा व्हावी यासाठी अथक प्रयत्नांची गरज आहे.
प्रादेशिक भाषांच्या संरक्षण व संवर्धनासाठी केंद्र शासनाने व मराठी भाषेच्या वापरासाठी महाराष्ट्र शासनाने अनेक अधिनियम अनेक वर्षांपूर्वीच पारित केले आहेत. माहितीच्या अधिकाराचा वापर करून केंद्र शासनाच्या महाराष्ट्रातील कार्यालयांना व महाराष्ट्र शासनाला राज्यकारभारात मराठी भाषेला तिचे हक्काचे स्थान देण्यास भाग पाडण्याचा उपक्रम काही व्यक्तींनी हाती घेतला आहे. या उपक्रमाला थोडेफार यशही मिळू लागले आहे.
हे प्रयत्न वैयक्तिक स्तरावर न राहाता त्यांना व्यापक स्वरूप प्राप्त व्हावे या दृष्टीने मराठी अभ्यास केंद्राने एक कृतीगट महितीच्या अधिकाराचा वापर करून मराठी भाषेला तिचे हक्काचे अधिकार मिळवून देण्यासाठी स्थापन केला आहे.
म्हणूनच या कामात रूची आणि गती असणाऱ्या सर्व व्यक्तींची एक बैठक शनिवार दिनांक 22 नोव्हेंबर 2008 रोजी संध्याकाळी 4 वाजता नायगाव, दादर येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या दामले सभागृहात आयोजित केली आहे. कृपया इच्छुक व्यक्तींनी श्री शरद गोखले यांच्याशी 9869444757 या भ्रमण ध्वनीवर अथवा sharadgokhale@hotmail.com या इ-पत्त्यावर संपर्क साधावा.