ज्येष्ठांचा गणेशोत्सव

ज्येष्ठांची अंगतपंगत झाल्यावर परत एकदा ज्येष्ठ एकत्र जमले होते. गप्पा मारता मारता एकाने विषय काढला गणेशोत्सवाचा. यंदा गणेशोत्सव आपण एकत्र साजरा करू या असे बरेच जणांचे मत होते. त्या मताला बाकी लोकांनीही पाठिंबा दिला. त्यामुळे ज्येष्ठांचा सार्वजनिक गणपती उत्सव करण्याचे ठरले. मग नेहमी प्रमाणे चर्चेला सुरवात झाली. देशपांडे म्हणाले, " गणेशोत्सव करण्याए ठरले पण किती दिवसाचा करावयाचा हे निश्चित करू या. " श्री. अंबुले म्हणाले, " चांगला दहा दिवसाचा करू या म्हणजे आप्ल्या सर्वांना दहा दिवस एकत्र येता येईल. " दाते म्हणाले, " दहा दिवस सारेजण याच्यातच अडकून पडू. आपल्याला बाहेरचे गणपती बघता येणार नाही. त्यापेक्षा आपण पांच दिवसाचा गणपती आणू या व गौरीबरोबर विसर्जन करू या. पुढील पांच दिवस आपल्याला फिरावयास मोकळे मिळतील. " मग दिवाकर म्हणाले, " मित्रानो, सध्याची परिस्थिती पाहता 'स्वाईन फ्लू' ने उच्छाद मांडला आहे. सर्व ठिकाणी साधेपणाने गणेशोत्सव साजरे होणार आहेत. तर आपणही यावर्षी त्याना साथ देऊन दीड दिवसाचा गणपती आणू या. पुढल्या वर्षी ह्या वर्षीच्या अनुभवावरून दिवस वाढवू या. " दिवाकरांनी स्वाईनफ्लू चे नाव घेतल्यावर सर्वजण सावध झाले. सर्वांनी यंदा दीड दिवसाचा गणपती आणू या असे ठरवले. मग मंडळी पुढच्या तयारीला लागली. या उत्सवाचे साधारण बजेट काय असेल? यावर चर्चा सुरू झाली. साधारण गणेशमूर्ती रु. ५००/- ची आणावी. त्याला आरास ५००/- ची करावी. फुलमाळा, आरती, प्रसादाचे साठी रु.१०००/- ठेवावेत असे ठरले. श्री. दाते सी. ए. असल्याने उत्सवाचा जमाखर्च त्यानी लिहावा व गणेशोत्सव झाल्यावर तो सर्वासमक्ष सादर करावा असे ठरले. फुले, आरती, प्रसादाचे काम श्री. देशपांडे यांचेकडे दिले. कारण गणपती त्यांच्याच हॉलमध्ये बसणार होता. मग सर्वांनी रु. २००/- प्रत्येकी वर्गणी देऊन उत्सवाच्या खर्चाची तरतूद केली. गणपती दीडच दिवसाचा असल्याने ज्या दिवशी गणपती बसतो त्या दिवशी सर्वांनी आरतीनंतर जेवण करून संध्याकाळी साडेआठ वाजता पुन्हा एकत्र देशपांडे यांचेकडे जमावयाचे असे ठरले. तेथे दोन तास करमणुकीचे कार्यक्रम व गप्पाटप्पा होतील असे सांगण्यात आले. लोकांना आधीच उत्साह होता त्यामुळे सर्वजण आनंदाने एकत्र जमण्यास कबूल झाले

ठरल्याप्रमाणे गणेशचतुर्थीला गणेशमूर्ती श्री. अंबुले यांच्या गाडीतून आणली. सर्वजण देशपांडे यांच्या घरी स्वागताला हजर होतेच. मोठ्या जल्लोषात " गणपती बाप्पा मोरया " अशा गजरात गजाननाचे स्वागत केले गेले. मग हॉलमध्ये एका टेबलावर गणरायाची स्थापना करण्यात आली. श्री. देशपांडे यांनी गुरुजींना बोलावून ठेवलेच होते. देशपांडे पतीपत्नींच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना केली. सर्वांनी आरती म्हणावयास सुरवात केली. मग एकामागून एक अशा सात आरत्या म्हटल्या गेल्या. मंत्रपुष्पांजली म्हटल्यावर गणरायाचा प्रसाद म्हणून आंब्याच्या माव्याचे मोदक देण्यात आले. सर्वांना खूप आनंद व प्रसन्न वाटत होते. गणरायाची स्थापना दुपारी बाराच्या सुमारास झाली. त्यानंतर सर्वजण आपापल्या घरी गेले. रात्री सात वाजता आरती व नंतर कार्यक्रम हे गणित मनांत ठेऊन गेले.

