तयांचे व्यर्थ न हो बलिदान ( अंदमान पर्व)

ध्येयाने भारलेला मनुष्य जेव्हा संग्रामात उतरतो तेव्हा त्याला जीवनाची आशा नसते आणि मृत्युचे भयही नसते. अखेर बलाढ्य शत्रूही अशा वीरांपुढे हतबल होतो. हिंदुस्थान प्रजासत्ताक सेना, युगांतर, अनुशिलन चे क्रांतिकारक हे ध्येयवादाचे प्रतिक आहेत. हाती शस्त्र घेउन रणांगणात उतरलेले हे योद्धे. काही आपल्या कार्यात धारातिर्थी पडले, काही शत्रूच्या गोळ्यांना बळी पडले, काही फासावर चढले आणि आपल्या हौतात्म्याने हिंदुस्थानच्या इतिहासात अजरामर झाले. मात्र या सशस्त्र संग्रामपर्व गाजविणाऱ्या संघटनांमध्ये कार्यरत असलेले अनेक वीर इंग्रजांच्या हाती जीवंत सापडले आणि अभियोग दाखल होऊन जन्मठेपेला गेले. अर्थातच अंदमानच्या काळ्या पाण्यावर.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या अंदमानात या वीरांनी एक नवे हौतात्म्यपर्व निर्माण केले. या नरसिंहांना दात व नखे काढून अंदमानच्या नरकात साखळदंडाने जखडून टाकल्यावर आपण जिंकलो असे इंग्रजांना वाटू लागले. मात्र सिंह पिंजऱ्यात असला, जर्जर असला तरी तो मरेपर्यंत सिंह असतो हे इंग्रज विसरले होते. आपण या भयंकर वीरांना छळून, तडफडून मरणाची वाट पाहायला लावणार आणि सूड उगवणार हे इंग्रजांचे स्वप्न. मात्र इंग्रजांचा हा मद उतरविणारे महाभाग या अंदमानात पोहोचले आणि नवा इतिहास घडला.

अंदमानात १२ मे १९३३ रोजी आमरण उपोषण सुरू झाले. या आधीही एक दोन वेळा अशी चळवळ झाली होती मात्र अनेक कारणांमुळे तिला यसह आले नव्हते. अगदी अलिकडचा त्या आधिचा प्रयत्न ३ जानेवारी १९३३ चा. मात्र १९३३ मध्ये राजकीय बंदिवानांची नवी तुकडी अंदमानात दाखल झाली आणि लढा उभा राहीला. इथे असलेले बंदिवान हे खुनी वा दरोडेखोर नव्हेत तर ते राजद्रोहाचा आरोप असलेले राजकिय कैदी आहेत आणि त्यांना जुलुमी सरकार अमानुष वागणुक देउ शकत नाही हे दाखवून देण्यासाठी जीवनाची आसक्ती आणि मृत्युचे भय यापासून मुक्त असलेल्या अंदमानच्या वीरांनी आमरण उपोषणास १२ मे १९३३ रोजी प्रारंभ केला. आम्ही तसेही मरणारच आहोत तर छळाने पिचून मारल्याचे समाधान सरकरला लाभू न देता आम्ही आमच्या मर्जीने ताठ मानेने मरू आणि जुलुमी इंग्रज सरकारला झुकायला लावू हा निर्धार होता. या आधी हेच दिव्य हुतात्मा जतीन दास यांनी लाहोर कारागृहात तर हुतात्मा मणींद्रनाथ बॅनर्जी यांनी फतेगढ तुरुंगात करून दाखविले होते.

या आमरण उपोषण पर्वात एकाहून एक असे महान क्रांतिकारक उतरले होते. हुतात्मा महाविरसिंह, जयदेव कपूर, कमलनाथ तिवारी, हुतात्मा मोहित मित्र, हुतात्मा मनकृष्ण नामदास उर्फ मोहन किशोर दास, बटुकेश्वर दत्त, विजयकुमार सिन्हा, शिव वर्मा, गया प्रसाद, अंबिका चक्रवर्ती, लोकनाथ बोल, गणेश घोष, अनंत सिंग, आनंद गुप्त, रणधीर दासगुप्त, फकिर सेन असे धुरंधर उतरले होते. आम्ही चोर दरोडेखोर नाही, आम्ही आमच्या मातृभूमिच्या मुक्तीसाठी रणात उतरलेले योद्धे आहोत, आम्ही सरकारच्या नजरेत राजद्रोही असलो तरी प्रत्यक्षात योद्धे आहोत आणि आम्हाला भयानक यातना देत अमानवी जीवन जगायला सरकार भाग पाडू शकत नाही; अंदमानची दहशत निर्माण करून सरकारला हिंदुस्थानचा क्रांतिसंग्राम चिरडू देणार नाही या निर्धाराने हे सर्व क्रांतिकारक अखेरच्या संग्रामात उतरले.

