कॉलनीतील गणेशोत्सवात महाभारतातील द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग बसवणे (रिहर्सल) चालू आहे.
दिग्दर्शक - हां! बसले का पांडव सगळे? आता इकडे कौरव बसून घ्या!
कर्ण - मी कुणाच्यात?
दि. - कौरव
संजय - हा पट पुरेल का?
दि - पटाला काय महत्त्व आहे वस्त्रहरणात?
धृतराष्ट्र - माझे सिंहासन कुठे आहे?
दि - आत्ता त्या खुर्चीवर बस! गांधारी आली का?
गांधारी - आले.
दि - पट्टी बांध डोळ्यांना!
गांधारी - स्टेजवर बांधेन! आत्ता बघूदेत की
नकुल - मी भरत होऊ का?
दि - महाभारतात भरत नव्हता. हां! आता दुर्योधना, तू म्हण... लाव युधिष्ठिरा... सगळे हत्ती द्युतात लाव
दुर्योधन - लाव युधिष्ठिरा... सगळे हत्ती द्युतात लाव ( दुर्योधनाची प्रॅक्टिस बघायला आलेली त्याची पत्नी मुरकते. )
भीम - दादा, द्यूत बास झाले.
अर्जुन - दादा, द्युत बास झाले
नकुल - दादा, द्युत बास झाले
सहदेव - दादा, द्यू...
युधिष्ठिर - ए... गप्प? मला काय डायलॉग आहे की नाही? हे घे लावले सगळे हत्ती द्युतात ( हात दुर्योधनाच्या पत्नीकडे )
दुर्योधन - ए, तू तिकडे बस गं! ( ती उठून तिकडे बसते. )
मामा - टाकला फासा! गेले... गेले ... सगळे हत्ती गेले... हा हा हा!
दुर्योधन - लाव युधिष्ठिरा...
दि - अरे काय लाव ते सांग ना?
दुर्योधन - लाव युधिष्ठिरा... सगळे घोडे लाव
दि - द्युतात
दुर्योधन ऱ्हां! द्युतात!
भीम - दादा...
युधिष्ठिर - हे लावले मी सगळे घोडे द्युतात...
मामा - गेले... ही ही ही ही.... घोडेही गेले.
दुर्योधन - लाव युधिष्ठिरा... पाच सहस्त्र दासदासी लाव द्युतात
(युधिष्ठिराची पत्नी दुर्योधनाच्या पत्नीला - हल्ली बायकाच मिळत नाहीत नाही धुण्याभांड्याला? त्यावर द्रौपदी होकार भरते. )
युधिष्ठिर - गेले... पाच सहस्त्र दास दासी गेले... हा हा हा हा
दि - ए .. तो शकुनीचा डायलॉग आहे.
मामा - गेले गेले... दासदासी गेले....
दुर्योधन - आता काय लाव म्हणायचे हो?
दि - सोने नाणे जड जवाहिर
दुर्योधन - हां! ते लाव रे सगळं
दि - अरे तू बोल ते सगळं! स्टेजवर मी सांगणार आहे का?
दुर्योधन - जड जवाहिर सोने नाणे लाव द्युतात आता
(द्रौपदी युधिष्ठिराच्या पत्नीला हे गळ्यातले कधी घेतले विचारते. )
युधिष्ठिर - लावले. लावले द्युतात!
मामा - गेले.... हा हा हा हा... सगळे धन गेले तुझे युधिष्ठिरा!
(दुर्योधनाची पत्नी पुन्हा मुरकते. )
(यापुढील डायलॉग दुर्योधनाला पाठ असतो. )
दुर्योधन - युधिष्ठिरा, सगळंच हारलास! आता आहे काय तुझ्याकडे? आता उरली फक्त तुझी पत्नी! तिलाही लाव द्युतात!
भीम - (संतापुन, त्वेषाने किंचाळत उठतो. त्याचा आवाज ऐकून पलीकडचे पॉमेरियन भुंकू लागते. ) नाही नाही, चांडाळांनो... माझ्या पत्नीला
अर्जुन - ए... माझ्या काय? आमच्या म्हण! ( द्रौपदी इकडे तिकडे बघते. )
भीम - हां! तेच! आमच्या पत्नीची अशी विटंबना?
युधिष्ठिर - लावली.
दि - अरे काय लावली?
यु - आमची प्रिय पत्नी आम्ही द्युतात लावली. ( इथे द्रौपदी घरंगळळ्यासारखी पटावर येऊन आपटते. )
(दुःशासन व दुर्योधन खदाखदा हासतात. )
धृतराष्ट्र - हे काय चालले आहे माझ्या राज्यात?
द्रौपदी - महाराज, एका अबलेवर अन्याय! ( येथे भीष्म ताटकन उठून परत आपला अधिकार नाही हे जाणून गप्प बसतो. )
(अर्जुन आता इतक्यात आपला काही शॉट नसल्यामुळे बाल्कनीत बिडी मारायला जातो. )
दुः शासन - खेच दादा, खेच
दुर्योधन - काय खेच?
दुः शासन - तिची साडी...
(दुर्योधन साडीला हात घालणार इतक्यात त्याची पत्नी मध्ये येते व म्हणते "अहो, काही लाजलज्जा? मी नाहीयेका? )
दि - अहो वहिनी... हे नाटक आहे.
