एका स्वामींची मुलाखत! मुलाखत घेणारी एक युवती आहे. स्वामी त्यांच्या भागातील 'गाजलेले बुवा' असून अविवाहितांचे विवाह जोडून देणे व अपत्यहीन दांपत्यांना अपत्यप्राप्तीचे मार्ग दाखवणे यासाठी ते सुप्रसिद्ध आहेत.. ही मुलाखत 'ती युवती कार्यरत असलेल्या' मंडळातील पाक्षिकासाठी घेण्यात येत आहे. युवतीचे अक्षर 'ती' व स्वामींचे 'ते'!
ती - कामटवाडीतील 'वैश्विक स्त्री उद्धारण मंडळाच्या जागतिक मुख्य शाखेकडून' आपल्याला अभिवादन!
ते - स्त्रियांचे अभिवादन आम्ही स्वीकारत नाही.
ती - का?
ते - आम्ही स्त्रीमध्ये आई बघतो.
ती - इश्य! माझे लग्नच झालेले नाहीये.
ते - तरीही आम्ही आईच बघणार!
ती - मग काय करू?
ते - काय करू म्हणजे?
ती - अभिवादन नाही तर काय स्वीकारता आपण?
ते - आशीर्वाद दे माते! आपल्या या निरागस बालकाला सत्कार्यासाठी आशीर्वाद दे.
ती - बर... मी आपली मुलाखत घ्यायला आले आहे.
ते - माझी कसली मुलाखत? मी एक दुर्लक्षनीय जीव आहे.
ती - आमच्या मंडळात अशा जीवांचाच मुलाखती छापतात.
ते - बर घ्या मुलाखत!
ती - आपण कधीपासून या क्षेत्रात आहात?
ते - कोणते क्षेत्र आई?
ती - अहो.. प्लीज... आई नका ना म्हणू!
ते - कोणते क्षेत्र?
ती - हेच! स्वामी, बुवा, गुरू असे होण्याचे!
ते - हे जगड्व्याळ त्रैलोक्यधीशा, काय हे अज्ञान?
ती - काय झाले?
ते - असे क्षेत्र नसते बालिके... लोक आम्हाला तसे संबोधतात.
ती - पण का? ( 'बालिके' या संबोधनाने खुष होऊन )
ते - कारण आम्ही त्यांच्या संकटांचे निवारण करतो.
ती - अं! संकटांचे प्रकार सांगाल स्वामी?
ते - जीव जन्माला आल्यानंतर त्याच्या आयुष्यात उद्भवणारी सर्व संकटे आम्ही नष्ट करू शकतो. प्रकार काय सांगणार?
ती - अहो इथे छापायला लागेल ना? म्हणून... एक दोन चार प्रकार सांगा ना?
ते - एखाद्या मुलीचे लग्न जमत नसले तर ..
ती - आपण मुलगा शोधून देता? अहो... मला पण... ( इथे स्वामींनी वाक्य तोडले. )
ते - मुलगा नाही शोधत! त्या मुलीला आम्ही संन्यास घ्यायला सांगून आमच्या आश्रमात अभय देतो.
ती - अभय म्हणजे?
ते - अभय म्हणजे... संभावित संकटांपासून सुटका होईल अशी परिस्थिती देतो.
ती - म्हणजे काय?
ते - त्या मुलीला आमच्या आश्रमात असताना वैवाहिक आयुष्यातील जबाबदाऱ्या अजिबात पडत नाहीत, वैवाहिक सुखे मात्र मिळतात.
ती - काय सांगता काय?
ते - आम्ही फक्त सत्य बोलतो. आम्ही जे बोलू ते सत्य असते. आमच्या मुखातून फक्त..
ती - आणखीन एखादा प्रकार सांगा ना...
ते - एखाद्याला अपत्यप्राप्ती होत नसेल तर..
ती- इश्य!
ते - हा लज्जाप्रदर्शक उद्गार तुझ्या कोमल सुमुखातून निघण्याचे प्रयोजन काय बालिके?
ती - 'एखाद्याला' कसे होईल अपत्य! झालेच तर 'एखादीला' होईल ना?
ते - तुझा हजरजबाबीपणा आवडला बरं? तर एखादीला जर अपत्य होत नसेल...
ती - आपल्याकडे आयुर्वेदिक औषधे आहेत ना?
ते - औषधे सुचवणारे जीव 'मानवी' असतात मुली...
ती - मानवी म्हणजे?
ते - आम्ही या सृष्टिच्या, इथल्या सर्व ऐंद्रिय जाणीवांच्या पलीकडचे आहोत.
ती - मग आपण काय सुचवता?
ते - आम्ही त्या स्त्रीला विश्वासात घेतो.
ती - कशाला?
