सामाजिक शहाणपण

तळेगाव. मावळातलं एक गाव.  तालुक्याचं.  अर्थात तालुक्याचं म्हटलं तरी अगदी फार मोठं शहरासारखंही नाही. लहानसंच.  मावळातली खेडी अगदी छोटी छोटी. दहा वीस दहा वीस घरांची.  त्यांच्यापेक्षा हे थोडं मोठं.  असेल दोन-चारशे उंबऱ्यांचं. 

आज तळेगावाचा उरुस.  साऱ्या तालुक्यातले, खेड्यापाड्यांतले, वाड्या वाड्यांमधले लोक सकाळपासूनच तळेगावात यायला लागले होते.  गावात मोठी धमाल उडून गेली होती.  सगळीकडे माणसंच माणसं दिसत होती.  गावातल्या देवळासमोर मोठा मांडव घातला होता.  सकाळपासनं तिथं भजनं कीर्तनं चालू होती.  गावाबाहेरच्या माळावर गाडीअड्डा केला होता.  बाहेर गावांहून येणारे लोक गाडी अड्ड्यावर गाड्या सोडत होते, बैलांची दावी गाड्यांच्या खुंट्यांना बांधत होते आणि बैलांसमोर थोडा थोडा चारा टाकून आधी देवदर्शनाला जात होते.  मग कुणी बाजारात जात होते.  कुणी गुरांच्या मैदानात नवी उमदी जित्राबं बघायला, खरेदी करायला जात होते.  कुणी कुस्त्यांच्या फडाकडे वळत होते तर कुणी मुलांचा हट्ट पुरवायला त्यांना मोठ्या चक्रात बसायला घेऊन जात होते. 

गावच्या मुख्य रस्त्यावर मोठा बाजार लागला होता.  गावोगावच्या व्यापाऱ्यांनी येऊन आपापली दुकानं थाटली होती.  कपडे, साड्या, रिबीनी, खेळणी, लाकडी वस्तू, लोखंडी हत्यारं, शेतीची अवजारं, प्लास्टिकच्या वस्तू, भांडी-कुंडी, देवांचे फोटो, युरोप पासून काश्मिर पर्यंतची 'शीन-शीनरीची' चित्रं, लहान मुलींच्या माळा, दागिने - किती किती गोष्टी बाजारात विक्रीला आल्या होत्या.  दोन चार कासारांनीही शेकडो रंगांच्या बांगड्यांची दुकानं थाटली होती.  विविध वस्तूंच्या जोडीनंच आसपासच्या खेड्यांमधली फळफळावळ, ताजी ताजी भाजी आणि अगदी कडधान्यंही विक्रीला आलेली होती.  या साऱ्याच्याच मध्ये एका डागदरानंही आपला फिरता दवाखाना थाटला होता अन साऱ्या धामधुमीतच त्याच्या पेशंटांची तपासणी करण्यात तो गर्क होता.  बाजारालाच खेटून गजानन भुवन, नागनाथ भुवन अशी वेगवेगळ्या देवदेवतांची नावं असलेली हाटिलं दाटिवाटीनं उभी होती.  त्यांच्या पुढ्यातच त्यांचे कळकट्ट आचारी वडे, भजी अन जिलब्या तळत होते अन तो तळणीचा वास येणाऱ्या जाणाऱ्यांना आवाहन करत होते.  हॉटेलं ओलांडून पुढं उजवीकडं रावबाच्या मळ्यातून खाली उतरलं की कुस्तीचा मांडव होता.  तिथं मोठमोठ्या पैजा लागत होत्या.  जिंकलेल्या मल्लांचे वस्ताद आपापले फेटे पुन्हा एकदा नीट घट्ट बांधत होते अन आपल्या पठ्ठ्यांना खांद्यावर घेऊन नाचवत होते.  तर हरलेल्या मल्लांचे वस्ताद फेटे काढून हातात घेत होते अन आपल्या पठ्ठ्यांची कानउघाडणी  करत होते अन हिरमुसून त्यांची पावलं गाडी अड्ड्याकडे वळत होती.  सकाळपासून संध्याकाळपर्यंत साऱ्या गावात अशी धमाल उडून गेली होती.  उन्हाची, गर्दीची तमा न बाळगता लोकं दिवसभर इकडून तिकडे हिंडत होती, मजा करत होती, खरेदी करत होते. 

