आता काय होणार?

इतके हल्ले झाले,
इतके लोक मेले
आता काय होणार?

....  शिवराज पाटील

अतिरेक्यांना इशारा देणार,
आबा वाहिन्यांना
लांबलचक मुलाखत देणार,
कॉंग्रेस वगैरे हल्ल्याचा
कडक निषेध करणार,
भाजप 'पोटा' आणायची
मागणी करणार,
विलासराव शोक बिक
व्यक्त करणार,
सोनिया, मनमोहन, अडवाणी
परिस्थितीची पाहणी करणार,
मृतांना नि जखमींना
आर्थिक मदत जाहीर करणार,
त्यांचे फोटो आज तक वर
परत परत दाखवणार,
तूर्तास राज, उद्धव, मराठी माणूस
बाजूला राहणार,
शेतीचे, वीजेचे, मंदीचे सगळे प्रश्नं
लोकं विसरणार,
मुंबईचं टीम स्पिरीट वगैरे
मिडियावाल्यांना दिसून येणार,
लोक मोठ्या हिंमतीने वगैरे
ऑफिसला जाणार,
दोन दिवस वाईट वाटणार,
चार दिवस चर्चा होणार,
श्रद्धांजली, शोकसभा वगैरे वगैरे
नंतर सगळं 'सुरळीत' होणार...

आपण रोज सकाळी
तेव्हाच उठणार,
तीच लोकल पकडून
कामावरती हजर होणार,
संध्याकाळी परत येणार,
टीव्ही बघणार, झोपून जाणार
खाणं-पिणंऱ्हगणं-मुतणं
सगळं सालं तसंच होणार


हम तुम्हें ऐसेही मारेंगे...
आप क्या करोगे?
याचं उत्तर कोण देणार?
-------------------- शतानंद.

माझ्याच एका कवितेच्या ओळी आठवल्या

आहे असाच मीही या षंढांमधील कोणी
गातो अशा कविता माझ्या घरामध्ये बसुनी......