वाद - संवाद - १

कवी विरुद्ध समीक्षक :

कवीची चर्चेत असलेली कविता खालीलप्रमाणे:

मी एक सर्वव्यापी, सार्थ दुराभिमानाने ओसंडून वाहणारा,
निळ्या रंगाचा
उडता किडा....

तुम्ही रक्ताने भरलेले अशाश्वत, मर्त्य फुगे
चार हाडे, मांसाचे काही अनावश्यक साठे
मेंदूच्या जागी पिशाच्च्याचा पडीक पुरावा

तुमच्या पाताळयंत्री योजना
तुमची आकारहीन दुः साहसे
तुमचे मातकट रंगात लडबडलेले हेतू
तुमच्या कराल जबड्यातील गांडुळांप्रमाणे वळवळणाऱ्या जिभा
जिभा कसल्या त्या...
गांडुळेच ती

पायदळी तुडवणार मी
अन मग
खदाखदा हसणार


एक सदप्रव्रुती जिंकली म्हणून
पुष्पवृष्टी होईलही, पण
मी थुंकणार तिच्यावर

अन म्हणणार...

हे कस्पटासमान अस्तित्वहीन असलेल्या अन
विश्वातील एका स्वनिर्मीत कृष्णविवरात भयाने दडलेल्या
निमित्तमात्र 'ईश्वर' नावाच्या अमीबा?

मी नष्ट केले तुझे सारे अवशेष

एक जेता जात आहे या विश्वाला लाथाडून

काही भुते मुक्त झाली

काही मुक्त भूते झाले

आमेन!

चर्चाः

समीक्षक - हे काय आहे?

कवी - काय काय आहे?

स - हे जे लिखाण आहे ते काय आहे?

क - हा एका अजरामर, अतिबलवान सदप्रवृत्तीचा उगम आहे.

स - कशावरून?

क - असा शक्तीचा उगम कशावरूनही होत नसतो. तो आपोआप होतो.

स - हा 'उगम' आहे हे कशावरून?

क -  आपल्यामते हे काय आहे?

स - भंकस!

क - भंकस?

स - बोगस!

क - कशावरून?

स - बोगस कशावरून हे ठरू शकते. ते ठरवायला काही नियम आहेत.

क - काय नियम आहेत?

स - कवितेत सामाजिक भान, सर्वसमावेशकता, आवर्तनप्रधानता, निर्मीतीमागील हेतूची उपस्थिती, बुद्धी नावाच्या एका दैवी देणगीचा सुयोग्य वापर झाला आहे हे सिद्ध करणारी प्रासादिकता, रसोत्पत्ती, वक्रोक्ती, रीती, सौंदर्याची अभिलाषा असणे हे सिद्ध करणारी क्षमता या गोष्टी असायला हव्यात.

क - हे नियम मला अमान्य आहेत.

स - हे सर्वमान्य आहेत.

क - माझ्या या कवितेत हे सर्व आहे.

स - तुमच्या कवितेत किडा आहे.

क - विषयाच्या मर्यादा समीक्षकांना, कवींना नाहीत.

स - किडा सुंदर नसतो. त्यामुळे सौंदर्य नाही.

क - तो किडा निळा आहे.

स - तरीही तो किडा आहे. निळे तळे म्हणालात तर सौंदर्य येईल.

क - किड्याला संदर्भ आहे, तळ्याला नाही.

स - संदर्भहीन नसला तरीही किडा आहे.

क - तो किडा उडता आहे.

स - पण तो जो काही 'उडता' आहे तो 'किडा' आहे, 'घोडा' नाही.

क - हे अश्लील विधान वाटते.

स - अश्लीलता व सौंदर्य यातील सीमारेषा अस्पष्ट असतात.

क - सौंदर्य व समीक्षा यातील सीमारेषा प्रचंड असावी.

स - शिवाय त्या किड्याला दुराभिमान आहे.

क - ही प्रांजळता आहे त्या किड्याची!

स - किडे वगैरे प्रांजळ नसतात.

क - हे ठरवणार कोण?

स - शिवाय तो किडा सर्वव्यापी आहे.

क - मग?

स - किडा एवढा मोठा नसतो. व्यावहारिक दृष्टीकोनातून काव्य तपासणे आवश्यक आहे.

क - यालाच कल्पनाविलास म्हणतात.

स - हा कल्पनाविलास नाही.

क - मग काय आहे?

स - फक्त किडाविलास आहे.

क - किडा, किडा काय करताय?

