इंद्रधनूच्या पार

इंद्रधनूच्या पार दूर-

उंच उंच आभाळी

आहे एक धरा सुंदरा-

ऐकिली जी मी बालपणी॥

इंद्रधनूच्या पार दूर-

नभरंग नितळ निळा

खरंच साकारतो तिथे-

साहसाचा स्वप्नसोहळा॥

इंद्रधनूच्या पार दूर-

एक चकाकत तारा

नीज संपता मी पाहे मजला-

तिथे निर्भये बागडताना॥

मेघपसारा घन दाटोळा

दूर दूर मागे दिसला

कल्पधरा कुरवाळी मजला-

आपत्ती अवघ्या विरघळल्या॥

इंद्रधनूच्या पार दूर-

पांखी विहरे शांत निळा

मग कां, कां नाही मजला-

शक्य स्वच्छंद विहार तिथला॥