संध्याकाळी सात वाजता गणपतीची आरती सर्वांनी उत्साहाने म्हटली. मंत्रपुष्पांजली नंतर प्रसाद म्हणून मोतीचूर लाडू वाटले. ते खाऊन सर्वजण पुढच्या कार्यक्रमासाठी प्रशस्त भारतीय बैठकीवर बसले. आता सर्वजण आपापल्या फॅमिलीसह आल्याने विशेष मजा येत होती. सर्व जमल्यावर श्री. दिवाकर बोलण्यास उठले. ते म्हणाले, " मंडळी, सर्वांचे मनापासून स्वागत. आता आपण जो करमणुकीचा कार्यक्रम करणार आहोत त्यामध्ये सर्वांनी खिलाडूवृत्तीने भाग घ्यावयाचा आहे. त्यामुळे राग, लोभ कांही नको. फक्त मजा करू या. कोपऱ्यात ठेवलेल्या स्टुलावर्रील भांड्यात कांही इठ्या ठेवल्या आहेत. त्यातील एक चिठी एकेका फॅमिलीतील मेंबरने उचलावयाची व त्यात लिहिल्याप्रमाणे त्या फॅमिलीतील कोणाही मेंबरने सर्वासमक्ष त्याप्रमाणे आपली कला सादर करावयाची. " सर्वांनी या कार्यक्रमाला टाळ्याच्या गजरात संमती दिल्यावर कार्यक्रम सुरू झाला.

प्रथम देशपांडे यांनी चिठी उचलली. त्यात लिहिले होते एकादे गाणे म्हणा. देशपांडे म्हणाले, " मी गाणे म्हणतो पण तुम्ही आवाजाला हासू मात्र नका. "  त्यानी आपल्या पत्नीकडे पाहत गाण्यास सुरवात केली. " लाजून हसणे अन हासून ते पाहणे, मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे "  त्यांचा आवाज खरोखरच चांगला होता व गाणेही बहारदार झाले. गाणे झाल्यावर साऱ्यांनी टाळ्या वाजवल्या. मध्येच कुणीतरी म्हटले, " काय देशपांडे , अजूनही बहाणे चालूच आहेत काय? या वयात? " त्यावर देशपांडे म्हणाले, " काय सांगू मंडळी, आजूनही पुष्पाकडे पाहताना पूर्वीचे दिवस आठवतात. त्यातही एक थ्रील आहे. अनुभव घ्या. " त्यावर हसत अंबुले चिठी काढण्यास उठले. त्यानी चिठी उचलली त्यात लिहिले होते की एक नक्कल करा. ते म्हणाले," मी नक्कल करतो पण सांभाळून घ्या. मी आदेश बांदेकरांची नक्कल करतो. " त्यानी सौ. अलका वहिनीजवळ येऊन विचारले, " काय वहिनी तुमचे नाव काय? माहेरचे नाव काय? लग्न अरेंज की लव्हमॅरेज? " यावर सौ. अलकावहिनी म्हणाल्या, "  अंबुले भावजी, तुम्ही हातात पैशाची गड्डी ठेवा व मग प्रश्न विचारा. " मग श्री. अंबुले यांनी हातात दहा रुपयाच्या नोटा ठेऊन प्रश्न विचारावयास सुरवत केली. " तुमच्या घरी फ्रीजमध्ये अंडी ठेवण्याच्या जागेत कोणती वस्तू ठेवली आहे? संख्येने किती आहे? " सौ. अलकावहिनी म्हणाल्या, " अंडी ठेवण्याच्या जागेत मी लिंबे ठेवली आहेत वती पांच आहेत. "  अंबुले म्हणाले, " अभिनंदन वहिनी, तुमचे उत्तर बरोबर आहे. तुम्हांस हे दहा रुपयाचे बक्षिस."  सर्वांनी टाळ्या वाजवून त्याना दाद दिली. मग दिवाकर उठले व चिठी काढली. त्यात लिहिले होते दोन उखाणे म्हणा. त्यावर सौ. अलका वहिनीने एक उखाणा घेतला.

गणेशोत्सवास जमली ज्येष्ठमंडळी आनंदाने सारी
गणेशपूजा साऱ्यांनी मिळून केली भक्तीने साजरी
महाप्रसाद गणपतीचा, भक्तीने केला सेवन जरी
कमलाकररावाचे नाव घेताना मजला येते तरतरी

सर्वांना उखाणा आवडला. आता दुसरे नांव मि. दिवाकरांनी घ्यावे असा आग्रह झाला. दिवाक उठले व त्यानी नाव घेतले.

