हिंदीची आवश्यकता...

सर्वांना सर्वच भारतीय भाषा शिकणे शक्य नाही. त्यासाठी सर्वांना समजेल अशी एक सामायिक संपर्कभाषा असणे व्यावहारिक दृष्ट्या आवश्यक आहे. आणि अशा भाषेचा शोध घेताना ती हिंदीच असू शकते हे निर्विवाद! त्यामुळेच भारतीय एकात्मतेसाठीच हिंदीचा प्रचार व प्रसार आवश्यक ठरतो. आज देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत सहज समजू शकणारी भाषा इंग्रजी नसून हिंदीच आहे!

राज्यकारभाराची भाषा ही परकीय असू नये, हा विचार फार पुरातन काळापासून मान्य झालेला आहे. जनसामान्यांना हे राज्य आपले आहे असे वाटायचे असेल तर हे आवश्यक आहे. शिवाजीराजांनी याच विचारातून राज्यव्यवहार कोशाची निर्मिती करून त्या काळात प्रचलित असणाऱ्या अरबी-फारसी शब्दांना मराठी पर्यायी शब्दांची निर्मिती केली. नेमका हाच विचार डोळ्यासमोर ठेवून भारतीय राज्यघटनेमध्ये १९६५ पासून इंग्रजीचा वापर थांबवण्याचा विचार मांडला  गेला होता.

दुर्दैवाने हिंदी लोकप्रिय करण्यात आपण कमी पडलो. दैनदिन जीवनात आजही हिंदीचा रस्त्यारस्त्यावर वापर होतो, पण कार्यालयीन भाषा म्हणून तीचा म्हणावा तेव्हढा वापर होताना दिसत नाही. इंग्रजी कमी व्हायला हवी होती ती झालीच नाही. खेड्यापाड्यातील हजारो लोकांच्या माथी आज इंग्रजीच मारली जात राहिली. आम्ही तर आता खुल्या मनाने इंग्रजीचेच समर्थक बनलो. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुलाला पाठवणे प्रतिष्ठेचे लक्षण बनले! अगदी मराठीची किंमत मोजून देखील! 

हिदी खेरीज इतर भाषिकांच्या  सदैव धास्ती राहिली, की हिंदीवाल्यांच्या तुलनेत देशपातळीवर आम्ही कमी पडू. पण प्रत्यक्षात आज अगदी तामीळनाडूतील शेषन, चिदंबरम,  हेमामालिनी सारखे लोक देखील लीलया हिंदीवर अधिराज्य गाजवतात. अर्थात  भीती अनाठायीच दिसते.

हिंदीवाल्यांनी देखील हे समजून घेणे आवश्यक आहे की, जेव्हा हिंदी देशपातळीवर पोचत आहे तेव्हा ती हिंदी पट्ट्यात बोलल्या जाणाऱ्या हिंदीपेक्षा अलग असणारच! अहिंदी त्याच्या-त्याच्या ढंगानेच बोलणार! मग आमचा एखादा मराठी खासदार अध्यक्षांना 'महाराज' म्हणाला तरी हिंदीवाल्यांनी बिचकून जाता कामा नये. हिंदीचे प्रचारक असणाऱ्या आर. आर. आबांना सुद्धा या हिंदीवाल्यांमुळे खुर्ची गमवायला लागत असेल तर हिंदी लोकप्रिय कशी व्हावी?

अहिंदी भाषिकांना हिंदी भाषिकांची दादागिरी अणखी एका कारणाने खुपते. हिंदी भाषिकांचा दुराग्रह! हे हिंदी भाषी इतर कोणतीही भारतीय भाषा शिकायला खळखळ करतात. त्यांचे अडत नाही, मग कशाला दुसरी भाषा शिका?  तीस वर्षे पुण्यात  राहिलेला अधिकारी जेव्हा "मुझे मराठी आती नहीं" म्हणतो तेव्हा कुणा मराठी माणसाला राग येणार नाही? या  त्यांच्या हट्टाने देखील हिंदीचे नुकसानच झाले आहे.

मी देशभर फिरलो आहे. कर्नाटक, तामीळनाडू, आंध्र या सारख्या भागात देखील मला हिंदीला आंधळा विरोध जाणवला नाही. पण जेव्हा वर्चस्वाची भीती वाटते तेव्हा या प्रदेशिक अस्मिता टोकदार होतात. त्या किती टोकदार होऊ द्यायच्या यावर समाज म्हणून विचार व्हायला हवा.