एकेक दिवस

एकेक दिवस असा असतो
मी सार्‍यांना नकोसा भासतो
मनातल्या वाचाळ निंदकावर
मग सहजच विश्वास बसतो

एखादा दिवसच खास असतो
पहाटेच डोळा भिडवून हसतो
चालीत लकब, बोलीत चमक
प्रत्येक क्षण ‘हमखास’ असतो

कधी तो मला सामिल असतो
तरी तो कधीच गाफिल नसतो
अंधाराचा फायदा घेत, अलगद
रोज हातोहात निसटत असतो

दिवस रोज येत-जात असतो
तरी प्रत्येकदा नवीन असतो
रोज नव्यानेच भेटून मला
थोडा जुनाच करुन जात असतो

दिवस म्हणे कधी असाही उजाडतो
आवाज न करत निरोपाचा रडतो
कधी समजून, कधी नकळत
जन्माचा सहवास क्षणात सोडतो..