उरलेला गतकाल

उरले जे जगायचे, वाया क्षण गतकालीचे,
जगूनी क्षण साफल्याचे, माघारी तव फिरुनी यावे.

राहीले जे मिटायचे, वाद आप्त - परकीयांचे
निपटून सारे वाद, गोडी-गुलाबी परतूनी यावे.

राहीले जे अधुरे, स्वप्न मनातील जागपणीचे
स्वप्न साकारून मनीचे, समाधान जिंकून यावे.

उरले जे ऋण भाळीचे, संकटकाळी उपकाराचे
फेडून ऋण उपकाराचे, ऋणास त्या वंदूनी यावे.

राहीले जे जुळवावयाचे, आप्तसंबध माणूसकीचे
जोडूनी नाते माणूसकीचे, माणूस बनुनी माणसांत यावे.

राहीले जे योग्य फलाचे, कर्तव्य ते जीवनाचे
फळ मिळवून कर्माचे, कर्तव्यदक्ष बनुनी यावे.

राहीले जे भोगावयाचे, भोग जगल्या पापाचे
भोगून भोग गतकालाचे, उरले जीवन पुर्ण जगावे.