पाऊस गुंजतो गाण्यात
पाऊस नादतो पाण्यात
पाऊस हुरहूर लावणाऱ्या साऱ्या कहाण्यात
पाऊस रुंजतो मनात
पाऊस घुमतो घनात
पाऊस कुणासाठी चुकलेल्या हळ्व्या स्पंदनात
पावसाचं बरसूनही उरणं सर्वव्यापी, सर्वज्ञात
पाऊस प्रत्येक क्षणात
पाऊस प्राणाप्राणात
पाऊस भोवतालच्या ओल्याचिंब कणाकणात
पाऊसाने आयुष्यात पाळलेच नाहीत वेळकाळ
पाऊस रिमझिम सकाळ
पाऊस भिजरी संध्याकाळ
पाऊस अवेळी ओथंबणारं गडद काळं आभाळ
पावसाचं आपलंसं करणं भिनतं नसानसात
पाऊस दरवळतो श्वासात
पाऊस बहरतो निश्वासात
पाऊस बिलगतो सरींच्या लयबद्ध अनुप्रासात