बकरे कापा, मुर्गी तोडा, स्वतःच रस्सा भुरका
हाडे टाका कुत्र्याला अन नवस लोकहो उरका
तर्री पडली कमी, तंगडी त्याच्या पानावर का?
जमले तर भांडा थोडे वा ढेकर देउन सरका
मूक जिवाच्या बदली येथे सर्व खुदाई आहे
असा देव ज्या दुनियेचा ती दुनिया माझी आहे
जर हुंडा जमला नाही तर घे जाळून स्वतःला
जर आले अंगात तुझ्या तर घे पूजून स्वतःला
जमेल तितक्या वेळा आई घे बनवून स्वतःला
कुणी छेडता बदनामीने घे लपवून स्वतःला
कसली माता, तुला इथे ती ओळख नाही आहे
ज्या दुनियेची दासी तू ती दुनिया माझी आहे
देत देणगी लाखोंची जे वैद्य जाहले आता
त्यांनी एकच वर्षामध्ये दैव काढले आता
रुग्ण गचकला, कारण त्याचे कोण समजले आता?
विद्यापिठ मजल्यांवर मजले चढवत बसले आता
प्रवेश रुग्णालयात आता पैशावरती आहे
केवळ चाले पैशावर ती दुनिया माझी आहे
माणुसकी नावाची आई वेश्या झाली आहे
धनवानांच्या शेजेवरची शोभा झाली आहे
स्नेह संपला, दया बिचारी विधवा झाली आहे
मातेच्याही दुधात मिश्रित मदिरा झाली आहे
मानव दानव योनींची जी भेसळ झाली आहे
ती भेसळ ज्या दुनियेची, ती दुनिया माझी आहे
ती दुनिया माझी आहे......