एकमत

जिंका हारा पाडा झोडा एकमताने
सत्ता येता लोणी चापू एकमताने

टांगायाची बाकी आहे वेशीवरती
अब्रू लुटूया जत्रेनंतर एकमताने

देश आमचा तरुणाईचा पाहा झोपला
म्हातारे पोलाद म्हणवती एकमताने

सत्तेसाठी सोडले पाहा कमरेचेही
नागवा म्हणती समोरच्याला एकमताने

सत्तेच्या सर्कशीत नाही मजा राहिली
विदुषकांनी केला गोंधळ एकमताने

सारे लढती खुर्चीसाठी प्राणपणाने
वाऱ्यावरती देश सोडला एकमताने

तरीही वेड्या आशेने मत देतो आहे
राज्य स्वतःचे चालवेन या एक मताने

-ऋषिकेश
(२५/०४/०९), पुर्वप्रसिद्धीः मिसळपाव. कॉम