बाप

आमच्या बापाने आम्हांला ओळखले नाही.
बोलावणी करून करून लोक थकले होते, पण आम्ही जागचे हलत नव्हतो.
असलाच भार तर असू दे की असं म्हणून जागीच लवंडत होतो.
सर्वदा सुखाचं एक तरी सूत्र आहे का? तर नाही.
हे उत्तर आम्हीच एकदा घाईघाईत चाललेल्या बापाला थांबवून दिले होते.
बाप प्रश्न विचारी तेव्हा आमचे चांदणे गालातल्या गालात हसत झोपी गेलेले असे.
लोकांचेही बरोबरच होते. बोलावणी करायला त्यांना समाजानेच शिकवले होते.
म्हणून ते इमाने इतबारे बोलावणी करीत.
बापाने आम्हांला बोलावणी नाकारायला सांगितले नव्हते. पण बापाने आमचे उत्खननही केले नव्हते.
त्यामुळे बापाची गोची होई.
तिन्ही त्रिकाळांपैकी भुकेच्या वेळा बापाच्या पक्क्या लक्षात असत.
त्यावेळी आम्हांला न चुकता आईचे खरखरीत हात आठवत.
आईसुद्धा तिच्या खरखरीत हातांनीच बोलावणी करीत असे.
ते मात्र आम्हांला मनापासून आवडत नसे.
बाप खूप काम केल्याच्या अविर्भावात आमच्याशी बोले तेव्हा आई शांतपणे तिचे काम करीत राही.
आईचं काही असो, ती छानच होती.
आणि समाजाशी एकनिष्ठ होती.
बाप समाजाशी एकनिष्ठ असल्याचाही अविर्भावच आणत असे आणि समाजाच्या प्रगतीची घाई असल्यासारखा वागे.
प्रगतीची कल्पना आम्हांला मुळात आवडली होती, मान्यही होती, पण तिचाही भार हा होतोच, तेव्हा आहे हा भारच ठीक आहे, असे म्हणत आम्ही बापाशी भांडत असू.
यावर बाप कर्तव्य बजावल्यासारखा आम्हांला उपदेश करी आणि प्रगती करण्याकरता निघून जाई.
त्यावर आम्ही आईचे खरखरीत हात आठवत आणि बापाने आम्हांला ओळखलेच नाही असे म्हणत जागच्या जागी नष्ट होत असू.....