पसाभरं

शुष्क नभातुन टाहो कातर, खंडीत धरणी भेगा पाचर,
पिवळ्या सुकत्या गवतावरती, पुन्हा पाडं रे रिमझीमती सर..

मान झुकवुनी गुरे चालती, हलवीत हुंगित लाळ गाळती,
खपाटलेल्या पोटी त्यांच्या, पडेल कैसा दाणा कणभर?

भेगांमधुनी ऊसळे अंकुर, परि कोवळे का क्षणभंगुर,
आटली विहीर पान्हा तळ्भर, कसे पाजावे तान्हं वावर?

सुटता वारा भुरभुर माती, आसवांनी का भिजेल शेती?
घाम गाळण्या त्राण राहुदे, इतके तरि दे दान पसाभर..