स - तुम्ही ईश्वराच्या सर्वोत्कृष्ट निर्मीतीला, माणसांना, फुगे म्हणताय!

क - कवी काय वाट्टेल ते म्हणेल!

स - म्हणा! पण त्यात रसोत्पत्ती नाही.

क - मग काय ऊस म्हणू?

स - त्यात व्यावहारिकता नाही.

क - मग समीक्षक म्हणू काय?

स - त्यात सर्वसमावेशकता नाही. सगळी माणसे समीक्षक होऊ शकत नाहीत.

क - मग काय म्हणू?

स - माणसांना माणसे का नाही म्हणत तुम्ही?

क - तेच तर काव्य आहे ना?

स - त्यात परत नुसते फुगे नाहीत, मर्त्य फुगे!

क - अमर फुगे असतात का?

स - मुळात फुगे या शब्दालाच माझी हरकत आहे.

क - फुगा हा निश्चीतच एक शब्द आहे.

स - फुग्याला फुगा म्हणायला हरकत नाहीये. फुग्याला माणूस म्हणायला हरकत आहे.

क - मी फुग्याला माणूस म्हणालोच नाहीये. मी माणसाला फुगा म्हणालो आहे.

स - तेच ते! या ... या विधानाचा अर्थ काय?

क - कुठल्या?

स - 'मेंदूच्या जागी पिशाच्चाचा पडीक पुरावा' म्हणजे काय?

क - म्हणजे मेंदूवर पिशाच्च प्रव्रुत्तीचा प्रभाव आहे.

स - मग 'पडीक' कशाला?

क - तो कसाही असेल? आहे याला महत्त्व आहे.

स - कवितेतील प्रत्येक शब्दाच्या अस्तित्वाला अर्थ पाहिजे.

क - आहे आहे, अर्थ आहे! पडीक ला अर्थ आहे.

स - काय अर्थ आहे?

क - टवाळ पोरे जशी चहाच्या टपरीवर पडीक असतात तसे म्हणायचे आहे.

स - मग पिशाच्च पडीक आहे म्हणा! पुरावा कशाला पडीक?

क - पिशाच्चाचा पुरावा!

स - अहो पिशाच्चाचा कसला पुरावा?

क - पडीक!

स - हे तुम्ही घेऊन जा!

क - पुढचे वाचा!

स - काय पुढचे वाचू? म्हणे मातकट रंगात लडबडलेले हेतू! म्हणजे काय?

क - वाईट हेतू.

स - पण लडबडलेले म्हणजे काय?

क - म्हणजे असे... ते हे नाही का? ... घोळवलेले सारखे!

स - ते मला माहीत आहे. हेतू लडबडलेले म्हणजे काय? हेतू लडबडणे यात सामाजिक भान नाही.

क - तात्त्विक भान आहे.

स - कसलेच भान नाही. नुसतेच बेभान आहे.

क - त्यात एक छटा आहे. एक फील आहे.

स - मला छटाबिटा सांगू नका. जिभांना गांडुळे म्हणता तुम्ही? माणसांना फुगे, जिभांना गांडुळे!

क - कवीला तेवढे स्वातंत्र्य असतेच!

स - अन हे काय? तुम्ही खदाखदा हसणार?

क - हो

स - का?

क - ते हेतू पायदळी तुडवले म्हणून!

स - मी पण हासणार आहे खदाखदा!

क - का?

स - हे लिखाण वाचनात आले म्हणून.

क - ती आपली अविचारी प्रतिक्रिया मानेन मी.

स - या साहित्य क्षेत्रात तुम्ही काय 'मानता' ते पाहिले जात नसून 'मी' काय मानतो ते पाहिले जाते.

क - बर!

स - पुष्पवृष्टीवर थुंकण्याची इच्छा तुम्ही व्यक्त केली आहेत.

क - होय.

स - पुष्पवृष्टी का व्हावी?

क - एक दुष्प्रवुत्ती नष्ट झाली म्हणून!

स - पण करणार कोण?

क- तो एक स्वतंत्र भाग आहे.

स - स्वतंत्र बितंत्र काही नाही. यातलाच भाग आहे.

क - पुष्पवृष्टी होईल असा माझा अंदाज आहे.

स - मग तिथे अंदाज असे लिहिले पाहिजे ना?

क -  तसेच लिहिले आहे, 'पुष्पवृष्टी होईलही' असे लिहिले आहे. 'होईलच' असे लिहिलेले नाही.

