पुनर्जन्म- सत्यकथा१

समुद्रकिनाऱ्यावर उभे राहून आपण समुद्राकडे नजर टाकली तर समुद्राचे अथांग, भव्य रुप आपल्याला मोहवून टाकते. या रत्नाकराच्या उदरात काय काय दडलेले आहे याची आपण कल्पनाही करू शकत नाही. यात अनेक जीवजंतू, मासे, कासव, मगरी, साप असे अनेक प्राणी असल्याचे आपण टि.व्ही.वर पाहतो. या समुद्राकडे जसजसे पहाल तसतसे त्याच्याबद्दलचे गूढ वाढतच जाते. त्याचे रुप दिवसभरात किती वेळा बदलते याचे कौतुक वाटते‌. सकाळी भरती असल्याने प्रचंड लाटा किनाऱ्यावर येऊन थडकतात. त्याच दुपारी ओहोटीच्यावेळी संथ होऊन समुद्राला शांत करतात. अशा समुद्रावर स्वार होऊन , प्रसंगी जीवावर उदार होऊन आपले मासेमारीचे काम चोख बजावणाऱ्या कोळी लोकांच्या धाडसाचे मला नेहमीच कौतुक वाटते. पण ज्याला पोहता येत नाही, ज्यांचे वय झालेले आहे अशा लोकांनी जर या समुद्रावर स्वार होण्याचे ठरवले तर काय होईल?

श्री. काळे हे मीरज येथे राहणारे सुखी दांपत्य आहे. वय असेल ६०-६५ वर्षे. ते स्वतः सिव्हिल इंजिनियर असून नुकतेच सेंट्रल गव्हर्मेंट मधून निवृत्त झाले आहेत. त्याना दोन मुली असून दोघींची लग्ने झाली आहेत. त्यातली मोठी मुलगी विशाखा ही आपल्या पतीबरोबर मुंबई येथे राहते. तिचे पती श्री. संदीप कपूर हे नेव्हीमध्ये ले. कर्नलच्या हुद्यावर असून कुलाबा येथे त्यांचे वास्तव्य आहे. त्याना एक संकल्प नावाचा हुशार धाडसी दहा वर्षाचा मुलगा आहे‌अंदीप ने. व्ही. त असल्याने त्याना समुद्रावर सेलिंग करण्याची खूप आवड आहे. ते मरीनड्राईव्ह येथील बोटक्लबचे मेंबर आहेत. सुटीच्या दिवशी ते आपला मुलगा संकल्प व पत्नी विशाखा यांच्या बरोबर सेलिंग बोटमध्ये बसून मरीनड्राईव्ह ते मांडवी असा समुद्रप्रवास मजेत करत असत. त्याना या प्रवासाची खूप सवय झाली आहे. त्यांचा मुलगा पण यात खूप तरबेज झाला आहे.

अशा या मुलीकडे कांही काळ घालवावा या उद्देशाने काळे दांपत्य २० मार्च २००७ या दिवशी मुंबईला येऊन स्थानापन्न झाले. आईबाबा आल्यामुळे सौ. विशाखाला, जावयाला व नातवाला खूप आनंद झाला. आल्यावर सर्वांची विचारपूस करून क्षेमकुशल जाणून घेतले. पूर्वी श्री. काळे नोकरीनिमित्त मुंबई येथे असल्याने त्याना या नगरीचे विशेष अप्रूप वाटत नव्हते. मात्र नातवाच्या सहवासात राहताना त्यांची कळी नेहमीच खुलत असे. आजीने केलेले साजुक तुपातील बेसनाचे लाडू, ओल्या खोबऱ्याच्या करंज्या, रुचकर चकल्या जावयाला व नातवाला खाऊ घालण्यात त्यांचे चार दिवस कसे गेले ते कळलेच नाहीं. नंतर मात्र नातवाने आपल्या वडिलापुढे सेलिंगला आजी आजोबांना घेऊन जाण्याविषयीचा प्रस्ताव ठेवला. पण श्री. काळे म्हणाले, "  आमचे आता वय झाले आहे शिवाय आम्हांला पोहताही येत नाही. याकरता ही रिस्क न घेतलेलीच बरी. " पण नातू संकल्प कांहीच ऐकायला तयार नव्हता. त्याने आजोबाना यात कसा धोका नाही ते समजावून सांगितले. शिवाय सर्वजण त्यांच्याबरोबर होतेच.मग नाईलाजाने आजीआजोबा त्याच्याबरोबर जाण्यास तयार झाले.

