मजा घेताच येइल जगाला...

केवढ मोठ्ठं धरण होतं हे...!

इकडच्या बाजूला हा एवढा जलाशय... धीराचा

तिकडच्या बाजूला मोऱ्यांमधून हळू हळू सुटणारा धीर पाहून मजा घेणारे जग

क्युसेक्सचे आकडे दररोज वाढणारे

धरण फुटले तर आपले काय होईल याची जगाला सध्या तरी चिंता नाही

अजून नक्की काहीच ठरले नव्हते ना?

धरणाचे बांधकाम केले होते आठवणींनी , अनुभवांनी, आपल्या दोघांच्या

पाया मात्र होता फक्त तुझ्या बेसावध क्षणी दिलेल्या कच्च्या मातीच्या वचनाचा...

शेवटी सगळा धीराशय मोऱ्यांमधून वाहून गेला

तरी आशेचे चोर थेंब अजून उन्हात वाळत वाळत तुझी वाट पाहत होते

तू आलीसच... वाटलंच होतं मला... अशी सोडायची नाहीस तू मला

मग त्या थेंबाच्या वाफा होता होता थांबल्या

धीर मोऱ्यांमधून उलटा आला

जगाला आता मजा घेता आली नाही.

आणि तू म्हणालीस

"हे सांगायला आले होते की... मी लग्न करून आता परदेशात जाणार"

पुन्हा जग जमले... मजा घ्यायला ... पलीकडे... यावेळी मात्र जरा कडेकडेने थांबले...

आशेच्या अर्धवट वाफावलेल्या थेंबांसकट सगळा धीर...

असा 'सुटला' की मोऱ्या अक्षरशः फ़ुटल्या

जगाने केला टाळ्यांचा कडकडाट, अगदी कणीस, भेळ व चहावाल्यांनीही...

धरण बांधून घेणे, फोडणे, सगळे किती सोपे आहे नाही तुला?

तू बांधलेले धरण कधी फुटू नये... एवढीच इच्छा!

अन फुटलेच चुकून ...

तर...

माझे धरण मी परत उभा करू शकतो... एका क्षणात... तुझ्यामाझ्यासाठी...

फक्त ... त्यावेळेला...

मजा घेणारे जग धरणाच्या 'या' बाजूला असेल एवढे लक्षात ठेव...

जरी ते धरण मी फुटू देणार नसलो तरी... मजा घेताच येईल जगाला! धरणात राहून तुला पाहत बसण्याची...