उन्हं कलली.  पश्चिमेला महादेवाच्या डोंगरामागे सूर्य पार बुडाला तसे दमले थकलेले लोक, बायका पोरं परत निघायची लगबग करायला लागले.  दूरदूरच्या डोंगरदऱ्यातल्या वाड्यापाड्यांमध्ये राहणाऱ्या खेडूतांना अंधारातून जंगलातून परतायचं होतं.   देवळापुढच्या मांडवात रात्रीच्या कथेकरी बुवांनी आपल्या वाद्यांची लावालाव चालू केली होती.  कुस्तीच्या फडातले मल्ल, वस्ताद अन नवशिके उमेदवार दिवसभराच्या कुस्त्यांची चर्चा करत घोळक्या घोळक्यानं बाजाराकडे वळले.  प्रेक्षकांतल्या बऱ्याच जणांनी मात्र सुरेखाबाई नारायणगावकरणीच्या थेटराकडे आपला मोर्चा वळवला.  संध्याकाळ उतरायला लागली तशी गोन्सालविसाच्या 'परमिट रुमातली' गर्दीपण वाढायला लागली. 

दिवस सरला होता तरीही, कुठच्याही इतर भारतीय खेड्यातल्या  उरुसासारखंच तळेगावही स्वतःच्या मनोरंजनात मश्गुल होतं.  मंजूची वाट बघून बघून रमेश कंटाळून गेला होता.  किती वाट बघायची त्याला काही सीमा आहे का नाही?  पवाराच्या हॉटेलात दिवसभरात दहा तरी पेशल तो प्यायला असेल.  वेळ घालवायचा म्हणून.  त्याच्या डोक्यात वेगवेगळे विचार येत होते पण महत्प्रयासनं तो ते झटकून टाकत होता. 
"आख्खा दिवस गेला असा.  आता तरी  सोड ना बाबा म्हणावं.  अजून किती तिष्ठायचं मी इकडे? " रमेश स्वतःशीच पुटपुटला. 

रमेश.  वय वीसच्या आसपास.  तळेगावातलाच. घरची थोडी शेती.  घरच्या पुरतं धान्य पिकवणारी.  त्याशिवाय चार एकरात फळझाडं.  चिकू, सिताफळं आणि पेरु.  रमेशचे वडिल ही फळं शहरात पाठवायचे.  त्यातनं बऱ्यापैकी उत्पन्न मिळायचं.  रमेश नुकताच ग्रॅज्युएट झाला होता.  आता पुढं काय असा विचार त्याच्या डोक्यात होता.  शेती करायची, गावातच एखादा छोटासा व्यवसाय करायचा की शहरात जाऊन नोकरी धरायची.  रमेशचं वाचन चौफेर होतं.  साहित्यात त्याला रुची होती. शहरात वृत्तपत्रात नोकरी करायची त्याची ईच्छा होती. 

दिवसभर गावातल्या उरुसात, लोकांच्या गर्दीत तो हिंडत होता.  ओळखी पाळखीच्यांशी बोलत होता, गप्पा टप्पा करत होता.  पण तरीही पाण्यात तेलाचा एखादा थेंब जसा स्वतंत्र राहतो तद्वतच त्या माणसांच्या लोंढ्यातही त्याला एकाकी वाटत होतं.  माणसांचे  प्रवाह त्याच्या अंगावरून वाहत होते, परंतु तो स्वतः ला त्या प्रवाहांमध्ये सामिल करून घेऊ शकत नव्हता.  त्याची तशी इच्छापण नव्हती.

मागच्या काही दिवसांत तर रमेशला जास्तच एकाकी,  समाजापासून जास्तच विलग वाटायला लागलं होतं.  त्याच्या स्वभावातही बदल घडत होते.  तो जास्त विचारी, जास्त सखोल बनत होता.  जी गोष्ट मुलांना माहिती नसते पण प्रौढत्वानं माहिती व्हायला लागते अशा कुठच्या तरी गोष्टीनं त्याचे विचार ग्रासले जात होते.  त्याला स्वतःलाच प्रौढपण येत असल्याची भावना होत होती.  पण म्हणजे नक्की काय होतंय हेही कळत नव्हतं.  जुन्या आठवणी उचंबळून येत होत्या.  वैचारिक मिसरुड फुटायला लागलं होतं.  शहाणपण येत होतं.  हेच सामाजिक शहाणपण होतं का? त्यालाही नक्की कळत नव्हतं.  विचार तरल झाले होते आणि हे सगळं ओळखून समजून घेणाऱ्या व्यक्तिची जवळ असण्याची नितांत गरज वाटायला लागली होती.  त्याच्या आईच्या मुत्यूनंतर त्याला समजून घेणारी कुणीच व्यक्ति  त्याच्या आयुष्यात आजपर्यंत आलेली नव्हती.  पण आता  मात्र अशा कुणाचीतरी गरज भासायला लागली होती. 

