संगीतातला राजकुमार

बरेच दिवस तो येणार तो येणार हे माहीत होत. आणि मी नेहेमीप्रमाणे "मग! असेल तो रेहमान! म्हणून काय एवढ तिकीट ठेवायच का! " म्हणून शिव्या घालत हजार रुपयाला तडी दिली. तडमडत आम्ही (हे आदरार्थी एकवचन नव्हे, समानार्थी द्विवचन आहे. ) माझी एक रेहमानिया झालेली मैत्रिण आणि मी, कसे बसे वेळेवर पोचलो. आणि मग अशा सोहळ्यांना साजेश्या सावळ्या गोंधळात आम्ही आपले जागा धरून बसलो होतो. अशा ठिकाणी खाण्यायोग्य खाण्याचे पदार्थ विकले जाउ नयेत याची खबरदारी आयोजक नेहेमीच घेतात. आणि तरीही त्यांना आमच्यासारखे काहीही पचवणारे बकरे भेटतातच.
अत्यंत महाग आणि कुठल्याही टपरीवरच्या वडा-पावापेक्शा भिकारी असा वडा पाव पचवून आम्ही "तो" येण्याची वाट बघत होतो. पाठीमागची टवाळ पब्लिक नेहेमीप्रमाणे कोणीही आल की टाळ्या वाजवायची आणि आजूबाजूचे मोरू भाबडेपणाने मागे बघायचे.
          अस करता करता, लतादिदिंच दर्शन झाल... आणि मिर्चीवाल्यांच्या पचपचीनंतर, मंद निळ्या प्रकाशात रंगमंचावर प्रकाशझोत आला. पायरयांवर गिटार वाजवत एकाने गायला सुरुवात केली, बाकी साथीदार हळू हळू पुढे आले-पण... या सगळ्यात तो नव्हता... आणि मंचाच्या मध्यभागी जमिनीतून सरकत सरकत येणार्या प्रकाशाझोतात तो उभा होता... शुभ्र पांढर्या कपड्यात, निळ्या झोतात तो शांतपणे उभा होता. पब्लिक शिट्यामारून वेड झाल होत आणि पुर्ण मैदानात अल्ला रक्खा रेहमानच्या आवाजाने पुर्ण श्वासभरून साद घातली "जागे है देर तक... कुछ देर तो सोने दो..." पुर्ण मैदानात कोरस घुमला आणि स्वरांच्या या जादुगाराने आपली मोहीनी आकाशात विखरून टाकायला सुरुवात केली.
त्याच्या सुरांनी नशिल्या "मैया-मैया" - "रिंग रिंगा" सारख्या गाण्यांनी बेहोश केले. मंद हिरव्या प्रकाशात पेटीवर "ख्वाजा मेरे ख्वाजा " -"मौला मेरे मौला मेरे" म्हणत डोलायला लावल. ए. आर. रेहमानची जादू सुरांच्या नाजूक विणकामात आम्हाला बंद करत गेली.
मग आम्ही कराडसाहेबांची बकबक सहन केली. लतादिदिंचे बोल भक्तिभावाने ऐकले आणि लाडक्या राजकुमाराचा प्रत्येक शब्द झेलला. अशा ठिकाणी जमलेल्या उच्भ्रू लोकांनी अर्थातच टाल्ळ्या वाजवणे , हसणे अशा चिल्लर गोष्टींकडे पुर्ण दुर्लक्श केल. आम्ही मात्र त्याला आमचा आवाज ऐकू जावा म्हणून प्रयत्न करत राहिलो... एकूण रेहमानिया झालेल्यासाठी हा कार्यक्रम एक संधी होती त्यांच्या देवाला बघण्यासाठी आणि माझ्यासारखा "असले भरपुर बघितलेत" वाल्यासाठी हा कार्यक्रम एक मजेदार करम्णुक होता. पोलिसांची धावपळ, त्यांच्या मिष्किलपणा.. एकुण सावळो गोंधळ आवडला आणि गाड्यांच्या धुराळ्यात आम्हीही वारकर्यांप्रमाणे सामील होउन घरी चालते झालो.