ज्येष्ठांची दहीहंडी

श्रावणात गोकुळअष्टमी जवळ आली की गोविंदाच्या टोळ्या कार्यरत होतात.सर्व शहरात एक प्रकारचा उत्साह संचारतो. टि. व्ही. वर दोन दिवस दहीहंडीच्याच बातम्या ऐकायला मिळतात. हा सर्व लोकांचा उत्साह पाहून आमच्या गुलमोहर पथावरील रहाणारे ज्येष्ठ नागरिकही उत्साहित झाले. आमच्यातील उत्साहमूर्ती श्री.गोपाळराव  देशपांडे व राजाभाऊ दाते यांनी पुढाकार घेवून यंदा दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिकांची टोळी करणार असे घोषित केले. या घोषणेने ज्येष्ठ नागरिकात एक प्रकारचा उत्साह संचारला.गुलमोहर पथावरील महिला मंडळही हा सोहळा पाहण्यास अधीर झाले होते. प्रत्येकीला आपल्या 
पतीराजाचे कौतुक पाहण्याची संधी साधावयाची होती. मग श्री.  देशपांडे यांनी या संदर्भात एक सभा बोलावली‌. सभेला बरेच नागरिक हजर होते. देशपांडे यांनी उत्साहाने माहिती सांगण्यास सुरवात केली." आपली दहीहंडी दहा बारा फूट उंच असेल.खाली सात जणांचा फेरा असेल. प्रत्येकानी एकमेकाला घट्ट धरू न ठेवावयाचे. वरच्या स्तरावर एकजण चढेल व दहीहंडी फोडेल. " हा कार्यक्रम ऐकल्यावर सभेतील लोकांनी आपले तोंड उघडावयास सुरवात केली‌. श्री. अंबुले म्हणाले, " कार्यक्रम छान आहे. पण किनई, माझे गुढगे खूप दुखतात. त्यामुळे उभे राहवयास मला जमेल असे वाटत नाही. "  हे ऐकून काळे म्हणाले, " हे बघा, मी जरी धिप्पाड दिसत असलो तरी माझ्या खांद्यावर चढून कोणी उभे राहिलेले मला चालणार नाही. कारण दुसऱ्याच्या खांद्यावर चढून जाण्याची माझी संवय आहे. पण आता मला रक्तदाबाचा विकार आहे. " असे म्हणून ते रागाने सभेतून निघून गेले. श्री. आठवले म्हणाले, " मी डायबेटिसचा पेशंट आहे. मला रोज इन्सुलिनची इंजक्शने घ्यावी लागतात, तेंव्हा कुठे मी ताठ उभा राहतो. मला हा कार्यक्रम आवडत असला तरी मला जमेल असे वाटत नाही. " श्री. पिसे म्हणाले, " मी हार्ट पेशंट आहे. मला चालतानाच दम लागतो तर हा कार्यक्रम करताना काय होईल? श्री. देव म्हणाले, " कार्यक्रम करावयास हरकत नाही. पण या कार्यक्रमा नंतर पिण्याचा कार्यक्रम असेल तर मला जास्त आनंद होईल. हा कार्यक्रम आमच्या गच्चीवर करू या " यावर दाते म्हणाले, " प्रथम आपण दहीहंडी फोडण्यासाठी काय व्यूहरचना करावयाची ते ठरवू या. कोण लोक खाली असणार? कोणाला वर चढवावयाचे? ते ठरवू या. वजनाने हलका माणूस वर चढवू या. " दिवाकर म्हणाले, " मग, येथे दवे शिवाय कोण हलका माणूस असणार? " मग सर्वानुमते श्री. दवेना वरच्या स्तरावर चढवावयाचे ठरले. दवे म्हणाले, " तुम्ही खूप ठरवाल हो, पण मी त्या दिवशी जेवावयास बाहेर जाणार आहे‍ जेवून आल्यावर तुम्ही मला वरच्या स्तरावर चढवणार हे ऐकूनच मला घेरी यावयास लागली. तुम्ही डॉ.चौधरीला का नाही विचारत? तेच मला या कामासाठी योग्य वाटतात. " प्रत्येकाची अशी मते ऐकून श्री. देशपांडे वैतागले. ते म्हणाले, " आपल्या सर्वांना एवढे तरी जमेल का? की सर्वांनी एकत्र जमून कोपऱ्यावर दहीहंडी पर्यंत चालत जायचे. तेथे गेल्यावर आपणास अजून मदत मिळेल. ऐनवेळी आपल्यातील एकाला आपण वर चढवू व दहीहंडी फोडण्यास लावू. तेथे दोन हास्यक्लब मधील सदस्य आपला उत्साह वाढवण्यासाठी येणार आहेत. "  एवढे म्हटल्यावर सारेजण दहीहंडी पर्यंत येण्यास तयार झाले.
मग संध्याकाळी साडेसात वाजता सर्व ज्येष्ठ गोविंदा मोठ्या उत्साहाने दहीहंडीकडे निघाले. तेथे सर्व पोहोचण्याचे अगोदरच हास्यक्लबचे सदस्य येऊन हसत हसत स्वागतास उभे होते. आम्ही आल्यावर त्यांचे सप्तसूरातील हसणे सुरू झाले. मग तेथील वातावरणात व ढोल ताशांच्या गजरात सर्वांनी " गोविंदा आलारे आला" असे म्हणून वातावरण तापवले. आता लोकांनी कांहीही सबब न सांगता गोल फेरा आपणहून धरला. तेवढ्यात अचानक वीज गेल्यामुळे अंधार झाला. कोणीतरी गोविंदा आला रे आला म्हणत दहीहंडीवर जोराचा फटका मारला व दहीहंडी फोडली. सर्व दहीकाला अंगावर पडल्याने सर्वजण उत्साहाने नाचू लागले. तेवढ्यात वीज आली. सर्वजण दहीहंडी कोणी फोडली? असे एकमेकाला विचारत होते. मात्र अंबुले आपल्या हातातील काठीला लागलेले दही रुमालाने पुसण्यात गुंग झाले होते.