प्रत्येक मुलाच्या आयुष्यात एक विशिष्ट वेळ अशी येते की मागं वळून आपल्या आजपर्यंतच्या आयुष्याचा आढावा घ्यावासा त्याला वाटू लागतो.  म्हणजे बहुतेक हीच ती वेळ असते ज्यावेळेस तो मुलाचा माणूस होत असतो.  ती लक्ष्मण-रेषा ओलांडत असतो.  गावच्या रस्त्यावरून, त्या बाजारातून, गर्दीतून, गोंगाटातून हा मुलगा चालतोय.  पण मन मात्र त्याचं त्या समाजापासून लांब आहे.  ते पुढच्या ध्येयांचा विचार करतंय.  विचार करतंय की या जगात आपल्याला नक्की काय बनायचंय? पुढची ध्येयं आणि मागील चुकांची दु:खं दोन्ही एकाच वेळेस मनात गर्दी करताहेत.  विचारांचा कल्लोळ माजतोय अन तो वाढत जातोय.  अनिर्बंध.  त्याची भीती वाटायला लागतीये.  कुणीतरी हाक मारतंय का?... नाही नाही... हे या गर्दीचे विकट आवाज आहेत.  हे असले आवाज?  ही माणसं... हे लोंढे... कोण आहेत हे सारे?  यांची ही अचकट विचकट आरडा ओरड?  हे सारं म्हणजे आपल्या ध्येयांच्या गळ्यात बांधलेली धोंड आहे...  छे...  या कोलाहलात आपलं काय होणार?  या पृथ्वीवर माणसांचे समुद्र पसरालेत अन त्यांचे प्रचंड  मोठे मोठे प्रवाह.  उकळत्या पाण्याचे प्रवाह.   अन हे सारे पार करून ध्येयं गाठायची? आणि कशासाठी? माणसांचे हे प्रवाह उगम तरी पावतात कुठून? अन यांना काही अंत? शहाणपण त्याच्या मनात तरल, दुःखद, वेदनाकारी भाव उत्पन्न करतात.  वाळलेलं पान जसं वाऱ्याबरोबर इतस्ततः भटकत रहातं, आपलं आयुष्यही असंच भरकटत रहाणार  का? हे सगळं बोलायला, ऐकून घ्यायला कुणीतरी पाहिजे.  कुणीतरी समजूतदार.  जिच्याजवळ सगळं मन मोकळं करता येईल अशी कुणीतरी.  जी आपल्या खांद्यावर डोकं टेकून शांतपणे हे सारं ऐकून घेईल अशी.  कुणीतरी खरी जीवाभावाची.  खरी मैत्रीण.  मैत्रीणच का?  हो मैत्रीणच.  कारण मुली जास्त समजूतदार असतात... अन जास्त भावविभोर...

मंजू.  रमेशच्या विचारचक्रात मंजूला अढळस्थान होतं.  विशेषतः वैचारिक मिसरुड फुटयला लागल्यापासून तर अधिकच.  मंजू गावातल्या मोठ्या, जुन्या प्रतिष्ठित कुटुंबातली.  लहानपनापासूनच रमेशला मंजू आवडायची.  सर्वसामान्य मुलींपेक्षा ती फारच वेगळी होती.  एकीकडे रमेश जसा प्रौढत्वात शिरत होता, तसंच दुसरीकडे  मंजूची पण स्त्री बनत होती.  तिची समजही शहाणपणात बदलत होती.  तीन चार वर्षांपूर्वी रात्री एकदा तिच्या बरोबर नदीच्या काठानं चालताना, पावसाच्या शिडकाव्यासारख्या अचानक आलेल्या विचारांपोटी त्यानं तिच्या समोर बढाया मारल्या होत्या.  तिच्या नजरेत त्याचं स्थान वाढावं म्हणून.  तो म्हणजे कुणी मोठा माणूस आहे असा तिचा समज व्हावा म्हणून.  पण आज मात्र तसं नव्हतं.  आज ती जवळ असण्याची अनिवार गरज होती.  त्याच्या डोक्यातलं विचारमंथन त्याला तिच्या समोर मांडायचं होतं. प्रौढपण म्हणजे काय हे कळतही नव्हतं त्या काळात त्यानं आपण मोठा माणूस असल्याची बतावणी तिच्यासमोर केली होती.  पण आजची गोष्ट वेगळी होती.  त्याच्या विचारांमध्ये घडत असलेले बदल, त्याच्या आकांक्षा, त्यात दडलेली भीती, सगळं तिच्याशी खरं खरं मनापासून बोलायचं होतं. 