सरकारने हा प्रयोग मोडून काढण्यासाठी या उपोषणार्थींना जबरदस्तीने अन्न देण्याचा प्रयत्न सुरू केला. पण गाठ होती हुतात्मा महाविरसिंहांशी! हे असले प्रयोग त्यांनी पूर्वी लाहोर तुरुंगात पचवले होते. त्या लाहोरच्या उपोषणात हुतात्मा महाविरसिंहानी तुरुंगाधिकारी व पोलीसांना सळो की पळो करून सोडले होते. जेव्हा दूध, रबरी नळ्या वगैरे साहित्य घेउन सरकारी लवाजमा कोठडीच्या दारात येई, तेव्हा प्रथम ते कोठडीचा दरवाजा आपल्या भक्कम देहाची ढाल करून लढवित. उपाशी असलेला कैदी अनेक शिपाई रेटा लावत असताना देखिल एकट्याने दरवाजा उघडू न देता लावून धरतो याचे पोलीसांना आश्चर्य वाटत असे आणि संतापही येत असे. एकदा दरवाजा उघडला की त्यांना दूध पाजण्यासाठी आडवे पाडणे हे दिव्य करावे लागत असे. बलदंड देहाचे हुतात्मा महाविरसिंह आपल्या छाताडावर बसणाऱ्या शिपायाला अचानक एक झटका देउन पाडीत असत. अखेर ते जखडले गेले की नळी घशात घालायचा प्रयत्न करताच ते मानेला हिसडा देउन तो प्रयत्न हाणून पाडीत असत. मग नळी घुसवली तरी ती नळी ते दातात दाबून टाकत असत. पुढे हुतात्मा महाविरसिंहांची रवानगी बेल्लारी तुरुंगात व तिथून अखेर अंदमानला झाली. अंदमानात गेल्याचे भय तर दूरच मात्र बटुकेश्वर दत्त, विजय कुमार सिन्हा वगैरे आपले जुने साथी पुन्हा एकदा आपल्याला भेटले याचा आनंद त्यांना झाला. आपली रवानगी अंदमानला झाल्याचे वर्तमान त्यांनी तुरुंगातून पत्राद्वारे आपल्या पित्याला; श्री देविसिंह यांना कळविले तेव्हा मुलाच्या पुन्हा कधी न दिसण्याचा शोक न करता त्या बापाने मुलाला लिहिले "अंदमान म्हणजे साक्षात पैलुदार हिऱ्यांचा टापू, सरकारने तिथे अश्या अनेक हिऱ्यांचा संग्रह केला आहे तेव्हा तुलाही त्यांच्या सहवासाने आता तेज लाभेल"

उपोषणाच्या पाचव्या दिवशी म्हणजे १६ मे १९३३ रोजी उपोषण मोडण्यासाठी पोलीस व तुरुंगाधिकारी हुतात्मा महाविरसिंहांच्या कोठडीत शिरले. पुन्हा तोच जबरदस्त प्रतिकार आणि पुन्हा सरकारचा पाशवी बळाचा वापर. अखेर झटापटीत पोलीस यशस्वी ठरले आणि नळ्या घुसवल्या. मात्र आपल्या मनोनिग्रहाने हुतात्मा महाविरसिंहानी प्रतिकार केला आणि दूध अन्ननलिके ऐवजी श्वासनलिकेत शिरले. हुतात्मा महाविरसिंहांना श्वास घेणे जड होऊ लागले. संध्याकाळी त्यांची तब्येत भयंकर खालावली आणि दिनांक १७ मे च्या पहाटे त्यांना हौतात्म्य लाभले. मात्र या गोष्टीचा कैद्यांमध्ये व बाहेर बोभाटा होऊ नये यासाठी अंधारात हुतात्मा महाविरसिंहांच्या देहाला दगड बांधून त्यांचा मृतदेह समुद्रात फेकण्यात आला. आणि हुतात्मा महाविरसिंहांनी आपल्या प्रिय नेत्याची, आपल्या आदर्शाची, आपल्या दैवताची बरोबरी साधली. हुतात्मा भगतसिंह, हुतात्मा सुखदेव व हुतात्मा राजगुरू यांची सरकारला जिवंतपणी तर धास्ती होतीच पण मृत्युनंतरही त्यांच्या मृतदेहाचे देखिल सरकारला इतके भय होते की त्यांचे देह मरणोत्तर संस्कार न करता फाशी अमलात येताच घाईघाईने तुकडे करून त्यांचे मृतदेह पोत्यात भरून नष्ट केले गेले होते. तोच मान हुतात्मा महाविरसिंहाना मिळाला, त्यांची भीती सरकारला त्यांच्या मृत्युनंतरही सोडत नव्हती.