ते - त्यातून ती सर्व काही सत्य सांगते.
ती - मग?
ते - आम्हाला एकदा मूळ समजले ... की... झालेच!
ती - काय झाले?
ते - योग्य तो उपदेश दिला की ती समाधानी होते व कालांतराने प्रसूतही!
ती - नुसत्या उपदेशाने? आपण महान आहात.
ते - काहीकाहींना नुसता उपदेश पुरत नाही.
ती - का?
ते - विधात्याची इच्छा!
ती - मग? अशा केसेसमध्ये काय करता?
ते - केसेस म्हणजे काय?
ती - अशा वेळेस काय करता?
ते - व्यावहारिक प्रशिक्षण हा एकच मार्ग उरतो आमच्या हातात!
ती - शीः!
ते - हे प्राक्तन आहे बालिके! ते आमच्या हातात नाही. ते वरून ठरवले जाते.
ती - अहो पण हे छापणार कसे?
ते - आम्ही सत्य बोलतो. सत्य छापायला काय घाबरायचे?
ती - पण हे अनैतिक वर्तन वाटते. मी उगीच इथे आले.
ते - ती पण असेच म्हणायची.
ती - कोण ती?
ते - सीमा! आमची पुर्वीची पत्नी!
ती - पुर्वीची म्हणजे?
ते - म्हणजे जेव्हा आम्ही सर्वसाधारण मानव होतो तेव्हा आमची जी पत्नी होती ती!
ती - मग आता आपण काय आहात?
ते - या विश्वाचे पालनकर्ते!
ती - हे असे?
ते - हे असे म्हणजे?
ती - असली प्रशिक्षणे देणारे?
ते - ते आमचे कार्य आहे.
ती - ती सीमा आता काय कार्य करते? ( एक प्रक्षोभक 'पर्दाफाश' मुलाखत म्हणून छापता येईल काय या विचाराने! )
ते - ती माहेरी असते.
ती - कधीपासून?
ते - तेव्हापासूनच!
ती - अहो तेव्हापासून म्हणजे कधीपासून?
ते - आम्हाला साक्षात्कार झाल्यावर आम्ही हे कार्य घरातूनच सुरू केले सुरुवातीला. तेव्हा ती भौतिक क्रोधाने निघून गेली.
ती - भौतिक क्रोध म्हणजे काय?
ते - तुमच्यासारख्यांना येतो तो क्रोध!
ती - त्या सीमाचे माहेर कुठे आहे?
ते - पिसुर्डी?
ती - पिसुर्डी?
ते - होय!
ती - आडनाव काय तिचे?
ते - ओगले.
ती - काय? माझी सीमा आत्या तुमची पत्नी?
ते - कोण सीमा आत्या बाळ?
ती - ती सीमा माझी आत्या आहे.
ते - हो? मग? तिने सांगीतले नाही कधी तुला माझ्याबद्दल?
ती - नाही. ती फक्त शिव्या मात्र देते तुम्हाला!
ते - तुझ्या घरच्यांनीही नाही सांगीतले?
ती - तेही शिव्या देत असतात तुम्हाला. पण मी लहान असल्याने काही सांगीतलेले नसावे आजपर्यंत! आता समजले तुमचे अंतरंग!
ते - आता तुझा काय विचार आहे?
ती - आता कसला विचार? आता तुमचा बुरखा ओढणार मी आमच्या पाक्षिकात!
ते - बुरखा? बुरखा पाक्षिकात ओढणार? म्हणजे काय?
ती - तुमचे भयानक अंतरंग कसे आहे ते सगळ्या समाजाला सांगणार!
ते - समाज तुझे नाही ऐकणार बाळ! आमच्यामुळे सुखी झालेली अनेक कुटुंबे आहेत.
ती - ती आता दुःखी होतील.
ते - असे करू नकोस. तुला आम्ही सुखी करू. तुला शिक्षणासाठी, नोकरीसाठी...
ती - काही नको मला.
ते - मी तुझ्या आत्याला परत बोलवू का?
ती - आत्या येतीय... वाट बघा!
ते - ठीक आहे. जिथे आमच्यावर किटाळ उडवतात त्या गावात आमचे सत्कार्य आम्ही थांबवत आहोत.
ती - म्हणजे?
ते - आम्ही निघालो.. हा आश्रम गुंडाळून! तुझे पाक्षिक हातात पडेपर्यंत आम्ही खूप दूर गेलेले असू.
ती - भौतिक पळ काढताय वाटते?
ते - आम्ही अध्यात्मिक नवनियुक्ती करून घेत आहोत आमची.
ती - डोंबल्याची अध्यात्मिक नवनियुक्ती! मी चालले पोलिसांकडे...
( स्वामी हादरले. संवाद समाप्त! )