चिरंजीव

विमनस्क अवस्थेत मी बसलो होतो. सर्वदूर झगझगता, आंधळे करणारा प्रकाश पसरलेला असावा, आणि त्या प्रकाशात डोळे इतके दिपावेत की पुढचे काहीच दिसू नये तसे मला झाले होते.

पावसाळी दमट हवेत लोखंडी भांड्यावर हळूहळू गंज चढावा तसा तो समोर अवतीर्ण झाला. घंटेच्या निनादत राहणाऱ्या नादाप्रमाणे त्याच्या व्यक्तीमत्वात एक अथांग सहजता होती.

"आता तूच सांग, या परिस्थितीत मी करू तरी काय? ज्यांना मी आत्तापर्यंत आपले समजत होतो, ज्यांच्याशी संवाद साधण्यात मला काहीच अडचण नसल्याची खात्री होती, त्यांनी आज थंडपणे, विचारपूर्वक माझ्या तोंडावर असे बोलावे?"

त्याच्या चेहऱ्यावर काहीच बदल उमटले नाहीत. त्याच्या बोलण्यात मात्र चित्त्याच्या चालीचा अलगदपणा होता.

"हं. हे त्यांचे चुकलेच, नाही? त्यांनी तुझ्या पाठीवर काय वाटेल ते बोलायला हरकत नव्हती. पण तोंडावर? छे छे. फारच वाईट. की क्षुद्र, दुष्ट, नीच म्हणू? अखेर शब्द काही तोंडातून बाहेर पडताना स्वतःच्या अस्तित्वाची कारणमीमांसा मागत नाहीत."

माझी तगमग आणखी वाढली.

"तुला असले बोलायला ठीक आहे. तू काही माझ्यासारखा जमलेला डाव उधळून नवीन डाव मांडायला निघाला नाहीयेस. अखेर माझ्या हातात आत्ता आहे काय? तर रंगीबेरंगी दोरांचे असंख्य तुकडे. एक धड नाही. एकालाही अर्थ नाही."

"एकाच रंगाचा दोर असता तर तेवढ्यामुळे त्याला अर्थ आला असता? रंगांधळ्या माणसाला मग सगळेच अर्थपूर्ण वाटेल. आणि सगळे जग एकेका रंगामागे धावत असताना वेगवेगळ्या रंगाच्या तुकड्यांतून अर्थपूर्ण जीवन आकारणे यातच खरे आव्हान आहे असे तूच ठरवलेस ना? ते ठरवणारा तुझ्या निर्णयशक्तीचा भाग अजून जिवंत आहे ना? मग मध्येच अशी चलबिचल का? आणि समजा तुला एकाच रंगाचा तुकडा मिळाला, तर तो जितका मिळेल त्यापेक्षा अजून मिळायला हवा होता म्हणून तू कायम दु:खी कशावरून राहणार नाहीस? निर्णय घेणे सर्वस्वी तुझ्या हातात नाही हे कबूल. पण म्हणून काहीच अंमलात आणायचे नाही असे ठरवलेस तर तू जिवंत कशावरून?"

"म्हणजे त्याबाबत विचार करायचाच नाही? मग तरी मी जिवंत कशावरून?"

"हां, हां, थांब. एकदम दुसरे टोक गाठू नकोस. विचार जरूर कर. पण तो एका जागी थांबून नव्हे. आणि चालत असताना सवयीचा रस्ता आहे म्हणून डोळे मिटून घेऊ नकोस. अखेर, तुझ्या प्रवासाला सुरुवात आणि शेवट रेखले गेले आहेत. त्या दरम्यानचा भाग तुझा आहे. त्यात काहीही कर. सरळ रेघ मार, चित्रविचित्र आकार निर्माण कर. पण ते अशा ताकदीने कर, की त्यातल्या प्रत्येक बिंदूबद्दल, अगदी तुझ्या मनाबाहेर उमटलेल्यादेखिल, तुला अभिमान वाटेल, आत्मविश्वास वाटेल.

"या सृष्टीत तो जगन्नियंता अनाकलनीय संगीत आळवीत बसला आहे. त्याला आदिअंत नाही. म्हणूनच अर्थही नाही. बंधने असल्याखेरीज स्वातंत्र्य मिळत नाही. तुझ्यावरची जन्ममृत्यूची बंधने स्वीकारून तू एक तुझा असा राग उभा कर."

"पण, पण तू आहेस तरी कोण?"

"मी? हं! भक्तीचा एकरंगी अथांग दोर जोडण्यात माझ्या आयुष्याचा आदिअंत नाहीसा झाला, असा चिरंजीव मी."

शेपूट फलकारून तो नाहीसा झाला.