अश्या द्विपदी रचाव्या....

फुलांचा त्याच येतो गंध, ज्यांना लाभतो वारा
कुणी अदृश्य बोटाने करे उद्ध्वस्त डोलारा

कुणा वहिवाट वाटावी असे आकाश नाही हे
'कसे उगवायचे' शिकतो इथे रोजी नवा तारा

तयारी कृष्णविवराची, भुका आकाशगंगेच्या
सहाय्ये धूमकेतुंची, तरी प्रतिभेस संथारा

जुनी ती अर्भके झाली अताशा ज्येष्ठ थोडीशी
कुणी मागीतला नाही तरी "हा लाव अंगारा"

कधी नंदी, कधी घंटा, कधी ती कासवे पिवळी
पुढेही ये जरासा यार, माझा शोध गाभारा

टुकारांची जिथे गर्दी तिथे टपरी तुझी का रे?
टुकारांच्यामुळे धंदा, टुकारांवीण पोबारा

तरूच्या पाच फांद्या कूळ त्यांचे सिद्ध करणाऱ्या
अश्या द्विपदी रचाव्या अन्यथा वाटेल तो चारा