मात्र याचा परिणाम इतर आंदोलकांवर अजिबात झाला नाही उलट ते आणखी इरेला पेटले. हाच जबरदस्तीने अन्न नळीने नाका-तोंडातून घुसवण्याचा प्रयोग त्या नंतर झाला तो हुतात्मा मोहित मित्र यांच्यावर. हुतात्मा मोहित मित्र यांचा जन्म गाव नतून-भरेंगा, जिल्हा पाबना (आता बांगला देशचा भाग) येथला. हुतात्मा मोहित मित्र हे अनुशिलन चे कार्यकर्ते होते आणि ते ५ वर्षांच्या शिक्षेवर अंदमानला आले होते. त्यांना शस्त्रास्त्र कायद्याखाली अटक करण्यात आली होते, ते मास्टर सूर्यसेन यांचे समकालीन होते. अन्न जबरदस्तीने घुसवण्याच्या प्रयोगात त्यांना न्युमोनिया झाला व २० मे रोजी त्यांना हौतात्म्य लाभले. कागदोपत्री त्यांचा मृत्यू हा उपोषणाने झाला नसून तो आजाराने नैसर्गिक मृत्यू होता असे दाखविण्यात आले. पुढे त्या अहवालाला कायदेशीर आव्हान दिले गेले.

पुढचा मान होता हुतात्मा मनोकृष्ण नामदास उर्फ मोहन किशोर दास यांचा. त्यांचा जन्म मैमनसिंग (आता बांगलादेश) येथला. त्यांना बंगाल मधील सशस्त्र क्रांतिसंग्रामात भाग घेतल्यबद्दल अंदमानला रवाना केले होते. याच्या एखाद दोन दिवसच अगोदर आणखी एक बंगाली क्रांतिकारक बिधू भूषण सेन हेही मृत्युच्या दारात पोहोचले होते; त्यांच्या फुफ्फुसांना जबरदस्तीने अन्न घुसविण्याच्या प्रयत्नात सूज आली आणि परिणामत: त्यांच्या नाकपुड्यांमधून रक्त वाहू लागले, त्यांना तातडीने इस्पितळात दाखल करण्यात आले व त्यांचे प्राण वाचवीले गेले. अर्थातच हुतात्म मनोकृष्ण यांचा मृत्युही उपोषणाशी अजिबत संबंधित नसून तो नैसर्गिक मृत्यू होता असा खोटा वैद्यकिय अहवाल सफाईदारपणे सादर करण्यात आला. मुख्य आयुक्तांनी साळसूदपणे जाहिर केले की हे मृत्यू नैसर्गिकच होते आणि दोन अपवाद वगळता सर्व उपोषणार्थींची प्रकृती स्थिर आहे!