मंजू अन रमेश गावातच दोघेही वाढलेले.  अन लहानपाणापासूनच जीवलग मित्र मैत्रीण असलेले.  मंजू आता कॉलेजात शिक्षण घेत होती. शहरात.  अन आता सुटीसाठी चार दिवस गावी आली होती.   तीही आता अल्लड पोर राहिली नव्हती.  बदल तिच्यातही घडत होते.  तिलासुद्धा आता सौंदर्य आणि स्त्रीत्वाची ओढ लागली होती.  तिच्याही मनात जुन्या आठवणी आणि पुढच्या आकांक्षा यांचं स्त्री-सुलभ मिश्रण तयार झालं होतं. तिलाही जिवाभावाचं, समजून घेणारं, हलकेच कुशीत घेऊन केसातून हात फिरवणारं कुणीतरी हवं होतं.  ती तिची स्त्री-सुलभ गरज होती. 

गावच्या हायस्कूलातला पी टी मास्तर तरुण होता.  शहराकडनं आलेला होता आणि मंजूचा लांबचा काहीतरी नातेवाईक पण लागत होता.  हा नात्याचाच धागा पकडून मास्तर मागचे दोन तीन दिवस तिच्या भोवती भोवती घोटाळत होता.  मास्तरची एक खुबी होती.  तो प्रत्येक गोष्ट 'सैद्धांतिक' रुपातच मांडायचा! दिवसभर वेगवेगळ्या रितीनं त्याला कटवण्याचा मंजू प्रयत्न करत होती. पण सारं व्यर्थ.  मास्तर अवतीभवती असतानाही मंजूच्या डोक्यात रमेशचेच विचार होते.  त्याला भेटण्याची ओढ आता अनिवार झाली होती. 

उन्हाळ्यातल्या त्या रात्री रमेशबरोबर नदीकाठनं चालत चालत मारलेल्या गप्पांच्या आठवणी तिच्याही मनात पुन्हा पुन्हा उचंबळून यायच्या.  आजही रात्री असंच त्याच्या बरोबर रहाण्याची उर्मी तिला होती.  शहरात राहून, नाटक सिनेमे बघून, वाचन करुन, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन तिचेही विचार प्रगल्भ व्हायला लागले होते.  रमेशला भेटण्याची तळमळ त्यामुळेच होती.  तिला तिच्या विचारांमधले बदल त्याला सांगायचे होते.  शहाणपण तिलाही येत होतं.  हे सामाजिक शहाणपण होतं का?

अंधार पडायला सुरवात झाली होती.  हताशपणे रमेश मंजूची वाट पाहत होता.  पेट्रोमॅक्सच्या बत्त्या पेटल्या होत्या.  बाजारच्या रस्त्यात मुंग्यांसारखी माणसं इकडून तिकडे हिंडत होती.  मध्येच एखादी बैलगाडीही जात होती.  लांब तमाशाच्या ढोलक्या लावल्या जात होत्या.  कथेकरी बुवांनी हरिनामाचा गजर लावला होता.   रमेशला सगळ्याच आवाजाचा त्रास झाला होता.  त्याची चीडचीड होत होती. 
"त्या मास्तराबरोबरच बसायचं असेल तर मग बस म्हणावं तिथेच... " रमेशचा श्वासोश्वास जोर जोरात व्हायला लागला होता.  त्याला त्याचा एकटेपणा अधिकच डसायला लागला होता.  सगळ्या जगानं आपल्याला धिक्कारलंय असं वाटत होतं.   एकाकीपणाची  भावना प्रबळ झाली होती.  धाय मोकलून रडावं म्हटलं तर तेही शक्य नाही.  ही गर्दी आपल्याला तेही मनासारखं करू देणार नाही.  नालायक साले सगळे.  चालता चालताच कशालातरी अडखळून तो पडला.  बाजूच्या भिंतीला एका खिळा होता.  त्याला अडकून पँट फाटली होती. 
"बास झालं... सरळ तिच्या घरीच जातो आता.  सरळ आत घुसतो... अन आत जाऊन बसतोच.  आणि जो कोण असेल त्याला सांगतो... मंजूला भेटायचंय...  आणि तेही आत्ताच ... लगेच... " विचारांची दिशाच कळत नव्हती...

