सामान्य माणूस आणि देशभक्ती

लहानपणी (स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा माझा जन्म) देशभक्तांसंदर्भात अभिमानाने त्यागाच्या खूप कथा ऐकल्या होत्या. मागील पिढीने उभारलेल्या चळवळी, प्राणांची ही पर्वा न करता इंग्रज सरकारशी दिलेली झुंज! सारेच अंगावर रोमांच उठवणारे! टिळक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सामान्य जनता देखील खूप काही करू शकते हे दाखवून दिले.

स्वातंत्र्यापूर्वीची  ही पिढी भाग्यशालीच म्हणायची!

आमचे काय? आम्हाला असा परकियांविरुद्ध लढा थोडाच उभारता येतो? आमची देशभक्ती दाखवायला वावच नाही!

नाही मित्र हो, परक्या शत्रूविरुद्ध लढणे म्हणजेच केवळ देशभक्ती नव्हे! देश म्हणजे काय फक्त येथील दगड-माती? नद्या-जंगले! इथला हा जिताजागता समाज म्हणजे देश! कदाचित महात्मा फुले, महर्षी कर्वे इंग्रजांविरुद्ध लढले ही नसतील! पण ते देशभक्त नव्हते असे म्हणायची कुणाची प्राज्ञा आहे? त्यांनी केलेल्या देशसेवेचे स्मरण करतच मला काही बोलायचे आहे.

सामान्य माणूस म्हणून मी माझी देशभक्ती कशी प्रगट करू शकतो?

१. मला माझ्या वाट्याला जे काही काम आले आहे ते प्रामाणिकपणे, हातचे काही ही न राखता, मनोभावे, हिरिरीने, झोकून देऊन करणे. (केवळ पाट्या टाकणे नव्हे).

'आमच्या इथे असं चालतं!' असे न म्हणणे!

२. या देशाचे जे काही कायदे कानू आहेत ते यथायोग्य रितीने पाळणे-

अ. कर-चुकवेगिरीस उत्तेजन न देता, सर्व व्यवहार करणे. काळा बाजार, अफरातफर, लाचलुचपत - स्वतः न करणे, इतरांना करू न देणे. त्यासाठी आवश्यक तो संयम बाळगणे.

२. वाहतूक नियमासारख्या साध्या नियमांचा देखील आदर करणे

हां, एखादा नियम अन्यायकारक किंवा अयोग्य वाटला तर तो बदलून घेण्यासाठी प्रयत्न करण्याचा जरूर हक्क आहे; मात्र जो पर्यंत तो बदललला जात नाही तो पर्यंत त्याचे पालन करायलाच हवे.

३. या समाजाशी माझे नाते घट्ट आहे हे लक्षात घेत जे काही करता येईल ते ते करणे-

"दीन भुकेला दिसता कोणी, घास  मुखीचा मुखी घालूनी" ही वृती अंगी बाणवणे! मग त्यात जेष्ठांसाठी बसमध्ये स्वतः उभे राहण्यासारखी मामुली गोष्ट देखील असू शकेल! तर कदाचित एखाद्या निरक्षराला साक्षर कण्याला मदत करणे असेल! जे जे जमेल ते ते करावे.

४. मतदान न विसरता करणे आणि मत देताना जातीपाती पलिकडे जाऊन व्यापक समाजहिताचा विचार करणे.

यादी खूप वाढवता येईल! पण सामान्य माणूस म्हणून एवढे तरी मी निश्चित करू शकतो.