बाँब संहारक,
सारं उध्वस्त करणारा
बाँब निर्दय,
दयामाया न दाखविणारा
बाँब अमानवी,
मानवाची पाळंमुळं उखडू पाहणारा
सारं खरं !
तरीही.......
बाँब इमानदार,
कधीच न फसविणारा
बाँब आज्ञाधारक,
आदेश प्रश्न न विचारता पाळणारा
बाँब वक्तशीर,
ठरलेली वेळ कधीच न चुकविणारा
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे
बाँब धर्मनिरपेक्ष,
सर्व जाती-धर्माच्या देहांच्या
सारख्याच चिंधड्या उडविणारा