वेदना ही आज माझी - अंतरीची साद आहे
देह माझा चंदनी अन चित्ती तुझा नाद आहे ।
जगताना जगले असे मी ध्यास तुझा घेउनी
उमगले अंती आता - श्वास माझा तूच आहे ।
दिवस चालती काळोखाला सांगाती घेउनी
रवी-शशी नभी असता अंधाराचे नाव आहे ।
सतत वर्षती अमृतधारा परोपरी धरेवरी
अंतरी स्मरणांचा धगधगणारा दाह आहे ।
वाटेवर चालता मिळे काटेरीच पखरण ही
रंग गंधी फुलाफुलांचा गाव तर दूर आहे ।
चांदण्यांची शुभ्र फुले - वेचियली मी येथे
भंगलेल्या स्वप्नांचा त्या आज मला शाप आहे ।
डोळ्यांनी माझीया आजही, घात माझा केला
सांगितले साऱ्यांना की दुः खाचा हा घाव आहे ।
ऱ्हुदयीच्या जखमा अशा अलवार मी त्या जपल्या
बोल कशी लावू ? - मम दैवाचे ते दान आहे ।