स - तुम्ही इथे ईश्वराला कस्पटासमान असे संबोधले आहेत.

क - हो!

स - पुढे 'अस्तित्वहीनही' म्हंटले आहेत.

क - हो!

स - अहो 'हो' काय? कस्पटे अस्तित्वहीन असतात का?

क - ते तौलनिक आहे. सापेक्ष!

स - कृष्णविवरात देव भयाने दडला? तेही स्वनिर्मीत?

क - दडला.

स - का?

क - मी त्याचे अवशेष नष्ट केले म्हणून!

स - तुम्ही स्वतःला काय समजता?

क - एक सदप्रवृत्ती!

स - कवितेत अतिशयोक्ती नसावी.

क - का?

स - का म्हणजे काय? मी म्हणतो म्हणून! अन हे काय? 'अमीबा'?

क - अदृश्य बाबी असतात दोन्ही, देव अन अमीबा!

स - अमीबामध्ये कविता पोरकट होत आहे. त्यातील प्रासादिकता नष्ट होत आहे.

क - मग काय म्हणू?

स - काहीच म्हणू नका.

क - ही वक्रोक्ती आहे.

स - ही स्पष्टोक्ती आहे. तुम्ही सरळ सरळ देवाला अमीबा म्हणत आहात.

क - अमीबातही देव असतो.

स - ते मीच मागे लिहिलेले आहे. देव अमीबा असतो की नाही हा विषय आहे. अन ही भुते कसली मुक्त झाली म्हणताय?

क - सदप्रवृत्तींची!

स - अशी कशी मुक्त होतील?

क - मी केली.

स - अशी नाही होत भुते मुक्त! त्याची प्रोसीजर असते.

क - कवीला कसली प्रोसिजर?

स - तुम्हाला असो वा नसो, भुतांची प्रोसीजर असते.

क - त्या प्रोसीजरनीच केली असे लिहितो.

स - म्हणजे कसे?

क - एक जेता जात आहे या विश्वाला लाथाडून
     काही भुते मुक्त झाली... ऍज पर प्रोसीजर

स - काय वाट्टेल ते लिहाल तुम्ही! अन हे काय? काही मुक्त भुते झाले म्हणजे काय?

क - काही दुषप्रवृत्ती सुखेनैव नांदत होत्या, त्यांची भुते झाली.

स - हे लिखाण मला मान्य नाही.

क - तुमच्याकडे उगीच आलो.

स - माझाच वेळ उगीच गेला. ते त्या पाकिटात काय आहे? दुसरी कविता?

क - नाही.

स - मग?

क - मानधन आणले होते.

स - किती?

क - किती का असेना?

स - मला असे वाटते...

क - काय?

स - की एकदा भिन्न अशा वैश्विक दृष्टीकोनातून तुमचे हे काव्य पाहायला पाहिजे.

क - पहा.

स - त्यात एक तळमळ आहे.

क - आहे?

स - एक आवर्तनप्रधान हातोटी आहे.

क - यात?

स - कवी एकटा हिम्मतीने सगळ्या दुषप्रवृत्तीशी लढा द्यायला उभा ठाकला आहे. त्याच्यात आत्मविश्वासाचा एक असा अतुल्य झरा वाहत आहे की ज्यात देवसुद्धा अमीबासारखा अद्रुश्य होत आहे. यात एक प्रासादिकता आहे, एक सामाजिक भान आहे. एक माणूसकी आहे. एक कळकळ आहे या विश्वातील दुःखी व मागासलेल्या घटकांसाठी! कवीचे लालित्ययुक्त लिखाण भुतांनाही मुक्त करत आहे. पिशाच्चाचा प्रभाव असलेल्या सामाजिक घटकांची कवीपुढे वाट लागताना दिसते. तेही पिशाच्च्यांच्या युगानयुगे असलेल्या पडीक पुराव्यांची! नुसत्या पिशाच्चांची तर कुणीही वाट लावेल. या रचनेत एक स्फोटकांमध्ये लडबडलेला हेतू आहे. एक अत्यंत शक्तिशाली किडा आहे जो निळा असूनही सर्वव्यापी तर आहेच, पण फुग्यांना कचाकचा चावून फोडत सुटला आहे. तो गांडुळाना त्यांची जागा दाखवत आहे.

कवी - प्रसिद्ध कराल काय?

स - हो. दोन्ही पाकिटे इथेच ठेवा अन या पुन्हा!

क - निघतो.

संवाद समाप्त!