शाळेच्या आठवणी - कोलंबसाचं गर्वगीत

         शाळेचं अर्ध वर्ष संपत आलं, की ऊन्हं, शाळेच्या ईमारतीला वळसा घालून, मैदानावर पसरू लागायची. मग, झाडांच्या कडीत लपलेलं, लाल मातीच आमचं मैदान खूप मोहक दिसायचं. आडव्या गंजाच्या लाकडी खिडक्या उघडल्या की बाहेरच बघत राहवसं वाटे. बहुतेक सर्व झाडांची पान गळून गेलेली असायची, पण ईमारतीजवळचं आंब्याचं झाड नेहेमीच पानांनी लगडलेलं. म्हणूनच की काय, इतर झाडांवरचे रहिवासी हिवाळ्यात, आपली घर सोडून आंब्याच्या झाडावर आपला घरोबा करत. मग ते झाड पक्षांच्या किलबिलाटानं भरून जात असे. त्या झाडावर कायम वास्तव्यास आलेल्या दोन खारुताईंवर माझा खास जीव होता. सगळीचं झाडं एकमेकांना खेटून ऊभी असल्यामुळे, त्या दोघी पूर्ण  मैदान जमिनीवर न उतरता भटकत असत. कधी कधी त्यांना कच्चे पेरू पेरुच्या झाडापासून, आंब्याच्या झाडापर्यंत नेताना बघायला मिळायचं. त्या प्रयत्नात त्यांची होणारी धावपळं आणि एकमेकींशी अगम्य, पण गोड भाषेत चालणारा संवाद बघताना, खूपच मजा यायची.

       आज त्यांना जमिनीवर काहीतरी सापडलं होतं, ते ढकलत, ढकलत शाळेच्या ईमारतीजवळ आणलं होतं. त्या दोघी आता ईतक्या जवळ आल्या होत्या की मला वाकूनही नीट दिसत नव्हतं. बहुतेक त्यांना जमिनीवर पडलेला, मोठा पेरू सापडला होता. "प्रथम!! खाली काय आहे?"  आमच्या जीवशास्त्राच्या बाईंनी रागाने विचारलं. मी दचकून भानावर आलो, आणि पकडल्या गेल्यावरच्या नेहेमीच्या सवयीनं मान खाली घालून, त्यांची नजर चुकवू लागलो.

"मी काय बोलत होते इतका वेळं? सांग बरं...".

शेवटचं मला आठवत होतं ते म्हणजे, माझ्यासारख्या, त्यानीं दिलेला घरचा अभ्यास न केलेल्या मुलांची बांईंनी कानउघडणी केली होती. पण बहुतेक त्या त्याबद्दल विचारत नसाव्यात. बाईंकडे बघण्यापेक्षा बाकावर पडलेली भोकं न्याहाळणं मला बरच सोप्प वाटत होतं.  "इकडे बघं आणि सांग" आता त्यांच्याकडे पाहण्याशिवाय पर्याय नव्हता... पण तोंड घट्ट बंद. शेवटी सगळ्यांचं माझ्याकडे बघून हसून झाल्यावर आणि बाई कंटाळल्यावर, त्यानीं मला तास संपेपर्यंत ऊभं रहायला सांगितलं. अजूनही मुलं माझ्याकडे बघून गालातल्या गालात हसत होती, मला अगदी छोटसं होऊन बाकाखाली लपून जावसं वाटतं होतं. अचानक एक गोष्ट माझ्या लक्ष्यात आली, ऊभं राहिल्यामुळे आता मला, जवळून जाणाऱ्या "त्या दोघी" अगदी स्पष्ट दिसत होत्या.

        पुढचा तास मराठीचा होता, माझ्या सर्वात आवडीचा, अर्थात खेळाचा तास सोडून. मराठीचं पुस्तक विकत घेतल्या घेतल्या मी लगेच वाचून काढत असे. काही काही कविता आणि धडे वाचताना जवळ जवळ खेळताना होई, अवढा आनंद होत असे. तरी पण बर्वे बाई शिकवताना तेच धडे, त्याच कविता, नव्यानं भेटत. काही काही आधी अनोळखी वाटलेले अचानक स्वतःच ओळख करून देत. आमच्या बाईच होत्या तशा. आज "कोलंबसाचं गर्वगीत" होणार होतं. मला ही कविता नाहीच आवडली... सागराची क्रूध्य, गर्वीष्ठ अशी प्रतिमा मनाला पटलीच नव्हती. तो नेहेमी मला आत बोलवणारा वाटत असे, मार्ग रोखणारा कधीच वाटला नाही. तसं आमचं गावं देशावर, त्यामुळे समुद्राचं प्रत्यक्ष दर्शन असं नाहीचं. मुंबईला गेल्यावर दादरची चौपाटी, आणि दूरदर्शन वर लागणारी "जिथे सागरा.." अशी गाणी बघूनच समुद्राची तहान भागवावी लागायची.

       पण पहिल्यांदा समुद्र भेटला तो गिरीजाच्या घराच्या भींतीवर. निरभ्र आकाश क्षितिजावर अलगद पाण्यात विलीन झालं होतं. क्षितिजाजवळ शांत गंभीर वाटणारा समुद्र, किनाऱ्याजवळ मात्र जराशी दंगामस्ती करत होता. अर्धवट पाण्यात डुंबलेल्या खडकावर बसून, गिरीजा उसळणाऱ्या आणि शांत होणाऱ्या लाटांकडे बघत होती. समुद्रही किनाऱ्याला कागद समजून लाटांनी त्यावर लयदार नक्षी काढत होता. भरती जोर पकडत होती, पाणी वाढत होतं, लाटा धीट होत होत्या, गिरीजाही एव्हाना ओलीचींब झाली होती. पण तिला कशाचीच चिंता नव्हती. आता तिनं निघायला हवं....  असं मला वाटलं. तर ती म्हणाली, 

"घाबरण्यासारखं काहीच नाही, तिचा सखा तिला जवळ घेतोय". खरच! समुद्र आणि तिच्यातलं वेगळेपण धूसर होत होतं. समुद्राच्या फेसाचा आणि तिच्या स्लीपचा ओला, पांढरा रंग एकमेकात मिसळू लागला होता, मोकळ्या केसांनी लाटांचा नाद पकडला होता.

"कवितेच्या पानावर खाली हे गलबताचं चित्रं का काढलं असेल"

बर्वे बाई विचारत होत्या, मी पुन्हा वर्गात.... खरतर माझं मराठीच्या तासाला पूर्ण लक्ष असायचं पण आज काल असं वरचेवर होउ लागलं होतं. ते एक अगदी जुनाट आणि समुद्र प्रवासासाठी अयोग्य अशा जहाजाचं चित्रं होतं. मी थोड्या वेळानं म्हणालो, "त्यांना असं दाखवायचं आहे की त्या काळी जहाजं आजच्या अवढी प्रगत नव्हती, अशाच एखाद्या अगदी असुरक्षित जहाजातून ते साहसी खलाशी समुद्रात शिरायचे". बाई जाम खूश झाल्या, त्यांना झालेला आनंद त्यांच्या चेहेऱ्यावर दिसत होता. कोणालातरी कळलं असं त्यांना वाटलं असेल. खरतर मला ही कल्पना काही आवडली नाही, पण बाई मझ्यावर खूश झाल्या या आनंदात माझा उरलेला दिवस मस्त गेला.  

फक्त चित्रात भेटलेला समुद्र अजुन प्रत्यक्षात भेटला नाही ह्याची रुख रुख मनाला लागून राहिली.