गंगेच्या तिरावरती
गात राही गीते कोणी
शुभ्र मधुर जलधारेतूनी
वाहतसे एक कहाणी ।
कोणी राजा, भिकारी कोणी
साधूसंत तर पापी कोणी
दुःखाने येथे रडते कोणी
निः संग कोणी राम जपी ।
संस्कृतीचा रक्षक कोणी
अर्ध्य रवीस देई प्रभाती
मंत्र जपून हवन करती
कर्म चुकले तर अधोगती ।
लाटा लटां संगे गाती
कोणी गाणी , कोणी विराणी
दैन्याने कोणी गांजती
बेफिकीर कोणी आत्मरंगी ।
साक्षी राही गंगामाई
तिरावरती जीवन गाई
गंगेच्या ओघामधूनी
काळाचेच पाणी वाही ।