देह नाशवंत

किती धावशील वेडया, मागे लागला कृतांत
अंत हा अटळ, देह नाशवंत

रोज शोधी नवी वाट
रोज दावी नवा थाट
रोज धावतोस उद्याची, बाळगूण खंत
अंत हा अटळ, देह नाशवंत

बांधी उंच उंच इमले
जोडी जड जड जुमले
कोणासाठी जमविशी, माया ही अनंत
अंत हा अटळ, देह नाशवंत

कोण एक वाल्या कोळी
कोण जमविती टोळी
पापा पुण्याची कोणी ना, बाळगती खंत
अंत हा अटळ, देह नाशवंत

कोणा हाती जपमाळ
कोण वाजवीतो टाळ
तरी कोणी नाही सुटले, संत नि महंत
अंत हा अटळ, देह नाशवंत

कोणी केले घोर तप
कोणी चालवीला जप
चाललासे आटापीटा, अखेरापर्यंत
अंत हा अटळ, देह नाशवंत

कोण राहीला कृपण
कोणी जमवीले धन
भेदभाव नाही त्यासी, गरीब श्रीमंत
अंत हा अटळ, देह नाशवंत

हरीश दांगट