एकाच माळेचे .....

"सांभाळून. मधली पायरी तुटलीय. "
"जावळ्या, लेका, कुठे घेऊन आलास? "
"पाट्या, आज ड्राय डे. इथे नाही तर कुठेच नाही. "
"आहेस बुवा अस्सल. पुढे बघ.... "
"*****... ***"
"शिव्या.. को.. णाला घालतो? मला.... "
"चला निघा. झेपत नाही तर घ्यायची कशाला? "
"को... णाला झे.. पत... नाय? "
"सोड ना जावळ्या, नसता वांदा नको. उगाच मुड स्पॉईल व्हायचा. "

"ये टिप्या, फडका मार इकडे. "
"बऱ्याच दिवसांनी साहेब. "
"बऱ्याच दिवसांनी बकरा सापडला बघ. चल, पटापट एक हाफ आणि आपला चाखणा स्पेशल. आपल्याकडे टाईम कमी आहे. "
"जावळ्या, 'चाखणा स्पेशल' काय? "
"बघशीलच. आधी सांग पार्टी कशाबद्दल? "
"सांगतो रे. घाई काय? "
"आता सांग ना. सस्पेन्स कशाला वाढवतोस? "
"जावळ्या लेका, मी बाप झालोय. "
"पाट्या, तुझ्या *****, सकाळपासून सांगायला काय झालं होतं? या गोष्टी काय सस्पेन्स ठेवायच्या असतात काय? "
" सरप्राईज यार. "
"साहेब, अजून काय आणू? "
"हे दे, एक हाफ गोल्ड फ्लेक घे. बाकी तूला ठेव. "
"आता आणतो. "
"ये टिप्या... "
"हां साहेब. "
" परिक्षेचं काय झालं रे? "
" दहावी पास झालो साहेब. बासष्ट टक्के मिळाले. "
" शाब्बास. मन लावून अभ्यास कर. काय लागलं तर सांगायचं "
"जी साहेब. "
"तु बोल. "
"सकाळीच कळलं. पहिला फोन तुला लावला. तेव्हाच बसायचं ठरवलं तर तुझा 'हेड' आडवा आला. "
"हेडेक आहे साला. पण तू बोलला असतास तर तेव्हाच सगळं गुंडाळून आलो असतो. "
"दोन मुलीनंतर शुभा जेव्हा परत गरोदर राहीली तेव्हा सगळेच बोलत होते, यावेळेसही मुलगी झाली तर काय करणार? मी पण थोडा डाऊटफुलच होतो. काल जेव्हा तिला अचानक ऍडमिट केलं तेव्हापासून नुसता तणाव. सगळेच टेन्शनमध्ये. मी, आई, बाबा, अवी, मनू. जेव्हा नर्स आली आणि तिने न्युज दिली तेव्हा नाचायचाच शिल्लक होतो. जर संस्थानिक असतो तर तिला गळयातला सोन्याचा कंठा बहाल केला असता. "
"पाट्या... "
"सगळं टेंशन संपल आता. हे असं टेंशन आयुष्यात तीन चार वेळाच अनुभवलं. फायनलच्या एक्झामला, शुभाला प्रपोज केलं तेव्हा आणि तिसऱ्यांदा पहिल्या इंटरव्युला. ही चौथी वेळ. यात ही पास झालो. "
"आणि मुलगी झाली असती तर.... "
"तर..... हॉस्पिटलच्या पायऱ्यांवर बसलेला असतो आता. माझ्यासारख्या दुर्दैवी बापांचे चेहरे मोजत. तेवढाच मनाला दिलासा. मी एकटाच नाही याचा. "
"अजून काही आणू साहेब. "
"नको. "
"घे रे. घे. नेहमी आयुष्यात असे क्षण येत नाहीत. टिप्या एक हाफ घे आणखी. "

"टिप्या, तो खाकी ड्रेसवाला कोण रे? मघापासून हातातला फोटो बघत घोट घेतोय. "
"तो पाठच्या कंपनीतला वॉचमन आहे साहेब. त्याचा जवान पोरगा गेला परवा. त्याच्याच डोळ्यासमोर. तेव्हापासून हेच चाललय. कसली शुद्धच नाही त्याला. "
"पाट्या, नियती किती क्रुर असते आणि तिचे विनोद ही. तो पितोय त्याचा मुलगा गेला म्हणून आणि तू पितोयस तुला मुलगा झाला म्हणून. "
"जावळ्या, फिलॉसोफीकल नको. प्लीज. "
"मी नाही रे. दारू बोलतेय. तुझ्यासारखा शिकला-सवरला माणूस आपल्या बायकोला, जी कधीकाळी प्रेयसी होती, तिला, प्रॉडक्शन मशीन असल्यासारखा मुलगा पाहीजे म्हणून त्याच त्याच कळा पुन्हा भोगायला लावतो. दोन दोन मु..... "
"जावळ्या, फिलॉसोफीकल नको. प्लीज. तुझी दारू स्त्री मुक्ती, समानता या घासलेल्या विषयांवर बोलणार असेल तर इथेच आवरतं घेऊया. मला मी टेंशनमध्ये घालवलेल्या प्रत्येक क्षणाचा सुड घ्यायचाय. तेव्हा स्वतः पी. मला पिऊ दे. "
"ओ. के. बॉटम्स अप. "

"पाट्या, हळू. पायरी.... तुटलीय ती. "
"जावळ्या, मी... मुलाचा.... मुलाचा.. बाप झालोय. लकी मॅन. आपण आज... "
"धप्प. "
"तरी बोलत... होतो. खांद्यावर..... हात.. टाक. उठ. उठ. "

"ओ मिस्टर, जरा बघून चाला. झेपत नाही तर घ्यायची कशाला? "
"तुझ्या ***, कोणाला........ झेपत.... "
" सोड यार, ते आऊट आहेत. चल. उगाच उशीर नको. "