लेट्यूसचे चटमटीत गाठोडे

  • १-२ लेट्यूसच्या पानांच्या गड्डया (किमान १० ते १२ पाने)
  • १ गाजर, अर्धा कप चिरलेला कोबी, ३-४ पातीचे कांदे चिरून, २ कप मोड आलेले मूग, अर्धा कप मटार दाणे, अर्धा कप उभी चिरलेली सिमला मिरची
  • बेसिलची पाने चिरून १ कप (कोथिंबीरही वापरू शकता)
  • अर्धा कप भाजलेले अर्धवट भरडलेले दाणे
  • लसणाच्या ३ पाकळ्या व बोटभर आले वाटून, लिंबाचा रस २ टेबलस्पून, १ लाल मिरची बिया काढून
  • सोया सॉस २ टेबलस्पून
  • चिली सॉस २ टेबलस्पून
  • पनीरचे तुकडे उभे सळ्यांसारखे कापून
  • मीठ चवीनुसार, तेल २ टेबलस्पून
२० मिनिटे
२ जणांसाठी

सर्व भाज्या (कोबी, कांदा, गाजर, सिमला मिरची) उभ्या चिरून घ्याव्यात. पॅनमध्ये तेल घालून ते तापल्यावर त्यात आले, लसूण, मिरची, मटार दाणे घालून पटापट परतावेत. थोड्या वेळाने खमंग वास दरवळल्यावर पनीर तुकडे, गाजर, कोबी, सिमला मिरची, कांदा घालून पटापटा हलवावे. किमान मिनिटभर तरी शिजवावे. त्यात लिंबाचा रस, सोया सॉस, चिली सॉस घालावा, मोड आलेले मूगही घालावेत. चवीप्रमाणे मीठ मिसळावे. फार शिजवू नये. ह्या पदार्थाची खरी खुमारी त्याच्या अर्धवट कच्चेपणातच आहे.

लेट्यूसची पाने स्वच्छ धुवून कोरडी करून त्यांची डेखे काढून घ्यावीत. आता प्रत्येक पानात वरील भाजीचे मिश्रण घालून त्यावर चिरलेली बेसिल/ कोथिंबीर व भाजलेले अर्धवट भरड दाणे पेरावेत. अलगद लेट्यूसचे पान बंद करून टूथपिक खोचावी.  

लेट्यूस ऐवजी पालक, कोबीची पानेही वापरता येतील. ह्या पदार्थात आपण आपल्या आवडीचे, जसे स्वीट कॉर्न, बेबी कॉर्न, मश्रूम्स, इतर मोड आलेली कडधान्ये यांसारखे पदार्थ व भाज्या वापरू शकतो. पनीर ऐवजी टोफू वापरू शकतो.