’कि तोडीला तरू फुटे आणखी भराने" या उक्तिला अनुसरून जुलुमी सरकार जो जो आंदोलन दडपायला पाहत होते, तो तो अधिकाधीक क्रांतिकारक उपोषणात सहभागी होऊ लागले आणि हुतात्मा मनोकृष्ण यांच्या मृत्यू नंतर आमरण उपोषण करणाऱ्या क्रांतिकारकांची संख्या तब्बल ३९ वर पोचली. मारणारे थकत होते पण मरणारे संपत नव्हते. या काळात सरकारी आणि हिंदुस्थानी स्वातंत्र्यवादी अशा दोहोबाजुंनी या उपोषणाला संलग्न अशा घडामोडींना वेग आला. हे उपोषण हाताळण्यासाठी;   खास करून मोडण्यासाठी लेफ्टनंट कर्नल बार्कर याला पाचारण करण्यात आले. या बार्करला लाहोर तुरुंगातील उपोषणाचा अनुभव होता. बार्करने तेथे पोहोचताच या राजबंद्यांना दिवसातून किती वेळा काय व कसे अन्न द्यायचे याच्या योजना आखल्या. मात्र दगडी तटबंदीप्रमाणे उपोषणकर्त्यांचा निश्चय अभेद्य होता. अंगातले त्राण सरत आले तरी प्रतिकार व स्वाभिमान कायम होता. जे सरळ सरळ मृत्युकडेच झेपावले होते त्यांचे त्यापलिकडे कोण व काय वाकडे करू शकणार? बार्कर साहेबाला हळुहळू सदबुद्धी सुचू लागली. नाईलाजास्तव अन्न देण्याचे प्रयत्न दिवसातून चार ऐवजी कमी करण्यात आले. अन्नाचा भर कमी करण्यात आला. मग ’जंतुसंसर्गाचा धोका लक्षात घेता’ गपचुप नाकपुड्यांमधून नळ्या घुसविणे बंद केले गेले. इकडे कितीही दडपल्या तरी अंदमानच्या बातम्या इकडे पोचत होत्या. जनतेचा क्षोभ व नेत्यांचा अस्वस्थपणा वाढू लागला. कलकत्त्यात या तीन हौतात्म्यांची बातमी पोचताच संतापाची लाट उसळली. कलकत्त्याच्या अल्बर्ट सभागृहात नगराध्यक्ष संतोष कुमार बोस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत दोन ठराव मांडले गेले - पहिला म्हणजे "कलकत्त्यातील समस्त जनता अंदमानातील उपोषण व त्यात तिघांना प्राप्त झालेले हौतात्म्य यामुळे संतप्त तसेच चिंतित झाली आहे. या प्रकरणाची ताबडतोब जाहिर चौकशी करण्याची करण्यात यावी" अशी मागणी तर दुसऱ्या प्रस्तावाद्वारे मध्यंतरी खंडीत झालेली राजकिय कैद्यांना अंदमानला हद्दपार करण्याची प्रथा पुन्हा सुरू करण्याचा निषेध केला गेला.

