वाद- संवाद ५! कुत्रा आणि मांजर

कुत्रा व मांजर यांचा संवाद! एकाच भागात राहणारे दोघे! कुत्र्याला 'क' हे अक्षर तर मांजराला 'म' हे अक्षर आहे.

क - आज काय? सकाळी सकाळी इकडे?
म - इथे राहणाऱ्यांनी काल मासे आणले होते. म्हंटले बघावे, काही टाकले वगैरे आहे का?
क - अजून नाही टाकले. यांचा मुलगा तर माश्याचे काटेही कचाकचा खातो.
म - माणसे आहेत का कुत्री, मांजरे कुणास ठाउक?
क - काल इकडच्या घरात भांडणे झाली.
म - का?
क - नवरा बायकोला 'कुत्री' म्हणाला.
म - मग?
क - मग काय? मीही जरा थांबलो इथेच, म्हंटले एखादवेळेस असेलही कुत्री!
म - काही नाही रे? सगळे झुठ असतात लेकाचे.
क - तू आता किती वर्षाची आहेस?
म - चार एक महिने झाले असतील. का रे?
क - एवढीच वाढ होते का ग तुमच्यात?
म - हो बहुतेक! आमच्यात फार व्हरायटी नसते.
क - आई कुठे आहे तुझी?
म - कोनाड्यात! प्रेग्नंट आहे.
क - अन वडील?
म - कोणते?
क - तुझ्यावेळचे?
म - ते काल गाडीखाली गेले. मी बघितले......... नाही त्या मांजरीच्या मागे धावले की असेच होणार!
क - मला काल पाव मिळाला. पण मी खाल्लाच नाही.
म - का?
क - एक्स्पायरी डेट गेलेली होती.
म - तुला कसे कळले?
क - कव्हरसकट टाकला माझ्यापुढे...
म - या इकडच्यांकडे काय आहे रे?
क - गेलंय कुणीतरी!
म - तरीच हसतायत सगळे! पण तुला कसे कळले?
क -  आम्हाला रडावे लागते ना? म्रुत्यू वगैरे होणार असला की?
म - हो? मग माझे वडील गेले तेव्हाही रडलास?
क - छे! योनी योनीत फरक असतो! पण तुझ्या बाबांच्या वेळेस ती पलीकडची एक मांजर खूप रडली म्हणे!
म - का?
क - हल्ली आपल्यातही चालू झालंय! माणसांसारखे! नीतीबिती काही नाहीच!
म - तुला हल्ली बांधत नाहीत का रे?
क - नाही!
म - का?
क - माणसाळलोय आता मी! आता मी उंदीर वगैरे दिसला तर भुंकतो.
म - ए मला सांगत जा ना उंदीर दिसला तर?
क - पुर्वी तुझ्या आईला सांगायचो मी!
म - मग?
क - पण तिला काही दिसले की ती मला सांगायची नाही. इमानच नाही.
म - पण तिला घरात तरी घेतात. तू कायम बाहेर असतोस!
क - माणसे बेइमानांनाच घरात घेतात.
म - चला जाते... क्लास आहे आज!
क - कसला?
म - कबुतर पकडायचा...
क - कोण घेते क्लास?
म - तो पलीकडच्या घरातला मुलगा! त्याच्या खुराड्यातले एक कबुतर काढतो अन मला दाखवतो. मी पकडले की टाळ्या पिटत हसतो. ते उडून गेले तर मला लाथ मारतो.
क - काय क्रूर आहे नाही?
म - पण जावे लागते रे...
क - का?
म - नाहीतर मग खायला काय मिळणार? ही माणसेच सगळे खातात. उरलेली घाण आपल्याला टाकतात.
क - आत्तापर्यंत किती कबुतरे पकडलीस?
म - कुठले काय? एखादे आले असेल तोंडात! बाकी लाथाच नुसत्या!
क - आपण जंगलात जायचे का?
म - मला तर हेच जंगल वाटते.
क- खरय! मी इतक्या भुरट्या चोरांवर भुंकून पळवले, पण आजही मला शिळे मिळते. अन स्वतःच्या मुलाने घरातले पैसे घेतले तर त्याला नुसते थोडेसे शिकवले अन सगळे सोडून दिले. परत तो आपला घरातच! वर मलाच मारतो.
म - एकदा माणूस विरुद्ध प्राणी अशा निवडणुका घेतल्या पाहिजेत.
क - अगदी बरोबर! आणि मतमोजणीला कुत्र ठेवले पाहिजेत.
म - माणसांना मते द्यायला मांजरे ठेवली पाहिजेत. आणि बूथमध्ये अधिकारी म्हणून उंदीर!
क -  निवडणूक आयोगात गाढवे ठेवली पाहिजेत.
म - ते काम माणसेच करतात. तिथे गेंडे ठेवले पाहिजेत.
क - चला, गुरगुरायची वेळ झाली. तूही जा क्लासला...

( संवाद समाप्त! )