एक आहे जन्म, का होतोस तू लाचार मित्रा?
वाग बेदरकार मित्रा, वाग बेदरकार मित्रा
जो अणूरेणूत आहे तोच या विश्वात आहे
काळजी नाही, कसाही लाभुदे आकार मित्रा
आपल्याला आपला विश्वास वाटो, बास झाले
बोट? बोटाच्या नखावर नाचतो संसार मित्रा
टाक फासा, दान येता, सोंगटी आज्ञेत हाले
कर जगाला पट तुझा, चालव तुझा व्यापार मित्रा
मी कसा वागेन हे माझे मला माहीत नाही
मी असंभवनीय होणे, लाडका आचार मित्रा
'लाखदा अभ्यासुनी' जे वागणे, ते झूठ आहे
त्याक्षणी वाटेल ते कर, जीत हो वा हार मित्रा
युद्धभूमी अर्जुनाची, संजयाची दिव्यदृष्टी
वार घेतो मी, तुझ्या त्या बातम्या? धिक्कार मित्रा
मी स्तुती करता जगाला वाटते मोठा किती तू
अन्यथा तू काय ते मी जाणतो गद्दार मित्रा
केवढा पट्टा मुखाचा सोडला होतास तेव्हा?
बालचेष्टा वाटुनी जो मी दिला अधिकार मित्रा
आज जे सामार्थ्य आहे या जगी शब्दास माझ्या
तू कमी पडलास, त्याने लाभले, आभार मित्रा