चाळीतल्या दोन खोल्या सोडून आम्ही फ्लॅटवर राहायला आलो. फ्लॅट छानच होता. सगळंच सोईचं नि व्यवस्थित होतं. अडचण एकच होती. गावापासून बराच दूर होता. भाजी, किराणा इत्यादी आणण्यासाठी गावातच जावं लागे. मला ऑफिसमुळे जमत नसे. त्यामुळे अशी कामे हीच म्हणजे सौभाग्यवतीच करायची. सुरुवातीला सारं उत्साहानं करायची पण नंतर नंतर तिची तक्रार सुरू झाली. आज बसच मिळाली नाही, आज पायीच गेले. दरवेळी रिक्षा परवडत नाही हो. याला मी तरी काय करणार होतो? म्हटलं "सगळ्याजणी कशा जातात?"
ही म्हणाली "प्रत्येकजण आपापल्या गाडीवर जातात. माझ्यासोबत कोण येणार?" आणि एकदम मला म्हणाली, "अहो, मला लुना शिकवाल का?"
"काय?" माझ्या पोटात गोळाच आला. पण सावरीत म्हटलं "बरं बरं. केव्हा?"
'शुभस्य शीघ्रम्' ही उत्साहानं म्हणाली.
म्हटलं "चल, तुला सायकल येते नां?"
"छे हो. "
"अगं मग त्याशिवाय कशी शिकशील?"
"अहो मी आधी सायकल शिकेन मग लुना."
चिंटूनं लेडीज सायकल आणली. मग मी, चिंटू व ही अशी आमची वरात भर दुपारच्या रणरणत्या उन्हात मैदानाकडे निघाली. कधी माझ्या अंगावर तर कधी चिंटूच्या अंगावर हिचा सत्तर किलोचा भार पडू लागला. पण तिला काही जमेना. शेवटी म्हटलं चढून बैस अन् मग सायकल चालव. ब्रेक नीट धर. तिने चालवायला सुरुवात केली. सलग ४-५ दिवस भार सांभाळून हाताला व पळून पळून पायाला ठणक लागली तेव्हा अगदी चांगली नाही तरी बऱ्यापैकी ही सायकल चालवू लागली. ही आनंदून गेली. मला म्हणाली, "आता उद्यापासून लुना शिकायची हं."
"अगं उद्या ऑफिसचं काम जास्त आहे. नको." मी टाळायचं पाहत होतो पण हिचा पिच्छा काही सुटत नव्हता. "त्याला काय होतं. पहाटे उठून तासभर शिकवा." तिला नाराज कशाला करायचं म्हणून बरं म्हणालो.
दुसऱ्या दिवसापासून खऱ्या मोहिमेला सुरुवात झाली. हिला हरतऱ्हेने मी समजावत होतो पण हिच्या लक्षात काही येत नव्हतं. आमच्या या प्रभातफेऱ्या पाहून शेजारचे जोशी आमच्याकडे आले व म्हणाले "हं काय वहिनी, लुना शिकता वाटतं. बाकी साहेबदेखील छान समजावतात हो."
तशी ही म्हणाली, "अहो कसलं आलंय समजावणं? मागे बसून सारखं आपलं याँव कर ताँव कर असा तोंडाचा पट्टा चालू असतो. मागे बसून बोलायला काय जातं?"
शेवटी १५ दिवसांच्या माझ्या व चिंटूच्या परिश्रमाने ही बऱ्यापैकी लुना चालवू लागली. मला म्हणाली, "आज मी एकटीच तुम्हाला चक्कर मारते हं. मागे बसा."
आम्ही निघालो. लांबून एक दूधवाला येताना दिसला. न राहवून मी म्हटलं, "सावकाश घे, पुढून दूधवाला येतोय."
"माहिती आहे हो मला!" असं म्हणत तिनं लुना नेली ती थेट त्याच्या सायकलीवरच! मी घाईने ब्रेक दाबला. बिचाऱ्याचं सगळं दूध सांडलं. पण हिचं दुसरंच चाललं होतं - "अहो शुभ शकुन झाला बरं का. दूध सांडलं!"
पण तो दूधवाला ओरडत आला "गाडी चालवाया येत न्हाय तर कशाला रस्त्यावरून चालवता? माझं नुसकान झालं का न्हाय?" खरं म्हणजे चूक हिचीच होती. पण हीच त्याला दटावीत होती की, "मी काय मुद्दाम केलंय? चुकून होत नाही का? एवढं ओरडायला काय झालं? चला हो."
हे ऐकून तोही चिडला, "ओ माजं दुदाचं पैसं द्या न मंग जा."
एकंदरीत पुढली लक्षणं काही मला ठीक दिसेनात. मग की जरा नरमाईनं म्हणालो, "किती होतं दूध?"
"धा लीटर, शंभर रुपयं होत्यात."
मी त्याला घरी आणलं व १०० ची नोट देऊन त्याची बोळवण केली. हिला ओरडलो, "तरी बघून चालव म्हणून बजावत होतो." ही शांतपणे म्हणाली, "आता पुढे नीट चालवीन."
पुढे महिन्या-दीड महिन्याने हिने माझ्या हातावर एक पाकीट ठेवलं व म्हणाली "उघडा". पाहतो तो चक्क हिच्या नावाचं लायसन्स!
"हे काऽयऽ? कुणी दिलं तुला?" मी जवळजवळ किंचाळलोच.
"अहो असं काय? मी त्या जोशी वहिनींकडून गाडी शिकली व म्हटलं लायसन्स दाखवून तुम्हाला चकित करावं. आता त्यासाठी मी सत्यनारायण घालणार व त्यासाठीचं सामान आपल्या गाडीवर आणणार."
माझा जीव परत खालीवर होऊ लागला. त्या आर. टी. ओ. नि भला हिच्यावर विश्वास ठेवला असेल पण मी अद्याप हिची खात्री देऊ शकत नव्हतो. दुसऱ्या दिवशी दोन मोठ्या पिशव्या घेऊन हिने बाजारहाट केला. घरी सुखरूप आलेली पाहून हायसं वाटलं. सामान काढता काढता म्हणाली, "अहो, केळीची खुंटं त्या दुकानातच राहिली की", अन् लगबगीनं पुन्हा निघाली.
"चिंटूला बरोबर ने. तो मागे धरून बसेल", मी म्हणालो.
थोड्या वेळाने चिंटू हातात केळीची खुंटं घेऊन आला व म्हणाला, "बाबा चला."
"का रे?"
"अहो आईनं राँग साइडनं गाडी चलवीत एका माणसाला धडक दिली म्हणून तिला व गाडीला पोलिसांनी अडवून ठेवलंय." मी घाईघाईनं कपडे केले. नेहमीप्रमाणे पाकीट घेतलं व निघालो. मला ते पोलिसांचं नसतं झँगट नको होतं.
साधारण तासाभराच्या गयावयेनंतर पोलिसांच्या हातात ५० रुपये टिकवले. गाडी स्टार्ट करता करता हिला म्हणालो, मी मागे बसतो तू चालवतेस का?" तशी रडवेली होऊन घाईने ही म्हणाली, "नको, नको, तुम्हीच बसा. आता मात्र कानाला खडा."
===========
---- सौ. माधुरी शहा, सोलापूर.
===========
हा लेख माझ्या आईने काही वर्षांपूर्वी सोलापूरच्या स्थानिक दैनिकासाठी लिहिला होता. तो येथे प्रसिद्ध करीत आहे. हाच लेखदुवा क्र. १ या ठिकाणी सुद्धा उपलब्ध आहे.
=========