प्रणय

मुलायम मुलायम गुलाबी तनू गंधुनी देत आहे सलामी तुला
धरित्री नभाहून बेभान होता कशी सोसवावी गुलामी तुला?

नशा यौवनाच्या कणाची कणाची मुखातून घे आज प्राशून तू
विसाव्यास जेथे कलावी तुझी मान तेथे निघावेस दाहून तू
कधी पैंजणांची सुरीली लडी तू कधी मानते मेखला मी तुला
धरित्री नभाहून बेभान होता कशी सोसवावी गुलामी तुला?

मधाची असे खाण माझी मिठी या मिठीची पुन्हा गोडवी लागुदे
सुगंधी खुल्या रेशमी कुंतलांनी उभारी तुलाही नवी लाभुदे
विजेने क्षितीजात दाटून आणून ओलावते निर्जला मी तुला
धरित्री नभाहून बेभान होता कशी सोसवावी गुलामी तुला?

उराला उराचा असा स्पर्श आहे जणू आहुती बर्फ अग्नीत हो
मुखाशी तुझे मेण-अस्तित्व माझ्या, जणू की शिकारीच भयभीत हो
बरस ना नव्याने, धरा तापली, आज आवाहते चंचला मी तुला
धरित्री नभाहून बेभान होता कशी सोसवावी गुलामी तुला?

विलंबामुळे शुष्कता येत आहे, नव्हाळी अता लोप पावेल ही
तुझे थंड दुर्लक्ष भूमीस या अमृताच्या अता आग लावेलही
पुन्हा एकमेकात गुंफून झंकारुया, शोधुया, तू मला, मी तुला
धरित्री नभाहून बेभान होता कशी सोसवावी गुलामी तुला?