यालाच खरे जगणे म्हणू

सरपणासाठी तोडलेल्या ओंडक्याला
एकदा पालवी फुटली
त्याचे त्यालाच कळेना
जगण्याची ही जिद्द कुठली

जगूनही काय होते
शेवटी जळणेच नशिबी होते
तरीही जगावेच आपण
असे त्याला नेहमी वाटत होते

पालवी त्याची नाजुक
ती का कोणाला सावली देणार होती?
त्याची वेड्याची मात्र
अशीच काहीशी आशा होती

आता त्याला कोणी सांगावं
जीवन तुझं एवढ्यापुरतंच आहे
अन आज पालवी फुटली तरी
उद्या तुझे मरण निश्चितच आहे

तरीही काय ती जिद्द
त्यालाही जगूनच दाखवायचे आहे जणू
खर्च ओंडक्याचे ते आयुष्य
यालाच खरे जगणे म्हणू