'प्रवास' शब्दाला थोडं फिरवलं की एक आदेशवजा शब्द तयार होतो...प्रसवा. प्रवासाच्या सृजनक्षमतेचा विचार केला गेला असावा आंणी म्हणूनच 'बारा गांवचे पाणी पिलेला' सारखे शब्दप्रयोग रूढ झाले असावेत. अनोळखी प्रदेशातल्या अनोळखी लोकांचा संपर्क बहुश्रुतता नक्कीच देतो. म्हणून मी म्हणायचो 'फिराल तर तराल'. कुटुंबाच्या चार भिंतीत राहिलेली व्यक्ती बहुधा विहिरीतल्या पाण्यासारखी राहते. तिला गतिमानता असेलच असे सांगता येत नाही. आकाशातली चांदणी जोपर्यंत एकाच जागेवर आपल्या कक्षेत असते, तिचा प्रकाश मिणमिणता दिसतो. पण जेव्हा ती स्थान सोडते, पृथ्वीच्या दिशेने झेपावते, प्रवास सुरू करते, तेव्हा तिला लख्ख तेज प्राप्त झालेले असते. मग आठवते ते एक सुवचन, 'बकरी होऊन चार दिवस जगण्यापेक्षा घटकाभर वाघ होऊन जगणे चांगले'!
दुसरा भाग असा की आंग्ल भाषेतला क्रियावाचक शब्द सफर हा आपल्या बोलीत प्रवास या अर्थाने वापरला जातो. कित्येक वेळा या दोन्हींची सांगड आपल्याला अनुभवावी लागते. सफर(त्रास-क्लेष)-शिवाय झालेला प्रवास हे भाग्याचे लक्षण ठरते. मानवी जीवनाचा प्रवास हा असा संमिश्र अनुभवांचा ठेवा असतो. मागे वळून पाहाताना म्हणूनच एक वेगळा आनंद मिळतो.
पासष्ठ साली शास्त्र-पदवी अभ्यासक्रमाच्या दुसNया वर्षात होतो. पुण्याच्या एस.पी.कॉलेजात शिक्षण चालू होते. घरची परिस्थिती अशी होती की फीचे पैसे स्वत: कमवावे लागत. शास्त्र-शाखेचा अभ्यासक्रम करताना पूर्ण वेळ नोकरी शक्य नव्हती. पाटबंधारे खात्यातील एका सत्कर्मचाNयाची अशास्थितीतओळख झाली....
मार्च महिना सरत आला होता. दुसNया टर्मची फी भरायची राहिली होती. त्या विवंचनेत फिरत होतो. दुपारी कॉलेजातून येताना खडकमाळ आळीतल्या एका अमृततुल्यात चहा घेत होतो. तो लंच टाईम होता. पवना डॅम डिव्हिजनचे कार्यालय त्या भागात होते. अर्थात हे नंतर कळले. एक बुटकी, गोरी, घाऱ्या डोळ्यांची, मोठ्या जिवणीची, कांहीशी गबाळी दिसणारी साधारण तिशीतली हंसरी व्यक्ती इतर दोघांसह त्या अमृततुल्यात आली. माझ्याशेजारी बसली. चहा घेता घेता सहज त्या व्यक्तीने माझ्याशी बोलणे सुरू केले. बोलण्याच्या ओघात त्यांना मिळालेल्या माहितीने ते भारले गेले. मला घेऊन कार्यालयात गेले. त्या व्यक्तीचे नांव खरे होते आणि ते त्या कार्यालयात टंकलेखक होते. मला शेजारच्या खुर्चीत बसविले. ते एका केबिनमध्ये गेले. श्री. भदे, कार्यकारी अभियंता अशी पाटी त्या केबिनच्या बाहेर लटकविलेली होती. पांच एक मिनिटांनी खरे बाहेर आले आणि दुसऱ्या केबिनमध्ये शिरले. दोन मिनिटांनी केबिनच्या दारात येऊन त्यांनी मला तिकडे येण्याची खूण केली. मी गेलो. आंतमध्ये बसलेले अधिकारी अत्यंत आनंदाने उठून उभे राहिले... 'अरे, तूं आहेस कां? सरळ येऊन भेटायचेस ना?... अहो खरे, हा माझा भाचा आहे! ' खरे अवाक होऊन पाहात राहिले... ते अधिकारी म्हणजे श्री.अनंत महाजन. लेखापाल होते ते तिथे.मला याची कांहीच कल्पना नव्हती. हे महाजन आमच्या आजोळच्या शेजारी राहाणाNया कुटुंबातील. आईचे समवयस्क होते. लहानपणापासून आम्ही मुले त्या थोरांना, ते चौघे जण होते-नाना, बाळू, सखाराम व चंद्रकांत(चिन्या), 'मामा' म्हणत असू. माझा त्या कुटुंबाशी तसा फारसा संबंध येण्याचे काही कारण नव्हते. त्यामुळे हा बाळूमामा इथे भेटेल, याची मला कल्पनाही नव्हती. पण खरे मात्र गोंधळून गेले. त्यांचे ते गोंधळणे स्वाभाविकही होते. मला बाहेर बसायला सांगून त्यांनी खरे यांना कांही तरी सांगितले. खरे बाहेर आले. टंकलेखनऱ्यंत्रावर कागद चढवला आणि पानभर कांही मजकूर टंकित केला. मला हळू आवाजात सूचना केली, 'विचारले तर सांगायचं मीच टाईप केलंय, काय? ' मी मान डोलाविली.
अपेक्षेप्रमाणे साहेबांनी मला बोलाविले. 'कुणी, तूंच टाईप केलंस कां? ' त्यांच्या मनातला संशय चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असतानाही मी खरे यांनी सांगितल्याप्रमाणे मान डोलावली. महाजनसाहेबांनी तो कागद भदे साहेबांना नेऊन दाखविला. दुपारी चार वाजता तीन महिन्यांसाठी माझी लिपिक पदावर नेमणूक केल्याचा आदेश माझ्या हातात दिला गेला. माझ्या त्यावेळच्या भावना आज व्यक्तही करता येत नाहीत. तीन महिन्यांची तीनशे पंचेचाळीस रुपयांच्या कमाईनं माझ्या पुढील वर्षाच्या शुल्काची तजवीज झाली. खरे म्हणजे माझ्या प्रवासात भेटलेला पहिला एकनाथ! माझ्यासारख्या गरजवंत गाढवाला पाणी पाजायला निरपेक्षपणे, तत्परतेने पुढे आलेला! पुढच्या वर्षासाठीही त्यांनी आमंत्रण देऊन ठेवले.
पुढे मी टंकण खNयांकडूनच शिकलो. ते ऐंशीच्या वेगाने मशीन हाताळत. मला ती पात्रता आली नाही. पण टंकलेखन यंत्रावर चित्रे काढता येण्याइतपत मशिनची मला चांगली ओळख खरेंच्या कृपेने झाली. पिवळट पडलेली ती चित्रे आज पाहाताना त्या चित्रांमागून खNयांचा हंसरा चेहरा डोकावत राहातो. आज इतक्या दूरवर आल्यानंतर ते एकनाथ कुठे असतील, कसे असतील हे समजणेही कठीणच.