मंजूच्या घरात बाहेरच्याच खोलीत मंजू, मंजूचे वडिल, काका आणि मास्तर असे चौघे बसले होते.  मंजू कातावून गेली होती.  अस्वस्थ होत होती.  मास्तर तर अखंड बडबडत होता.    त्याच्या बडबडीचा त्याला तिटकारा आला होता.  आपण कसे सुधारणावादी आणि पुढारलेल्या विचारांचे आहोत असं दाखवायचा तो सतत प्रयत्न करत होता. 
"खरंच काका तुम्हाला सांगतो, या सुंदर छोट्याश्या गावात येऊन ग्रामीण भारतीय समाजमनाचं फार समग्र दर्शन मला घडतंय आणि तुम्हा लोकांचा तर मी विशेष आभारी आहे कारण... " वगैरे, वगैरे, वगैरे, वगैरे...

वैतागून मंजू उठून घरात निघून गेली.  स्वयपाक घरात असताना तिला तिच्या वडिलांचे शब्द कानावर पडले.  ते मास्तरला सांगत होते "... बरोबर आहे तुमचं मास्तर.  खरंतर गावातला कुठलाच मुलगा मंजूच्या योग्यतेचा नाही... ".  हे सारं आता अति होत होतं. स्वयपाकघराच्याच दरवाज्यानं मंजू तडक बाहेर पडली.  राग तिच्या मस्तकात शिरला होता.  छेः ... काय जग आहे.  इतकी प्रचंड माणसं आणि इतके प्रचंड त्यांचे शाब्दिक बुडबुडे... रमेश, रमेश... कुठे अहेस रे? जवळ जवळ धावतच ती बाजाराच्या दिशेनी निघाली.  अन दोनच मिनिटात थांबली.  मागच्या दोन दिवसात आत्ता पहिल्यांदा तिच्या चेहेऱ्यावर मनस्वी आनंद पसरला.   समोरनं रमेश येत होता.  फणकाऱ्यात... " सरळ तिच्या घरात आत जाऊन बसतोच... " असं काहीसं पुटपुटत.  मंजू अशी अकस्मात समोर येईल हे त्याच्या ध्यानी मनीही नव्हतं.  ती समोर अगदी जवळ येईपर्यंत त्याचं तिच्याकडे लक्षही नव्हतं.  अन अचानक तिला पुढ्यात पाहून तो गडबडून गेला.  दोन मिनिटं नुसताच तिच्याकडे बघत राहिला.  अन मग चटकन भानावर येत तिचा हात हातात धरून उलटपावली झपाझप निघाला.  दूर... कोलाहलापासून दूर...

सवयीनं वळावीत तशी दोघांचीही पावलं नदीच्या दिशेनं वळाली.  मंजूचा हात अजूनही रमेशनं हातातच धरला होता.  आनंदानं दोघांच्याही चित्तवृती तरारून आल्या होत्या.   रमेशला नक्की कळतच नव्हतं की मंजूशी काय काय बोलायचं.  त्यानं जे जे ठरवलं होतं, मागच्या काही दिवसातलं जे विचार मंथन होतं यातलं काहीसुद्धा त्याला आठवेना.   मंजूचीही अवस्था अगदी अशीच झाली होती.  आपले विचार, रमेशचे विचार हे सारं काही ओळखून घेऊन तिला त्याच्याबद्दल जास्तच जवळीक वाटायला लागली होती. 