श्री. संदीप कपूर हे क्लबचे मेंबर असल्याने बोट मिळवण्यात कांहीच अडचण आली नाही. दुपारी बारा वाजल्यानंतर ओहोटीच्या वेळी वाऱ्याचा वेग व लाटांचा जोर पाहून त्यानी बोट घेतली. जाताना कांही अघटित घडले तर मदत व्हावी म्हणून प्रत्येकास लाईफ जाकिट घालणे कंपलसरी होते. सकाळी नास्ता घेऊन व कांही खाण्याचे पदार्थ व इतर सामान, चपला घेऊन हे सर्व त्या बोटीवरील कपाटात ठेवून सर्वजण बोटीवर चढले. सण्दीप व संकल्पला सेलिंगची सवय असल्याने ते सर्व मजेत होते. पण काळे दांपत्याला या अथांग सागरात एका छोट्या बोटीवर बसून जाताना मनांत खरे तर खूप भीती वाटत होती. पण बालहट्टापुढे काय करणार? मग ती बोट हळुहळू भर समुधात गेल्यावर त्या बोटीचे कापडी शीड संदीपने उभे केले.  त्या बोटीला एका बाजुलाच वल्हे असल्याने प्रत्येकाने म्हणजे संदीप, संकल्प व विशाखाने थोडाथोडा वेळ सेलिंग केले. प्रवास मजेत होत होता. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. जे घडू नये वाटत होते तेच नेमके घडले. कारण समुद्रात एक फार मोठी लाट आली व त्या लाटेने ही फायबरची होडी उलटी झाली. त्यामुळे त्यात बसलेले सर्वजण समुद्रात पडले. मुंबई सोडून त्याना एक तास झाला होता.  ती बोट फायबरची असल्याने फार हलकी होती. ज्याना प्रथम पासून पाण्याची भीती वाटत होती, ज्यांचे वय झाले होते, वज्याना पोहता येत नव्हते त्यांची मानसिक स्थिती काय झाली असेल याची कल्पनाच केलेली बरी. काळे दांपत्याला आपले मरण आपल्या डोळ्यासमोर  दिसले. काळे वहिनींना आपले घर, आपली दुसरी मुलगी स्मिता, आई सर्वजण क्षणात डोळ्यासमोरून सरकताना दिसले. आता कांही आपण वाचत नाही. हाच आपला शेवट आहे याची खात्री पटली व त्या भीतीने ओरडू लागल्या. कारण समुद्राच्या पोटात काय आहे ते कळत नव्हते. एकच आरडाओरडा सुरू झाला. पण संदीपने सर्वाना धीराने सांगितले, " तुम्ही लाईफ जाकिटने बांधले असल्याने बुडणार नाहीत याची खात्री बाळगा. मी बोटीला सरळ करतो. काळजी करू नका. " काळजी करू नका असे सांगणे खूप सोपे असते पण ज्याच्यावर प्रसंग गुजरला असतो त्यालाच त्याच्या वेदना माहित असतात. पण आता त्याच्या शब्दावर भरवसा ठेवण्यापलिकडे त्यांच्या हातात काय होते?  मोठ्या प्रयत्नाने संदीप व संकल्पने  बोट परत सुलटी केली व ते दोघे त्यावर चढले. मग विशाखा बोटीवर चढली. सर्वांनी मिळून काळेना ओढून बोटीत घेतले. पण काळेवहिनी अतिशय भेदरल्या होत्या. त्याना पोहता येत नव्हते व कांही करण्याच्या मनस्थितीत त्या नव्हत्या. सर्वांनी त्याना परोपरीने धीर दिला व बोटीवर चढण्यासाठी हिंमत दिली. मग कसेबसे सर्वांच्या मदतीने त्या बोटीवर चढल्या. वर चढल्यावर आपण या अपघातातून वाचलो आहोत यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. बराचवेळ त्या भीतीने थरथर कापत होत्या. सर्वजण सुखरुप आहेत पाहून त्यांच्या जीवातजीव आला. मग परत सेलिंग सुरू झाले. दुपारचे अडीच वाजले होते. त्यांच्या बोटीचा मार्ग चुकला होता व ते भर समुद्राच्या दिशेने चालले होते. रस्त्यात त्याना एक मच्छीमाराची बोट दिसली. त्याना मांडवीबद्दल विचारल्यावर त्यानी ती मागेच गेली व तुम्ही चुकीच्या मार्गाने जात आहात असे सांगितले. मग परत ती बोट फिरवून मांडवीकडे मार्गस्थ झाले. संध्याकाळी सहा वाजता ते मांडवीला पोहोचले. बोटक्लबचे लोक त्यांची वाटच पाहत होते. बोट पाहिल्यावर त्यांच्या जीवात जीव आला. वास्तविक मुंबई ते मांडवी दोन ते तीन तासाचे अंतर असून याना का वेळ लागला? याचाच विचार क्लबमधील लोकांच्या मनांत येत होता. पण जेंव्हा सर्व घटना कळल्यावर त्यानी सर्वांना आज मुक्काम करावयास सांगितले. ती बोट फोल्ड करून किनाऱ्यावर आणली. समुद्राबाहेर आल्यावर सर्वांना थंडी वाजू लागली. सर्वात प्रथम सर्वांनी आपली लाईफ जाकिटे गोड्या पाण्याने स्वच्छ धुवून काढली व वाळत टाकली. रात्री ९ वाजेपर्यंत त्या क्लबहाऊसमध्ये लोड शेडिंगमुळे लाईट नव्हते. त्यामुळे अडचणीत अजून भर पडत होती. रात्री नऊ नंतर सर्वांनी गरम पाण्याने स्नान केले. मग सपाटून भूक लागल्यामुळे जेवणावर आडवा हात मारला. मग जेवणानंतर खोलीत जावून जे झोपले ते सकाळीच उठले. अशी शांत झोप त्याना पूर्वी लागली नसेल याची खात्री आहे. सकाळी बारा नंतर पुन्हा मुंबईकडे त्याच बोटीने प्रयाण केले. आता सेलिंगचा अनुभव सर्वांनाच आला होता. त्यामुळे त्यातील थ्रील संपले होते. पण काळे दांपत्याला आयुयात लक्षात राहील अशी सफर करून सुदैवाने वाचल्याबद्दल देवाच्या आघात लीलांची प्रचिती आली असेल व त्यानी घरी आल्यावर गजाननासमोर हात जोडून म्हटले असेल, " नको देवराया अंत आता पाहू , प्राण हा सर्वथा जाऊ पाहे "