मूळ दुवा : दुवा क्र. १
गरे फेकून द्या आणि चारखंड चावत बसा, असा फणस खायला शिकवते ती आजची शिक्षणव्यवस्था, असं पुलंनी 'हसवणुकी'त सांगून ठेवलंय. त्यामुळे कोणत्याही विषयाची गोडी ठावूक असण्याची शक्यताच नसते. मग त्या कितीही रसाळ कविता का असेनात? भाषेच्या पुस्तकांना चाली असतात, हे नव्या पिढ्यांना ठावूकही नसतं. अशाच पिढीचे काही प्रतिनिधी स्वत:च शिक्षक बनून कविता शिकवायला लागले. तेव्हा त्यांना कळलं, की आपण खूपच गोड ठेवा गमावलाय. तो आता निदान पुढच्या पिढीला मिळावा म्हणून त्यांनी आधुनिक टेक्नॉलॉजीच्या मदतीने कंबर कसलीय. त्यातून एक जानेवारीला 'चाली मनातल्या' या कार्यक्रमाने आकार घेतलाय.
' दृष्टी इनिशिएटिव' ही कांदिवलीची संस्था. क्लास आणि शाळांमध्ये शिकवणारे तरुण त्यात बहुसंख्येने. कायम विविध प्रयोग करणारे. कविता शिकवताना त्यांना कळलं, की चालीतल्या कवितांची गोडी काही वेगळीच आहे. लहानगे विद्याथीर्ही त्याला छान प्रतिसाद देत होते. मुलांचे आजी-आजोबा चाली कळवू लागले. तरीही चांगल्या कवितांना छान चाली मिळत नाहीत, हीच मोठी अडचण होती.
' आम्हाला मिळालेल्या कवितांच्या जुन्या चाली खूपच छान आहेत. त्या टिकवून ठेवायला हव्यात, म्हणून आम्ही जमतील तशा मोबाइलवर रेकॉर्ड करू लागलो. एक्स्चेंज करू लागलो. ते व्यापक प्रमाणात करण्यासाठी 'चाली मनातल्या' या कार्यक्रमाने जन्म घेतलाय, ' असं 'दृष्टी'चा प्रमुख प्रशांत पेडणेकर सांगतो.
या कार्यक्रमात त्यांनी जाहीर आमंत्रण दिलंय ते ज्यांच्या मनात अजूनही चाली रुणझुणत आहेत, अशा सगळ्यांना. प्रवेश सर्वांना खुला आहे. ज्यांना कविता म्हणायच्यात त्यांनी तर यावंच, पण ऐकून नॉस्टॅल्जिया जागवायचाय त्यांनीही यावं, अशी अपेक्षा आहे. कुणीही आठवणाऱ्या कविता चालीत म्हणायच्या. त्या रेकॉर्ड करून मोबाइल तसंच यू ट्यूबमधून इण्टरनेटवर जगभर पोहोचवण्यात येतील, असं या कार्यक्रमाचं स्वरूप आहे. कुणाला कविता आठवत नसतील, तर त्या शोधून देण्याची जबाबदारीही त्यांनी उचललीय. फक्त तसं आधी फोनवर कळवायला हवं.
.................
चाली मनातल्या
कुठे : पायोनिअर पब्लिक स्कूलचा हॉल, आकुलीर रोड, कामगार हॉस्पिटलसमोर. कांदिवली पूर्व. स्टेशनपासून चालत सात मिनिटांवर.
संपर्क : ९८७०८७१०४४