नदीकाठावरनं गावातली जत्रा लांब दुसऱ्या ग्रहावर असल्यासारखी दूर भासत होती.  जत्रेतले दिवे, लोकांची हालचाल, कथेकरी बुवांचा आवाज, तमाशातल्या लावणीचा ठेका,  गोंगाट हे सारं म्हणजे लांबवर चाललेल्या भुतांच्या नाचासारखं वाटत होतं.  नदीच्या बांधावर रमेशच्या नेहेमीच्या आवडत्या ठिकाणी रमेश अणी मंजू येऊन बसले.  समोरचं मोठ्ठं पात्र, त्या पलिकडची शेतं, शेतांमध्ये उभी असलेली स्तब्ध काळीशार झाडं, त्या पलिकडचा महादेवाचा प्रचंड डोंगर अशा त्या संपूर्ण निर्विकल्प विस्तारात, अस्तित्ववादाच्या घडामोडीत आपली क्षुद्रता रमेशला जाणवली.  मंजूच्या असण्यानं त्याची चीडचीड, त्याचा कातावलेपणा कुठल्या कुठे पळाला.  जणू काही तिचा नाजूक कोमल हात त्याच्या जीवनयंत्रात विशिष्ट हळुवार बदल करायला त्याला मदत करत होता.  रमेशच्या डोक्यात फक्त मंजूचेच विचार होते.   त्याचं मंजूवर प्रेम होतं.  त्याला मंजूनं त्याच्यावर प्रेम करायला हवं होतं. 

मंजूचा हात त्यानं हलकेच हातात घेतला.  मंजू रमेशच्या अगदी जवळ सरकली, हलकेच त्याला बिलगली.  थंड बोचऱ्या वाऱ्यानं तिच्या अंगावर शहारा आला.  विचार चक्राचा वेग खूपच मंदावला.   स्वतःच्या भावनांचे अर्थ समजावून घेण्याचा ते दोघे स्वतःच प्रयत्न करत होते.  त्या उन्नत स्थळी अणूंचे मनुष्यरुपी दोन पुंजके एकमेकांच्या कुशीत घट्ट विसावले होते, एकमेकांना आश्वस्थ करत होते. 

रमेश आणि मंजू कितीतरी वेळ शांत बसून होते.  बोलत कुणीच काहीच नव्हतं.  मध्येच एकमेकांपासून थोडसं अलग होऊन रात्रीच्या अंधारात ते एकमेकांच्या डोळ्यात बघायचा प्रयत्न करत होते.  अन पुन्हा हलकेच ओठांवर ओठ टेकून एकमेकांचं अधरामृतसेवन करत होते.  लांबवर लगबगीनं निघालेल्या बैलगाड्यांच्या बैलांच्या गळ्यातल्या घुंगरांचे आवाज ऐकू येत होते.  गावाबाहेर एका घोळक्यानं शेकोटी पेटवलेली दिसत होती.  मिट्ट विस्ताराच्या पार्श्वभूमीवर शेकोटीच्या ज्वाळा उठून दिसत होत्या. 

रमेश आणि मंजू जायला उठले.  गाव नजीक आलं तसं पुन्हा एकवार थांबले.   मनानं त्यांना परत जावंसं वाटत नव्हतं.  भावनातिरेकानं रमेशनं मंजूला पुन्हा एकदा घट्ट मिठीत घेतलं.  आपले ओठ त्यानं तिच्या कोमल ओठांवर टेकले.  एक, दोन, तीन, चार त्यानं तिची अनंत चुंबनं घेतली.  रमेशच्या मिठीत मंजूला विरघळून गेल्यासारखं वाटत होतं.  त्याचे हात तिच्या शरीरावरून फिरत होते.  ती सुखानं विव्हळत होती.  रमेशच्या स्पर्शानं सुखावत होती.  पण फक्त एकच मिनिट.  एकाच मिनिटात दोघेही भानावर आले.  शारीरिक आकर्षणाची जागा आता आदरानं घेतली.  आदरयुक्त नजरांनी दोघेही एकमेकांना न्याहाळत होते.  दोघांचीही मनं हर्षोन्मादानं फुलून आली होती.  रमेश - मंजूला आता प्रौढ स्त्री पुरुष म्हणा किंवा लहान मुलगा मुलगी म्हणा.  पण आजच्या सुधारलेल्या जगात सामाजिक शहाणपण आलेल्या स्त्री आणि पुरुषांचं जगणं ज्या गोष्टीमुळे शक्य होतं, आजच्या या रात्री या दोघांना त्याच गोष्टीचा आधार लाभला होता.