अगदी विचित्र सारे

अगदी विचित्र सारे देवा तुझे नजारे
फटका बसे कुणाला, भलताच बोंब मारे

वाटायचे भलेसे कसब्यात राहणारे
फोफावली तिथेही बुधवार पेठ का रे?

गतिरोधकास नाही अस्तित्व ज्या ठिकाणी
धावा तुफान वेगे अन वाजवा नगारे

खपली बरी निघाली लपवून ठेवलेली
प्रस्थापितांस आता घ्या रे हसून घ्या रे

सर्वांसमोर यांचे चारित्र्य शुद्ध आहे
करतात काय सोडा, लावून घेत दारे