आई

निळे निळे आभाळ इथे
हिरवी हिरवी ही वनराई
प्रकाशाच्या वाटेवरती
जीवन इथले गात राही ।

उंच इमारती, भव्य दालने
लखलखते ही निशा देखणी
छमछम करिते लक्ष्मी, आणिक
जीवन होते एक रुबाई ।

फेस उसळे चषकांमधूनी
मदिर संगीत गुंजे कानी
खळखळणाऱ्या हास्यरवाने
हर्ष माईना मनातूनी ।

दमल्या थकल्या वाटसरुला,
पण थांबण्यासही इथे मनाई
तया मिळेना एक कोपरा
क्षणाक्षणाची इथेच घाई

मिटता डोळे, समोर माझ्या
इवले इवले घरकुल येई
ओढ लावी मनास माझ्या
मायेची ती मऊ दुलई ।

मिणमिणता प्रकाश देते
देवघरातील एक समई
दरवाजातून वाट निरखिते
थांबून राहे माझी आई ।