स्प्रिंग उत्तपा

  • इडली-डोसाचे तयार पीठ अर्धा कीलो ( पीठ पातळ नसावे.)
  • दोन गाजरे किसून
  • दोन पातीचे कांदे- पात बारिक चिरुन, कांद्याचे पातळ उभे काप करून
  • दोन वाट्या बारिक चिरलेला कोबी
  • अर्धी वाटी पातळ चिरलेली फरसबी
  • एक सिमला मिरची पातळ उभी चिरून
  • अर्धी वाटी मक्याचे कोवळे दाणे
  • अर्धी वाटी सोललेले मटार
  • दोन चमचे सोया सॉस, थोडी मिरी पावडर, दोन चमचे तिखट व चवीपुरते मीठ
  • चार चमचे तेल
३० मिनिटे
तीन माणसांकरीता.

कढईत दोन चमचे तेल टाकून मोठ्या आंचेवर ठेवावे. तेल चांगले तापले की त्यात किसलेले गाजर, बारिक चिरलेला कोबी, सिमला मिरची, कांद्याची पात, मक्याचे दाणे, मटार अन फरसबी त्यावर टाकावे. आंच कमी करू नये मात्र सारखे परतत राहावे. पाच मिनीटांनी त्यात सोया सॉस, मिरी पावडर आणि तिखट घालावे. परतणे चालूच ठेवावे. थोड्याच वेळात भाज्यांना चकाकी दिसू लागेल तसेच अर्धवट शिजल्यात हे जाणवेल. मग त्यात अंदाजाने मीठ घाला. सोया सॉस मध्ये मीठ असते हे लक्षात घेउन घालावे. म्हणजे जास्त होणार नाही. अजून तीन-चार मिनीटांत हे सारण तयार होईल. कढईतून काढून घ्यावे. (थोडेसे कमी शिजलेले असले पाहिजे. )

डोसापॅन मोठ्या आंचेवर तापत ठेवावा. ( पॅन चिकटत असेल तर त्यावर आधी अर्धे भांडे पाणी घालून बुडबूडे येईतो तापवावे, मग ते पाणी फेकून द्यावे. आता पॅनवर उत्तपे चिकटणार नाहीत. ) एकदा का तवा नीट तापला की आंच मध्यम ठेवावी. डो्श्याचे पीठ डावाने पुऱ्यांच्या आकाराएवढे घालावे. ( सहा ईंच व्यास इतपत ) एकावेळी चार घालता येतात. त्यातील दोनांवर तयार केलेले सारण थोडे थोडे घालावे. सगळ्या उत्तप्यांच्या बाजूने तेल सोडावे. सोनेरी रंग आला की सारण नसलेले उत्तपे असलेल्यांवर टाकून थोडेसे दाबावेत. लागलीच प्लेट मध्ये काढावेत. हवे असल्यास मध्ये कापावेत. चटणी, टोमॅटो सॉस, जे आवडेल त्याबरोबर उत्तपे गरम गरम खावेत.
DSC00475DSC00474

सारण रंगीबेरंगी सुंदर दिसते अन चवही खूप छान लागते. डोश्याचे पीठ हवे तितकेच आंबलेले असेल तर अजुनच मजा येते. ज्यांना तळलेले स्प्रींग रोल खाता येत नाहीत किंवा खाताना खूप तेलकट आहे असे वाटते त्यावर हे स्प्रींग उत्तपे एकदम धावतील. करायलाही सोपे आहेत. भारतात कुठल्याही किराणावाल्याकडे आजकाल तयार डोसा पीठ नेहमीच मिळते. शिवाय गिटस इत्यादींची पाकिटेही मिळतात. घरात भाज्या थोड्या थोड्या उरल्या की काय करायचे ह्यावर उत्तम उपाय. घरातल्या सगळ्यांना आवडेलच. बटाट्याच्या भाजीचेही करता येतील. ( बऱ्याच वेळा बटाट्याची भाजीही उरते. ) इडलीचे पीठ घरात तयार केल्यास नक्कीच जास्त चांगले होतात.