अंबरात जशी चंद्राबरोबर रोहिणी
शेषावर रमे बरोबर हो शारंगपाणी
सुगंधाबरोबर जशी असे रातराणी
सुखदुःखात मजसंगे अलकाराणी

सर्वांनी जल्लोषात टाळ्या वाजवल्या. बहुत खूब म्हणून दातेनी पुढची चीठी उचलली. त्यात तुमच्या जीवनातील अविस्मरणीय प्रसंग सांगा असे लिहिले होते. सौ. शरमिला दाते सांगू लागल्या, " ही हकिकत माझ्या लग्नाच्या अगोदरची आहे. त्यावेळेस मी १८-१९ वर्षांची असेन. एकदा मी रमत गमत रस्ताने चालत असताना माझ्या लक्षातच आले नाही की माझा कोणीतरी पाठलाग करत आहे. जेंव्हा माझ्या लक्षात आले तेंव्हा मी घाबरून एका गल्लीत शिरले. एक मोठा वाडा पाहून आत बसलेल्या आजोबाकडे गेले. त्याना , " माझ्यामागे कोणी गुंड लागला आहे तरी मला यातून वाचवा. " असे सांगितले. त्यानी मला धीर दिला व जवळ बसवले. मग आपल्या मुलाला हांक मारली, " राजा, बाहेर कोणी गुंड आहे का पाहून ये. तो हिच्यामागे लागला होता. " राजा बाहेर बघून आला पण त्याला कोणीच दिसले नाही. ही मुलगी वाड्यात शिरलेली पाहिल्यावर तो गुंड निघून गेला होता. मग शर्मिलाचा पत्ता विचारून राजाला तिला सुरक्षित घरी सोडावयास सांगितले. राजा घरी आल्यावर वडिलांनी विचारले, " कशी वाटली मुलगी? " राजा चक्क लाजला. मग वडिलांनी शर्मिलेच्या आईवडिलांची घरी जावून भेट घेतली. त्याना विचारले, " आम्हांस तुमची मुलगी पसंत आहे. तुमची तिच्या लग्नास तयारी आही का? आमचा राजा एका कंपनीत मोठा ऑफिसर आहे. पगारही चांगला आहे. तरी तयारी असल्यास आम्हांस घरी कळवावे. " असे सांगून ते घरी आले. शर्मिलेच्या वडिलांनी तिला विचारले, " काय ग, तुला मुलगा पसंत आहे का? " तिने होकार देताच मुलाच्या वडिलांना कळविण्यात  आले. मी करंदीकराची दाते झाले. हा माझ्या आयुष्यातला कधीही न विसरणारा प्रसंग आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून दातेंचे स्वागत केले. मग डॉ. चौधरी यानी पुढची चिठी काढली. त्याना एक विनोद सांगा असे लिहून आले. त्यानी सांगण्यास सुरवात केली.

" एका नवऱ्याला वाटते की आपल्या बायकोला कमी ऐकू येते. पण तिला तसे सांगून तिचा अपमान करावयाचा नव्हता. म्हणून तो कानाच्या डॉक्टरकडे जाऊन आपला प्रॉब्लेम सांगतो. त्यावर डॉक्टर त्याला एक सोपा उपाय सांगतो. नवऱ्याने प्रथम पत्नीशी ५० फूटावरून बोलायचे. जर कांही रिस्पाँन्स आला नाही तर ४० फूटावरून बोलायचे. असे दहा दहा फूट अंतर कमी करत किती अंतरावरून रिस्पाँन्स येतो ते कळेल मग त्याप्रमाणे त्यांची ट्रिटमेंट करू. दुसऱ्या दिवशी नवऱ्याने पाहिले की बायको किचन मध्ये स्वयंपाक करत आहे. त्याने ५० फूटावरून तिला विचारले, " डार्लिंग, आज काय बेत आहे? "  त्याला रिस्पाँन्स ऐकू येत नाही. मग त्यानी दहा दहा फूट अंतर कमी करत तोच प्रश्न तिला विचारला. तरी रिस्पाँन्स येत नव्हता. मग तो किचनमध्ये आला व दहा फूटावरून तिला विचारले, " डार्लिंग आज काय बेत आहे? " तेंव्हा ती म्हणाली, " डार्लिंग, आता मात्र हद्द झाली. आत्तापर्यंत मी तुला पाचवेळा, चिकन करत आहे असे सांगितले तरी परत परत काय विचारत आहेस? बहिरा आहेस का? " हा विनोद ऐकून सर्वांनी खूप टाळ्या वाजवल्या. आता रात्रीचे दहा वाजून गेले होते. त्यामुळे सर्वांनी खेळ आवरता घेतला. "उद्या विसर्जनास संध्याकाळी सात वाजता यावयाचे आहे व विसर्जन झाल्यावर भेळपार्टी आहे तरी कोणी कांही खाऊन येऊ नये" असे देशपांडे सांगत होते.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सात वाजता सर्वजण एकत्र जमले. खूप उत्साहात व जल्लोषात गणरायाला " गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या" म्हणून भावपूर्वक निरोप दिला. विसर्जन बंगल्यातील हौदातच केले.