२२ वर्षे झाली. संध्याकाळच्यावेळी मी व मित्र माझ्या घराच्या गॅलरीमधे उभे राहून समोरच्या रस्त्याकडे पाहत गप्पा मारत होतो.
( पुण्यातील नळस्टॉपकडून म्हात्रेपुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर महादेव मंदिर चौकात घर होते, तो रस्ता इमारतीला लागूनच होता व रस्ता पूर्ण व व्यवस्थित दिसायचा)
विरुद्ध बाजूला एक फळाची हातगाडी उभी होती. ती फळांनी पूर्ण भरलेली होती.
अचानक नळस्टॉपकडून एक रिक्षा जोरात आली व त्या गाडीला पूर्ण वेगात धडकली.
गाडी आडवी झाली व निम्म्याहून अधिक फळे इतस्ततः रस्त्यावर विखुरली.
( रस्त्यावरील काहींना ती सुवर्णसंधी वाटली हा भाग अलाहिदा! )
रिक्षेतून रिक्षाचालक बाहेर पडला. हातगाडीवाल्याला तो प्रकार झाला आहे हे खरे वाटेपर्यंत जे काही चार, पाच क्षण गेले त्यानंतर त्याने बाहेर पडलेल्या रिक्षाचालकाला लाथा मारायला सुरुवात केली. तो इतका बेभानपणे लाथा मारत होता की फळांचे काहीही झाले तरी आता त्याला काळजी नसावी असे वाटत होते. पण हा प्रकार मुळीच हास्योत्पादक नव्हता. आम्हाला वाईट वाटत होते. खरा प्रकार नंतर घडला.
रिक्षाचालक जरी बाहेर पडलेला असला तरीही रिक्षा तशीच पुढे निघाली. आम्ही पाहत होतो. मी मित्राला दाखवलेही, की रिक्षा तशीच निघाली आहे. तो व मी उत्सुकतेने बघू लागलो.
ती रिक्षा अक्षरशः ७५ मीटर अंतर सरळ गेली व नंतर अचानक तिने रस्ता क्रॉस केला. त्यावेळी त्या रस्त्यावर फारशी गर्दी नसायची, त्यामुळे रिक्षा सरळ जाताना कुणालाच धडकली नाही. मात्र, रस्ता क्रॉस केल्यावर ती समोरून येणाऱ्या एका तीनचाकी टेंपोवर समोरासमोर आदळली व आडवी झाली. टेंपोवाला भयानक क्रोधिष्ट नजरेने टेंपोतून बाहेर येऊन रिक्षाचालकाला शोधू लागला. त्याने अक्षरशः रिक्षाचालकाला आडव्या झालेल्या रिक्षेच्या खालीही शोधले. बराच वेळ शोधल्यानंतरही रिक्षाचालक दिसेना त्यामुळे त्याने आपल्या टेंपोच्या संभाव्य नुकसानाकडे पाहिले व निघायला लागला. तेवढ्यात काही अंतरावर काहीतरी भांडण, मारामारी, शिविगाळ चाललेली पाहून तो तिथपर्यंत गेला, टेंपो क्षणार्धासाठी थांबवून आढावा घेऊन निघाला. त्याच्यासमोरच रिक्षेवाला मार खात होता, पण तो प्रकार काहीतरी भिन्न असावा असे वाटून तो निघून गेला.
अशा प्रकारचा अपघात मी त्याआधी किंवा त्यानंतर पाहिलेला नाही. ( टी. व्हीवर मध्ये 'विचित्र अपघात' या सदरात काही अपघात तसे जरूर पाहिले, पण प्रत्यक्षात नाही. )
फळेही गेली, रिक्षावालाची कणिकही तिंबली अन टेंपोलाही पोचा पडला.