दिनांक ५ जून १९३३ - आमरण उपोषण्कर्त्यांची संख्या ४५ वर गेली. वास्तविकत: १३ जुनला विधान परिषदेचे मननिय सदस्य श्री अजहार अली, श्री अमर नाथ दत्त, बी. व्ही. जाधव, एस, सी. जोग, बी. एन मिश्र, एस सी मित्र, गय प्रसाद सिंग आणि के. बी. हे गृहस्मितीचे सदस्य सर हॅरी हेग यांना भेटले होते. त्यांनी अंदमानला कैदी धाडण्याची बंद केलेली प्रथा मोडून लाहोर, जलालाबाद व अन्य कटातील क्रांतिकारकांना पुन्हा काळ्या पाण्यावर पाठविणे, तिथली हवा, रोगराईजन्य परिस्थिती, यातनामय तुरुंगवास, अमानवी वागणुक, उपोषण व त्यात झालेले मृत्यू या बाबत सदस्यांनी हेग यांना जाब विचारला. उपोषणकर्त्या हुतात्म्यांचे मृत्यू हे अकुशल रित्या हलगर्जीपणे अन्न जबरदस्तीने देण्याचा प्रयत्न केल्यामुळेच झाल्याचा आरोप सदस्यांनी सरकारवर केला. सर्व सदस्यांनी सरकारने आंदोलकांची नावे जाहिर करावीत कारण या बातमीमुळे अंदमानला धाडण्यात आलेल्या सर्व राजबंद्यांचे नातेवाईक चिंताग्रस्त व शोकाकुल आहेत व त्यांना सत्य परिस्थिती समजलीच पाहिजे असा आग्रह धरला. मात्र उद्दाम व उन्मत्त हेगने हे सर्व आरोप फेटाळून लावीत सर्व कैद्यांची प्रकृती स्थिर आहे; अपवाद वगळता सगळे उपोषणकर्ते समंजसपणे नळीद्वारे अन्न घेत आहेत असा कांगावा केला. वर हेग यानी आता परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी बार्करला पाचारण केल्याची दर्पोक्तिही केली. मात्र आता जनजागृती तीव्र झाली होती. जनता, वृत्तपत्रे, राजकिय व्यक्तिमत्त्वे आणि राजकिय पक्ष या सर्वांचे लक्ष अंदमान कडेच लागले होते. दिनांक १६ जुनच्या फ्री प्रेस जर्नल मध्ये निरंजन सेन गुप्त, सतिश प्रकाशी, सुधान्शू दास गुप्त, निशिकांत चौधरी, नारायन रॉय, भुपाल बोस, बटुकेश्वर दत्त आणिंद सुशिल दास गुप्त या राजबंद्याची नावे उपोषणकर्ते म्हणून प्रसिद्ध झाली. पुढे श्री. विनायक विठ्ठल काळीकर यांनी या नावांचा राज्य संसदेत पुनरुच्चार केला व सरकारनेही त्याला विरोध केला नाही. बार्करला अंदमानच्या ११२ पैकी ५५ राजबंदी आमरण उपोषणात सामिल असणे जड गेले. अखेर तीन राजबंद्यांचे हौतात्म्य, ५५ राजबंद्यांचा वज्रनिश्चय आणि वाढता जनक्षोभ यापुढे बार्करचा ताठा व सरकारचा जुलुम पराभूत झाला. दिनांक २६ जून १९३३ रोजी उपोषण समाप्त झाल्याचे वृत्त देताना हेग यांनी हलकटपणे ’हे आंदोलन उपोषणकर्त्यांनी बिनशर्त मागे घेतले असल्याचा निखालस खोटा दावा केला. मात्र पुढे प्रत्यक्ष उपोषणकर्ते श्री. धिरेंद्रनाथ चौधरी यांनी खरी हकिगत सांगितली ब तिला श्री. विजय कुमार सिन्हा यांच्या कथनातुनही दुजोरा मिळाला - ते सत्य असे की सरकारने सर्व मागण्या मान्य केल्याचे व न मागितलेल्या सोयी-सुविधा देखिल बहाल केल्याचे सांगत २६ जुनला अंदमानच्या अंदमानच्या मुख्य आयुक्ताने काही उपोषणकर्त्यांना सांगत आता उपोषण संपवण्यास सांगितले. मात्र हा कुणा एकाचा निर्णय नसून हा सर्वांचा निर्णय असल्याचे आंदोलकांनी ठणकावून सांगितले व सर्वांना एकत्र आणून सर्वांसमोर जाहिर कथन करण्याची मागणी केली व त्याप्रमाणे सर्वांना रुग्णशय्येसह एकत्र आणण्यात आले व मुख्य आयुक्ताने सर्वांना सांगितले की राजकिय दर्जा, मानवी वर्तणुक, माणसाला खाता येइल असे अन्न, अमानुष कष्टाच्या शिक्षा रद्द करणे, वैद्यकिय सेवा, वृत्तपत्रे या सर्व मागण्या मान्य केल्या गेल्या आहेत व आता उपोषणाची गरज नाही. लवकरच म्हणजे जानेवारी १९३४ मध्ये सर्व राजबंद्याना त्यांच्या तक्रारींची सुनावणी करून देण्यात आली. अंदमानवर नवा वटहुकुम जारी झाला आणि नरकराज्य संपुष्टात आले. अर्थात इंग्रजांनी सरकारला घातक वाटक वाटणाऱ्या ज्वलज्जहाल क्रांतिकारकांना अंदमानला पाठविणे बंद केले नाही; ते १९३७ पर्यंत चालू होते परंतु अंदमानचे ’नरक’ किंवा ’छळछावणी’ हे स्वरुप मात्र नष्ट झाले.

"तुम्ही आम्हाला पिचवून काय माराला? आम्ही स्वत:च मृत्युला सामोर जात आहोत; आता आम्हाला तुमचे भय नसून तुम्हालाच आमचे भय निर्माण होईल. आणि त्यासाठी प्राण गेले तरी बेहत्तर" या वज्रनिश्चयाने क्रांती व क्रांतिकारक यांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी व भावी काळात अंदमानात राजबंद्यांना नरक यातना भोगायला लावून त्यांचा कणा मोडायचा व पर्यायाने क्रांतिमार्गावर येण्यापासून हिंदुस्थानी तरुणांना परावृत्त करण्याचा सरकारचा कुटील डाव हाणून पाडण्यासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या हुतात्मा महाविरसिंह, हुतात्मा मोहित मित्र व हुतात्मा मनोकृष्ण नामदास यांना हुतात्मा महाविरसिंह यांच्या हौतात्म्यदिनी सादर अभिवादन.