द्रौपदी - मला मेल्याहून मेल्यासारख होतंय!
दुर्योधनाची पत्नी - करायची कशाला अशी कामं?
द्रौपदी - अग महाभारतात मला मेल्याहून मेल्यासारख होतंय!
युधिष्ठिराची पत्नी - द्रौपदी म्हणून एखादा पुरुष नाही का घेता येणार?
दि - अहो पुरुषच घेतला होता आधी. साडी फेडायचा सीन आल्यावर त्याने स्वतःच साडी काढून फेकून दिली.
युधिष्ठिराची पत्नी - का?
दि - त्याला युधिष्ठिराच्या नजरेची भीती वाटली.
युधिष्ठिराची पत्नी _ यांच्या?
दि - हो
युधिष्ठिर - तसे काही नाही गं!
धृतराष्ट्र - माझी पत्नी आजन्म पट्टी बांधते, युधिष्ठिरा तू पत्नीला द्युतात लावलंस?
युधिष्ठिर - मी माझ्या पत्नीला लावलय, तुमच्या नाही.
दि - हा डायलॉग नाही आहे.
गांधारी - आयडिया, गांधारी पट्टीहरण ठेवुयात का?
दि - तसं काही झालं नव्हतं!
(द्रौपदी धृतराष्ट्ऱाच्या पायाजवळ बसून मासिक वाचत असते. )
दि - अहो द्रौपदी, आक्रोश करा ना?
द्रौपदी - अयायायायाया फेडली रे कृष्णा फेडली माझी साडी
(दुः शासन व दुर्योधन खदाखदा हासत असतात. भीष्म पाय अवघडल्यामुळे पांडवांत येऊन बसतो. )
दुर्योधनाची पत्नीः अहो, मी होऊ का द्रौपदी?
(येथे भीम व दुर्योधन धसक्याने उठून उभे राहतात. द्रौपदी फणकाऱ्याने पाहते. )
दि - द्रौपदी तुमच्यासारखी नव्हती.
दुर्योधनाची पत्नी - हे तरी कुठे आहेत दुर्योधनासारखे?
भीष्म - मी होऊ का दुर्योधन?
द्रौपदी - नको बाई... (सावरून बसत )
दि - अहो, आता रोल नका हो बदलू कुणी..
भीष्म - माझ्या माहितीप्रमाणे वस्त्रहरणाच्या वेळी द्रौपदी एकवस्त्रा होती.
द्रौपदी - तुमच्या मिसेस कुठे आहेत आज?
कर्ण - त्या ट्रीपला गेल्या आहेत. भीष्मा, आज तुझ्या गच्चीत बसू बर का?
सहदेव - स्टॉक आहे का?
दि - सहदेव, तुम्ही जरा चवताळल्यासारखं करा...
गांधारी - ते काय चवताळणार? त्यांच्या मिसेस मला तेच सांगत असतात. काही म्हणून भावनाच नाही.
युधिष्ठिराची पत्नी - नाही तर आमचे हे...
नकुल - वहिनी काही म्हणा, पण तुम्ही स्मार्ट आहातच.
(युधिष्ठिराची पत्नी समाधानाने लाजते, युधिष्ठिर नकुलकडे रागाने पाहतो)
द्रौपदी - त्यांचं काय बाबा, स्वतःचच ब्युटीपार्लर..!
युधिष्ठिराची पत्नी - मुळातच स्कीन तशीच आहे माझी.
(येथे भीष्म युधिष्ठिराच्या पत्नीच्या स्कीनकडे पाहतो. )
दि - आता करायचं का पुढचं?
गांधारी - कृष्ण कुठे आहे पण?
दि - आज नाही येऊ शकला तो.
भीष्म - मग यांना वाचवणार कोण?
द्रौपदी - ते बघता येईल. (फणकाऱ्याने)
दि - अहो दुर्योधन, जरा साडी ओढल्यासारखे करत राहा ना?
(द्रौपदी पदराचे एक टोक हळूच दुर्योधनाच्या हातात देते. दुर्योधनाची पत्नी निरखून पाहत असते. दुर्योधन ते ओढल्यासारखे करतो. द्रौपदी धावते. ते धावत धावत अर्जुन बाल्कनीत बिडी ओढत असतो तिथे पोचतात. अर्जुन ते दृश्य पाहून बिडी टाकतो व आत पळत येतो. ते दृश्य बघून व तो आरडाओरडा ऐकून खालील रस्त्यावरची काही समाजसुधारक माणसे वर धावतात. )
ते - काय चाललंय? ऑ?
दि - नाटकाची प्रॅक्टिस करतोय..
ते - शाळा करतो काय? आम्हाला माहितीय हल्ली घराघरातून काय चालतं ते!
द्रौपदी - अहो तसे काही नाही, द्रौपदी वस्त्रहरणाचा सीन आहे, प्रॅक्टिस करतोय!
ते - ए भवाने... शिकवू नकोस... आत्ताच्या आत्ता बंद करा सगळं!
दि - अहो गणपतीत नाटक आहे कॉलनीत...
ते - नाटक इथेच करू का आम्ही? चल निघ इथून!
सगळे घाबरून पसार होतात.
वाद-संवाद समाप्त!