..........................................
पालखी....!
..........................................मिटल्यां डोळ्यांपुढे सारखी झगमग कसली तरी!
निर्विचार मी.... तरी अंतरी तगमग कसली तरी!पलीकडे जायचे... जायचे, नक्की ठरले अता...
राग-लोभ अन् रुसवे-फुगवे... सारे सरले अता...
तिकडे न्यावे असे न येथे काही उरले अता...
काळजास का लागत आहे पण रग कसली तरी?उगीच काहीतरी शोधले; हिंडत बसलो उगी...
वाटसरूंशी उगी बोललो... रडलो, हसलो उगी...
पाय निघेना इथून, दमलो... उगीच फसलो, उगी...
अता थांबलो; तरी जाणवे दगदग कसली तरी!पाहत आहे अलिप्ततेने कुणीतरी पण मला...
मीच जणू तो, असे भासले दोन-चार क्षण मला...
स्मरे मला मी, तोच विस्मरे माझे मीपण मला...
आठवणींची उरी अशी ही लगबग कसली तरी!उठा-ठेव जन्मांची पण ही करू सारखी कुठे?
प्रवास पुढचा कसा? जायचे अता आणखी कुठे?
पुन्हा नव्याने अशी न्यायची जुनी पालखी कुठे?
तडफड कुठली तरी पुन्हा अन् धगधग कसली तरी!- प्रदीप कुलकर्णी
..........................................
रचनाकाल ः ५ मे २००९
..........................................