तृषा
रोम रोमात माझ्या
भिनते तृषा ही आर्त
उमगे ना कुणाला
दाटे कसले आर्त ।
शुभ्रप्रपाती आशेच्या
एक मी अभोगी
जिंकूनी याज्ञसेनी
जसा, एकला पार्थ ।
उन्माद वेदनेचा
उधळीत जन्म जाई
माध्यान्ह आभाळीचा
जणू दाहक सूर्य ।
प्राणांस जाळिते ही
वंचना मनाची भारी
उठतो भयाण रानी
नाद कोवळा व्यर्थ ।
गात्रांतूनी उमलती
अगतिक दुःखे सारी
पूर्तता हो तयांची
मिसळूनी मातीत सार्थ ।