शाळेची आठवण - १

दुपारचे साधारण दोन वाजले होते. तंतोतंत सांगायचे तर दोन वाजून तेरा मिनिटे आणि सत्तावीस सेकंद. मार्च महिन्याच्या उत्तरार्धाची ती सुरुवात होती. नुकत्याच सरलेल्या हिवाळ्यात उब देणारा दिवाकर हळूहळू आता आग ओकू लागला होता. दिवस मोठा होउ लागला होता. सणासुदिचे दिवस संपून बराच काळ निघुन गेला. एव्हाना पानझडी रंगात आला होता. झाडांची "कोश" टाकण्याची हीच वेळ होती. सृष्टी जणू येणाऱ्या वसंताच्या स्वागताची जय्यत तयारी करत होती. अगदी सकाळी सर्वत्र रस्ते पिवळ्या पानांनी भरून जात होते. व्रुक्ष जुने वस्त्र टाकून नवीन वस्त्र धारण करत होते.
शाळेचे सत्र संपत आल्याने बहुतेक विषयांचे शिकवणे संपले होते. सातवीचे वर्ष जवळपास पुर्ण झाले होते. काही दिवसानंतर परीक्षा आणि त्यानंतर सुट्ट्या. त्यानंतर सर्वजण नवीन शाळेत प्रवेश घेणार होतो कारण, ही शाळा पहिली ते सातवीपर्यंतच होती. एका नव्या आयुष्याची सुरुवात आम्ही लवकरच करणार होतो. त्यावेळी आमच्या शाळेत डेस्क-बेंच नव्हते. तसा काही प्रकार शाळेत असतो हे सुद्धा आम्हाला माहित नव्हते. चार धूळीने माखलेल्या भिंतींची आयाताकार रचना, त्यामध्ये शाळेच्या दिवसात मुलांनी आणि सुट्टीच्या दिवसात उन्हा-पावसापासून रक्षण म्हणुन गुरा-वासरांनी येण्यासाठी एक दरवाजा, वारा येण्यासाठी एक भली मोठी दारवजा खिडकी, एका भिंतीमध्ये मोठा काळा कधिही न वापरल्या गेलेला फ़ळा, त्यासमोर एक लाकडाची मोडकळीस आलेली खुर्ची आणि जवळच एक ऐतिहासिक लाकडी टेबल, जमीनीवर मळलेल्या, फ़ाटलेल्या, जीर्ण झालेल्या पट्ट्या, मुलांना बसण्यासाठी पसरलेल्या हीच एका आदर्श वर्गाची व्याख्या आम्हाला माहित होती.          
आज डबा खायची सुटटी संपून आम्ही वर्गात बसलो होतो. सर वर्गात नसल्याने गुराखी नसलेल्या गोठ्यात डांबलेल्या वासरांसारखी आमची अवस्था होती. मुली त्यांच्या गप्पामध्ये गुंग होत्या आणि आम्ही मुले आमच्या. वर्गात सर्वत्र गोंधळ माजला होता. एवढ्यात एक सर वर्गात आले. त्यांचा वर्गात येताच वर्गात स्मशान शांतता पसरली. काही क्षण शांततेचे होते. "अभ्यास करत बसा." एवढे बोलुन सर खुर्चीवर बसले. संपूर्ण वर्गात दप्तर उघडण्याचा आणि नंतर बंद करण्याचा आवाज झाला. सर्वानी पाहिजे ती पूस्तके दप्तरातून बाहेर काढली आणि उघडुन त्याकडे बघु लागले. एका शब्दावर मुले शांत झाली हे बघुन सरांच्या चेहरयावर समाधान झळकले. थोडा वेळ अभ्यासाचा दिखावा करुन मुलांनी मान पूस्तकातून वर घ्यायला सुरूवात केली. सर तर खूर्चीवर पेंगत आहेत हे बघुन मुलांचे आणि तिकडे मुलींचे चोरुन हसणे सुरु झाले. मुलांनी पूस्तके बंद केली आणि त्यांच्या गप्पा सुरु झाल्या. सगळे जण आपापल्या मित्रांमध्ये गमती करण्यात गुंतले होते. एवढ्यात मोठा आवाज झाला, "सर sssss" . सगळी मुले अचानक ऐकलेल्या भयानक शब्दाने चुप झाली आणि आवाजाच्या दिशेने बघु लागली. सर मात्र अजुनही पेंगतच होते. म्हणुन त्या मुलाने परत आणखी मोठ्याने आरोळी ठोकली, "ओ, सर .....". आता मात्र सर खडबडुन जागे झाले आणि प्रथमत: त्यांनी दारातून बाहेर द्रुष्टी टाकली, कदाचित मुख्याध्यापिका वर्गात आल्या असाव्यात असा त्यांचा अंदाज होता. पण, बाहेर रखरखित उन्हाशिवाय दूसरे काहिच नव्हते. म्हणुन त्यांनी आवाजाच्या दिशेने बघितले. सर जागे झाले बघुन एक मुलगा उभा झाला, "सर, हे दोघे शिव्या देत आहे आईवरुन. हा म्हणत आहे, तुझ्या आई*** *******, आणि हा मारत होता मला." ते ऐकुन सरांनी डोक्यावर हात ठेवला. सगळी मुले हसु लागली. मुलीमध्ये मात्र "स्स्स, शी...." अशाप्रकारचा आवाज तीव्र झाला आणि अचानक लोप पावला. सर खुर्चीवरुन उठुन मागच्या उभ्या रहिलेल्या मुलापर्यंत गेले. त्या दोनही मुलांना उभे राहण्यास सरांनी हातानेच इशारा केला. सगळा वर्ग शांत होवुन पुढे काय होईल या उत्कंठेने बघत होता. "कशाला शिव्या देतोस रे?" सरांनी कडक आवाजात प्रश्न विचारला. गोरया वर्णाचा जाडा जुडा सुस्त वाटणारा मुलगा त्याच्या जाड्या-भरड्या आवाजात बोलला, "सर, ह्यानेच सुरुवात केली. मला म्हणतो, कमी जेवत जा. तुझ्यामुळे भाज्या महागल्यात." काही क्षण सरांच्या चेहरयावर स्मित झळकले. इकडे वर्गात मात्र सगळे जण मोठ्या-मोठ्याने हसत होते. "म्हणुन आईवर शिवी देतोस??" सरांनी आवाज काहिसा हळु केला. "अहो सर, बापावर देऊन उपयोग नाही. तो स्वत:च त्याच्या बापाला शिव्या देतो. सुट्टीतच म्हणाला होता, माझा बाप ***** आहे, दारु पितो म्हणुन." वर्गामध्ये परत हशा पिकला. फ़ट्ट असा आवाज झाला आणि सगळी मुले शांत झाली. त्या मुलाचा गोरा गाल टमाट्याप्रमाणे लाल झाला होता. त्याचे कानशिलदेखिल लालबुंद झाले. त्याच्या डोळ्यात पाणी आले पण, त्याने ते आवरले. "एकतर शिवी देतोस वरुन तोंड चालवतोस, *****?" सरांचा आवाज तापला होता. ते बघुन संपूर्ण वर्गाचे हसणे बंदच झाले. त्या मुलाबरोबर उभा असलेला दूसरा मुलगा घाबरला. आता आपला नंबर आहे हे त्याने ओळखले. त्याने रड दाबत सरांना उजव्या हाताची करंगळी वर करुन इशारा केला. सरांनी लगेच वाट मोकळी केली. तो मुलगा लगेच वर्गातुन बाहेर पडला. यावेळी मात्र कोणिही हसले नाही. "सर, निलेश विरक्तेला बोलवले आहे सायंकाळ मॅडमनी. एक तिशीतला माणुस दारात उभा होता." सरांनी माझ्याकडे बघितले. मी दाराकडुन दूसरया ओळीत दूसरया नंबरवर बसलो होतो आणि घडलेल्या प्रकरणाकडे बघत होतो. अचानक मुख्याध्यापिका बाईंनी मला बोलावले आहे हे ऐकुन मी घाबरलो. माझी जागेवरुन उठण्याची हिंमतच होत नव्हती. "निलेश, जा मॅडमनी बोलवले आहे तुला." सरांनी फ़र्मान सोडला. मी मन मारुन उभा राहिलो आणि दारातुन बाहेर पडलो. बाहेर पडताच मी निरोप घेउन आलेल्या शिपायाला प्रश्न विचारला, "कशासाठी बोलवले आहे?" "मला काय माहिती? मॅडम रागात होत्या म्हणुन मी चौकशी केली नाही" तो बोलला. मी मनातल्या मनात विचार करु लागलो, "त्या दिवशी मॅडमच्या घराजवळ कच्चे आंबे तोडले होते  चोरुन, कदाचित माहित पडले असावे. नाही पण, त्या दिवशी तर त्यांच्या घराला कुलुप घातलेले होते म्हणुन तर मी हिमंत केली. कदाचित काल विजुशी मारामारी केली आणि त्याने ते घरी सांगितले असेल. मग त्याच्या बाबांनी मॅडमना बजावले असेल. हा विजु पण मुर्ख आहे. शाळेतली भांडण घरी कशाला सांगायची. याला बायकी सवयी आहेत सगळ्या, ह्याची गोष्ट त्याला आणि त्याची गोष्ट ह्याला. पण, आता मी मॅडमला काय कारण सांगु भांडणाचे?" विचारा विचारात मी ऑफ़ीसमध्ये पोहोचलो. तिथे कॅबिनमध्ये सायंकाळ मॅडम नेहमीप्रमाणे कोणालातरी झाडत होत्या. आता मला लवकरात लवकर काहितरी करायला हवे नाहितर माझे तोंडसुद्धा लाल होणार मोट्याप्रमाणे असा विचार मी करु लागलो.